शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 07:17 IST

गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत. 

- अश्वनी कुमार,

माजी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री

जागतिक संघर्ष चिघळत चाललेले असताना लोकशाही जगतात राजकीय नेतृत्वाचा प्रश्न कळीचा होऊन बसला आहे. जगाच्या विविध भागात उत्पन्न झालेला वैरभाव जागतिक नेतृत्वाचे अपयशच दर्शवितो. नैतिक मूल्यांच्या बाजूने उभे राहण्यात जागतिक नेत्यांनी दाखवलेली बेफिकिरी,  दादागिरी करणाऱ्या शक्तींपुढे गुडघे टेकणे हे सगळेच फार क्लेशदायक आहे. मानवतेचा गळा घोटणाऱ्या  सत्ताउन्मादातून सुरू झालेली युद्धे चिघळत चालली आहेत. सत्तेपेक्षा मूल्यभान महत्त्वाचे आहे, हे नेत्यांच्या मनावर बिंबवणे कधी नव्हते इतके महत्त्वाचे झाले आहे. विविध देशांमधील संघर्षाने जगाला धोक्याच्या काठावर उभे केले असून, धुरिणांच्या बौद्धिक आणि नैतिक दारिद्र्यामुळे लोकशाही देश प्रेरणादायी नेतृत्व निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. 

शीर्षस्थानी असलेली संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशादेशांतील संबंध नीट राखण्यात आंतरराष्ट्रीय कायदे निरुपयोगी ठरतात हे पुन्हा एकदा दिसले. इराक व युक्रेनच्या काही भागांवर झालेली बेकायदा आक्रमणे केवळ इतिहासातील तळटीपा होऊन बसल्या आहेत. जागतिक मतैक्याचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची आज जगाला गरज आहे. सद्य:स्थितीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची शिस्त पाळली पाहिजे; प्रादेशिक वाद मिटवायला हवेत, याचे स्मरण लोकशाही जगाचे नेतृत्व करणाऱ्यांना दिले  पाहिजे. लोकशाही नेतृत्व म्हणजे मूल्यांची पाठराखण, कितीही अडथळे येवोत सदैव सत्य उचलून धरणे, दुर्बलांना बळ-आवाज देणे होय. कसोटीच्या काळात लोकांना एकत्र आणणे, अवाजवी विषमता दूर करून मानवी प्रतिष्ठा पुढे नेणे हे सारे या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. शांतता-सलोख्याच्या वातावरणात मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करता येईल, अशी सामाजिक, राजकीय परिस्थिती निर्माण करण्यावर प्रेरक नेतृत्वाने भर दिला पाहिजे.

अर्थात, नेतृत्व काही पोकळीतून निर्माण होत नाही. माणसाचा विकास, परिस्थिती, प्रदेश यातून नेतृत्व निर्माण होते. ‘माणसे आपला इतिहास घडवतात; परंतु तो त्यांना हवा तसा घडवत नाहीत’ असे कार्ल मार्क्सने म्हटले ते आजची परिस्थिती  आणि पूर्वानुभव लक्षात घेता खरेच आहे.

 भारतीय लोकशाहीने आजवर अनेक चढउतार पाहिले. नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अनेक उत्तुंग नेत्यांनी ही लोकशाही समृद्ध केली आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या नेत्यांनी बदलास अभिमुख नेतृत्व कसे असते हे दाखवून दिले आहे. महात्माजींचे राजकारण सत्तापिपासू नव्हते. उलट स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेची आस  बाळगणाऱ्या लोकमानसातून ते उमललेले होते. त्यातूनच अन्यायाविरुद्ध शाश्वत अशी अहिंसक लढाई त्यांना उभी  करता आली. 

 गांधींच्या नैतिकतेने प्रेरित राजकारणाचा वारसदार असलेला भारत देश सर्वत्र न्यायाच्या रक्षणासाठी उभा राहिला पाहिजे. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने  आता नैतिक दंड थोपटले पाहिजेत. त्याची आर्थिक ताकद, आण्विक क्षमता, प्रादेशिक शक्ती यातून आंतरराष्ट्रीय नीतीधैर्य उंचावले पाहिजे. महत्त्वाच्या मित्रांपासून बाजूला न पडता किंवा धोरणात्मक स्वायत्तता न गमावता हे घडले पाहिजे. या कठीण काळात आपण आपल्या मोठ्या नेत्यांना पाचारण करून भारतीय लोकशाहीत चैतन्य निर्माण केले पाहिजे. सध्याच्या भग्न आणि भयाकुल कालखंडात आशेचे किरण ठरण्यासाठी सत्तापिपासू वृत्तीच्या पलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेणारे राजकारण केले पाहिजे. सध्या देशांतर्गत आणि बाहेरील आव्हाने सलोख्याला धोका उत्पन्न करत आहेत. सत्तेच्या  लंबकाचे हेलकावे सामाजिक समतोलाची परीक्षा पाहत आहेत. 

अशा वेळी आपल्याला बलवान, संवेदनशील, समजूतदार, निर्णायक अशा नेतृत्वाची गरज आहे. जे नेतृत्व महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गांनी मतैक्य घडवून आणू शकेल. अन्याय आणि धुमसत्या संघर्षांपासून बोध घेऊन आपण ‘बदल घडवून आणणाऱ्यां’च्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

टॅग्स :Indiaभारत