कोण म्हणतोे नेहरु-पटेल यांच्यात विसंवाद होता?
By Admin | Updated: November 4, 2016 04:42 IST2016-11-04T04:42:09+5:302016-11-04T04:42:09+5:30
नुकतेच मी एका दुकानातून एक जुने पुस्तक मिळवले व त्याचे वाचन पूर्ण केले व त्यात मला काही महत्वाचे संदर्भही सापडले.

कोण म्हणतोे नेहरु-पटेल यांच्यात विसंवाद होता?
नुकतेच मी एका दुकानातून एक जुने पुस्तक मिळवले व त्याचे वाचन पूर्ण केले व त्यात मला काही महत्वाचे संदर्भही सापडले. पुस्तकाचे नाव आहे ‘आॅल थ्रू दि गांधीयन इरा’, आणि त्याचे लेखक ए.एस.अय्यंगार. १९५० साली या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. पत्रकार म्हणून अय्यंगार यांनी चेम्सफोर्डपासून पुढच्या प्रत्येक व्हॉइसरॉयची मुलाखत घेतली आहे. त्याशिवाय त्यांचे त्यावेळच्या राष्ट्रीय आंदोलनातील प्रत्येक नेत्याशी जवळचे संबंध होते. त्यांच्या पुस्तकात त्यांच्या सहकारी पत्रकारांच्या व्यक्तिमत्वाचे स्वैर चित्रण आहे तसेच काही लिखाण असहकार आंदोलनाच्या बाबतीत आहे. थोडे लिखाण १९३० आणि १९४०च्या काळातील धार्मिक राजकारणावर आहे तर दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम यावरील लिखाणसुद्धा या पुस्तकात आहे.
याच पुस्तकातील एका प्रकरणाला नेहरू आणि पटेल असे शीर्षक आहे. अय्यंगार यांनी दोघांचेही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जवळून निरीक्षण केले होते आणि त्यानंतरही नेहरू यांचा पंतप्रधान पदाचा कारभार आणि पटेल यांचा उप-पंतप्रधानपदाचा कारभार त्यांनी बघितला होता. त्यावर अय्यंगार म्हणतात की, ‘हे देशाचे सद्भाग्य आहे की आपल्याला पंडित नेहरू आणि सरदार पटेल अशी दोन व्यक्तिमत्वे लाभली आहेत व दोहोंचे व्यक्तिमत्व परस्परपूरक आहे’. ते पुढे असेही म्हणतात की, ‘मानवता आणि वास्तववादी भूमिका यांचा मिलाफ जवाहरलाल आणि वल्लभभाई यांच्यात अचूकपणे बघावयास मिळतो’.
१९५० साली अय्यंगार यांनी देशाचा आवडता खेळ ठरलेल्या क्रिकेटला अनुसरून या दोघा राष्ट्रनिर्मात्यांसाठी एक उपमा वापरली होती, ‘दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत, नेहरूंना षटकार मारायचा असतो तर पटेल गोलंदाजाला थकवत मोठी धावसंख्या उभारीत असतात’. दुसरी उपमा त्यांनी खनिज प्रकारातली दिली होती. ते म्हणतात ‘दोघे किंमती हिरे आहेत, फरक इतकाच की सरदार पटेल हे खडबडीत पृष्ठभागाचे असले तरी उच्च किमतीचे आहेत तर नेहरू हे घासून निश्चित आकार दिलेले आहेत, त्यांना अनेक पैलू पाडण्यात आले आहेत म्हणून ते सर्व दिशांनी चमकत असतात’.
गेल्या काही वर्षात विचारवंतांनी या दोघांच्या व्यक्तिमत्वातील फरकाला राजकीय वैरभावाचे रूप देऊन टाकले आहे. नेहरूवादी विचारवंतांचे असे म्हणणे आहे की पटेल हे धार्मिक राजकारणाकडे झुकणारे होते तर पटेलवादी म्हणवून घेणारे विचारवंत म्हणतात की नेहरूंच्या विदेश धोरणात खूप चुका होत्या. या भेदात आणखी एक भर म्हणजे असा दावा की दोघांना एकमेकांविषयी विश्वास नव्हता.
गोपालकृष्ण गांधींनी हे अचूकपणे हेरले आहे की, नेहरू-पटेल यांच्यातील अशा अपायकारक विपर्यासाला देशातील दोन मुख्य राजकीय पक्षच कारणीभूत आहेत. काँग्रेसने आधी पटेलांना अंतर दिले तर त्याच्या नेमके उलट भाजपाने त्यांचा चुकीच्या पद्धतीने पुरस्कार केला आहे. दुर्दैवाने सरदार पटेलांचा जन्मदिवस इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशीच येतो. १९८५ पासून पुढे काँग्रेसची सत्ता केंद्रात असतांना त्यांनी ३१ आॅक्टोेबर हा दिवस, इंदिरा गांधींचा स्मरण दिन म्हणून पाळण्यावर भर दिला. पण त्याच दिवशी सरदार पटेल यांची जयंती असते याचा स्वत:ला विसर पाडून घेतला.
