गोविंद पानसरे कोण आहेत...?
By Admin | Updated: February 19, 2015 00:07 IST2015-02-19T00:07:03+5:302015-02-19T00:07:03+5:30
अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत, हे आपले दुर्दैव

गोविंद पानसरे कोण आहेत...?
अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत,
हे आपले दुर्दैव
शिवाजी कोण होता..? या पुस्तिकेचे लेखक गोविंद पंढरीनाथ पानसरे यांच्यावर हल्ला करणारे तुम्हीच का गोविंद पानसरे...? असे जेव्हा विचारतात, तेव्हा महाराष्ट्रातील एका प्रबोधक वारकऱ्यावरील हल्ल्याचा कोणत्या शब्दांत निषेध करावा, हेच कळत नाही. शिवाजी विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या सागरमाळ परिसरात पानसरे यांचे घर आहे. रोज नित्यनेमाने ते विद्यापीठाच्या परिसरात सकाळी फिरायला जातात. तेथून परतताना दोन तरुण समोर आले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कोण हा गोविंद पानसरे..? की ज्याला ठार मारावे, त्याने जिवंत राहू नये, असे कोणाला वाटत असेल? काही वर्षांपूर्वी पानसरे यांनीच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली, ती रयतेच्या बाजूने होती. ती समतेचा विचार मांडणारी होती. ती गोविंद पानसरेंची नव्हती तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमी स्वराज्याच्या स्वप्नामध्ये दडलेली होती. ती फक्त गोविंद पानसरे यांनी उलगडून दाखविली. त्यावेळेपासून अलीकडच्या नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणापर्यंत गोविंद पानसरे यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत.
दोन वर्षांपूर्वी पानसरे यांना कोल्हापुरात शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या माणसाने हा पुरस्कार स्वीकारताना कोणता संकल्प केला असेल? पुढील दोन वर्षांत किमान शंभर व्याख्याने शाहू महाराज कोण होते, या विषयावर देणार आणि तोही केवळ युवकांच्या समोरच मांडणार, असा संकल्प होता. त्यापैकी ७५ व्याख्याने नुकतीच पूर्ण झाली आहेत. नव्या पिढीला शाहू महाराजांच्या विचारांची ओळख व्हावी, इतिहास समजावा इतकी माफक अपेक्षा करून आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये घडलेल्या क्रांतिकारी घटनांची नोंद घेत नव्या पिढीला इतिहास सांगणे हा गुन्हा आहे का? तो पानसरे यांनी केला आहे का?
सात वर्षांपूर्वी त्यांचा अमृत महोत्सव झाला. राजकीय पुढाऱ्यांच्या प्रमाणेच त्यांचाही भव्यदिव्य सत्कार करायचा
निर्धार कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी त्यास ठाम नकार दिला. त्यांनी बजावले की, माझ्या सत्कार समारंभावर होणाऱ्या खर्चाचे पैसे निधी म्हणून जमा करा. त्यातून मला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेत
मानाचे स्थान असलेल्या कोल्हापूरच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकायचा आहे. त्यातूनच ‘यांनी घडविले कोल्हापूर’ अशी चरित्रग्रंथमाला प्रकाशित करायला सुरुवात केली. कोल्हापूरच्या मातीमध्ये असंख्य माणसं घडली, ज्यांनी समाज घडविला, कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आणि नव्या पिढीला मार्गदर्शक ठरले. अशा जवळपास दोन डझन व्यक्तींची चरित्रे
लिहून घेतली, ती प्रकाशित केली. आपला अमृत महोत्सवी वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करणारा हाच तो गोविंद पंढरीनाथ पानसरे.
हिंदू-मुस्लीम वादाचा अन्वयार्थ लावणे असो की काश्मीरचा प्रश्न असो, मंडल आयोगाचा वाद असो की रामजन्मभूमीचा वाद असो, किंवा अगदी कोल्हापूरच्या टोलचा विषय असो. त्याची चिकित्सा करून संशोधन, अभ्यास, चर्चा करून सामान्य माणसाला कळेल, अशा पुस्तिकेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला. कोल्हापुरातल्या हातगाड्यावर भाजी विकणाऱ्यांचे प्रश्न किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या यावर ते नेहमीच अभ्यासपूर्ण बोलत राहिले. हे सर्व आपण करायचे का नाही, असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहत आहे. आजवर त्यांनी विचार, चिंतन, मनन, अभ्यास, संशोधन, लिखाण, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद याद्वारेच असंख्य विषयावर वाद-प्रतिवाद केला आहे. त्यांनी केव्हाही जाळपोळ, हाणामारी याचे समर्थन केले नाही. अशा अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत, हे आपले दुर्दैव आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य दिले आहे. ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणी दिला?
- वसंत भोसले