हा हल्ला कोणाचा, कोणावर होतो आहे ?
By Admin | Updated: February 16, 2015 23:39 IST2015-02-16T23:39:51+5:302015-02-16T23:39:51+5:30
पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेने होते आहे, याचेच निदर्शक होय.

हा हल्ला कोणाचा, कोणावर होतो आहे ?
कोल्हापूरचे भूषण असलेले आणि सर्वसामान्य लोकांशी नाते सांगून काम करणारे कॉम्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे या वयाची ऐंशी पार केलेल्या लढवय्या नेत्यावर सकाळी सकाळी कोणी तरी जीवघेणा हल्ला करावा आणि तमाम महाराष्ट्र अजूनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या धक्कादायक हल्ल्यातून सावरलेला नसताना, त्याच परंपरेतील गोविंद पानसरे यांच्यावरही हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला जावा, हे अन्य कशाचेही नव्हे, तर पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेने होते आहे, याचेच निदर्शक होय. अत्यंत साध्या राहणीसाठी व त्याचबरोबर उच्च विचारसारणीसाठी सातत्याने अभ्यास करीत राहणारे कष्टकरी वर्गाचे नेतृत्व म्हणूनच गोविंद पानसरे यांच्याकडे पाहिले जाते. ते राजकारणी असले, तरी सत्तांध राजकारणी नव्हेत. कामगारांसाठी लढणारे असले, तरी केवळ संघर्षासाठी संघर्ष करणारे नव्हेत. वकिली पैशासाठी नव्हे, तर गरिबांसाठी करावयाची असते हा आदर्श मानणारे वकील आहेत. समाजातील राबणाऱ्या वर्गाच्या उन्नतीच्या मार्गावरील सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्याची तयारी करीतच ते राजकारणाकडे पाहतात. मग वर्ग-संघर्ष असो, की वर्ण वर्चस्ववादाची लढाई असो, प्रत्येक विषयावर सखोल चिंतन करून मार्ग दाखविण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न असतो. बहुजनांच्या शिक्षणाचा आग्रह धरतानाच जात-धर्मांधतेचा त्यांनी नेहमीच धिक्कार केला आहे. विकासाच्या प्रक्रियेत कष्टकऱ्यांचे स्थान नेमके कोणते असावे, हा त्यांच्या सततच्या विवेचनाचा विषय. ते जरी कम्युनिस्ट असले, तरी पोथीनिष्ठ नव्हेत. म्हणून पोथ्या लिहिण्यापेक्षा समाजाच्या प्रबोधनासाठी पुस्तिका लिहा, असे ते सतत सांगतात. ते स्वत: विद्यार्थीदशेपासून हेच सातत्याने करीत आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळच्या कोल्हारमधून ते कोल्हापुरात आले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा म्हणजे गोविंद पानसरे, असेच उत्तर द्यावे लागेल. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि जागतिक शांततेचा विचार करणाऱ्या अशा नेत्यावर सकाळच्या प्रहरी बेछूटपणे गोळीबार कोणी केला असेल? भारतीय लोकशाही ही जीवन पद्धती आहे, असे म्हणून प्रत्येकाचा विचार-आचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याची हत्त्या करण्यासाठी कोणी प्रयत्न केला असावा? हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येविषयी गेली दीड वर्र्षे विचारतो आहे. त्यात गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याची भर पडली आहे. दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर तर पानसरे अधिकच आक्रमक झाले. ते योग्यही होते. समाजातील सहिष्णुता कमी होणे किंवा ती संपणे याचा विचारही त्यांच्या मनाला शिवणार नाही. त्यातूनच त्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. दाभोलकर यांची हत्त्या आणि गोविंद पानसरे यांची हत्त्या करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला सारखाच आहे. गेले काही दिवस त्यांना पत्राद्वारे धमक्या येत होत्या. त्यांना त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत वाढलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा विचारवंताला हिंसा मान्य होणे शक्य नाही. त्यातूनच पानसरे यांनी या पत्रांकडे पाहिले असणार आहे. मात्र, प्रश्न उरतो तो हा हल्ला कोणावर आहे? तो एका गोविंद पानसरे आणि उमा पानसरे या दाम्पत्यावर आहे का? अजिबात नाही. तो पानसरे यांच्या समतेवरील हल्ला आहे. कोल्हापूरच्या मातीचा वास क्षणोक्षणी घेऊन शाहू विचार वारशाची परंपरा जपणाऱ्या विचारवंतावर आहे. हा हल्ला जरी शारीरिक असला, तरी तो समतेच्या विचारांवर केलेला आहे. त्यामुळेच हा हल्ला कोणावर आणि हा हल्ला कोण करताहेत याचे उत्तर तुम्हा-आम्हाला शोधावे लागणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येचा शोध अद्याप लागलेला नाही. तो लागावा, कोणी, कशासाठी हत्त्या करताहेत, याची माहिती पुढे आली पाहिजे, असा आग्रह गोविंद पानसरे यांनी वारंवार धरला होता. आता तसाच आग्रह पानसरे यांच्या हल्ल्याबाबत धरावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या, समतेच्या आणि पुरोगामित्वाच्या परंपरेवरील हा हल्ला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कॉमे्रड गोविंद पानसरे आपल्या प्रवृत्तीनुसार मृत्यूशी झुंज देत आहेत. तर त्यांच्या पत्नी उमा यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. गोविंद पानसरे हा विचाराचा पक्का आणि निर्धाराचा शिक्का मारून काम करणारा कामगार नेता, विचारवंत, लेखक, राजकारणी आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या उद्धाराचा आग्रह धरणे हा गुन्हा ठरावा, असे वातावरण कोण तयार करते आहे? समतेचा आग्रह धरण्याचा निर्धार कोण नष्ट करते आहे? शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगण्यास कोण अटकाव करीत आहे? शिवाजी कोण होता आणि आपण त्यांचे कोण लागतो, याचे विवेचन करणाऱ्यांना खबरदार, असे कोण म्हणतो आहे? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच गोविंद पानसरे आणि उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शोध लावणे आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येचा या अर्थाने अद्याप शोध लागलेला नाही. अशा हल्ल्यांचे प्रतिनिधित्व करणारे पुढे यायला हवेत, त्यांना बळ देणाऱ्यांना ठेचायला हवे. तसाच शोध याही प्रकरणात व्हायला हवा. सरकारच्या आणि पोलिसांच्या दप्तरी जरी हा केवळ एक खुनी हल्ल्याचा प्रकार असला तरी प्रत्यक्षात तो तसा नसून हल्ला या राज्यातील प्रबोधनाच्या चळवळीवरील हल्ला आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावरील हल्ल्यातील केवळ सकाळच्या वेळी झालेला हल्ला इतकेच साम्य नाही. तुमचा आम्ही दाभोलकर करू, अशा धमक्याच पानसरे यांना येत होत्या. त्यामुळे या प्रवृत्तीचा शोध घ्यायला हवा. संस्कृतीतील सहिष्णुता संपत चालली आहे, असे अशा वेळी वाटू लागते. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध या मार्गाने व्हायला हवा व त्याचा बंदोबस्तही...!