नेहरू-गांधी परिवार पटेलांची स्तुती करीत नाही हे बघून मग भाजपाने त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. यातील आश्चर्य म्हणजे पटेल स्वत: आयुष्यभर काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. पण पुढे दोहोंच्या तुलनेत भर पडली ती त्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरवून तसे विचार मांडण्याची. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ही गोष्ट तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर ठेवताना असे भासविले गेले की, १९५० साली पटेल यांचे निधन झाले तेव्हां नेहरु पटेलांच्या अंत्यविधीला हजरही राहिले नाहीत.
ए.एस.अय्यंगार यांनी या दोघांच्या संबंधांवर अभ्यास करून अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत की ज्यामुळे दोघांमधील संघर्षाचे दावे साफ खोटे ठरतात. १९४७ ते १९५० या महत्वाच्या कालावधीत नेहरू आणि पटेल यांनी एकत्रितपणे अस्ताव्यस्त भारताला अखंडत्य आणि एकजिनसी रुप प्राप्त करुन दिले या मुद्द्यावर अय्यंगार यांनी भर दिला आहे. अय्यंगार लिहितात की, ‘पटेल आणि नेहरूंमध्ये सामंजस्य होते, मतभेद कधीच नव्हते. त्याचमुळे दोघांना देशाचे तत्कालीन मुद्दे आणि अडचणी समजून घेता आल्या व त्यावर उपाय योजना करणेही शक्य झाले. त्यांच्या निर्णयांवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यांनाही दोघे बरोबरीने सामोरे गेले. नेहरूंनी तर जाहीरपणेच असे म्हटले होते की, सरदार पटेल यांना भेटल्याशिवाय, त्यांच्याशी धोरणात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होतच नाही. सरदार पटेलदेखील कुठलाही महत्वाचा निर्णय पंतप्रधानांशी चर्चा केल्याशिवाय घेत नसत. हा समन्वय देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरत होता पण काही राजकारण्यांसाठी मात्र तो निराशेचा ठरत होता’.
ही परिस्थिती अजूनही तशीच कायम आहे. इंदिरा गांधी आणि त्यांच्या वारसदारांनी जर पटेल यांचे योगदान झाकले असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रनिर्माणासाठी एकित्रतपणे झटणाऱ्या या दोघा नेत्यांमध्ये पक्षपाती दरी निर्माण केली आहे.
अय्यंगार यांनी नेहरू यांना आदर्शवादी आणि द्रष्टा नेता म्हटले आहे तर पटेल यांना व्यावहारिक आणि वास्तववादी म्हटले आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या भारताला दोघांचीही गरज होती. वास्तववादाला आदर्शवादाच्या साह्याची गरज होती. भारताला नेहरुंकडून महिला आणि अल्पसंख्यकांसाठी समान हक्काचे वचन आणि समान मतदानाचा हक्क हवा होता (ज्याला फक्त कम्युनिस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नाही तर अनेक काँग्रेस सदस्यांचाही विरोध होता). त्याच वेळी देशातील संस्थानिकांना एकत्र आणून देशात त्यांना विलीन करुन घेणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचा अध्यक्ष बनविणे या जबाबदाऱ्या पटेलाना पार पाडायच्या होत्या.
स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबाबतीत नेहरू आणि पटेल नि:संशय वेगळे होते. पण त्यांचे एकत्र येणे देशासाठी अत्यंत गरजेचे होते. दोहोंना देशाविषयी अतूट प्रेम होत आणि त्यांची बांधीलकी देशाच्या अखंडत्वाशी होती. सर्वात महत्वाचे म्हणजे दोघांनाही महात्मा गांधींच्या शिकवणुकीची जाणीव होती. अय्यंगार म्हणतात की, पटेल आणि नेहरू यांचा अविरत काम करण्यावर भर होता.
अय्यंगार यांच्याप्रमाणे मी सुद्धा क्रिकेटचा चाहता आहे. मला आठवते, १९७० साली माझ्या काही मित्रांनी विश्वनाथ यांच्याविषयी अपशब्द काढत गावस्कर यांची स्तुती केली होती. पण मी दोघांचाही चाहता होतो. त्यानंतर मी द्रविड आणि तेंडुलकर यांच्यात तुलना करण्यासही नकार दिला होता. नेहरू आणि पटेल यांच्यातली भागीदारी निश्चितच क्रि केटच्या मैदानावरील दिखाऊ भागीदारीपेक्षा महत्वाची होती. एकाची स्तुती करून दुसऱ्याचा अपमान करणे म्हणजे दोघांचाही अनादर करणे आहे आणि हे भारतासाठी घातकच आहे.
>रामचन्द्र गुहा
(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)