युद्धखोर देशाभिमान आपल्याला कुठे नेणार?
By Admin | Updated: October 24, 2016 04:14 IST2016-10-24T04:14:04+5:302016-10-24T04:14:04+5:30
उरी येथील धक्कादायक हल्ल्यानंतर समाजाच्या सर्वच क्षेत्रात युद्धखोर देशाभिमान वाढीला लागल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही क्षेत्रातील उन्मादामुळे सीमेवर युद्ध सुरू

युद्धखोर देशाभिमान आपल्याला कुठे नेणार?
विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
उरी येथील धक्कादायक हल्ल्यानंतर समाजाच्या सर्वच क्षेत्रात युद्धखोर देशाभिमान वाढीला लागल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही क्षेत्रातील उन्मादामुळे सीमेवर युद्ध सुरू असल्यासारखे भासविले जात होते. सीमेवर हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे ही बाब सत्य आहे. सर्जिकल स्ट्राइकची ही नैसर्गिक प्रतिक्रिया मानावी लागेल.
अशा वातावरणात बॉलिवूड प्रकाशझोतात आले. दहशतवादाविरुद्ध आपले जवान रक्त शिंपत असताना बॉलिवूडच्या चित्रपटात भूमिका करणारे पाकिस्तानी कलाकार हे प्रामुख्याने लक्ष्य ठरले. प्रारंभी पाकिस्तानी कलाकारांनीे उरी व अन्य हल्ल्यांचा स्पष्टपणे निषेध करावा अशी मागणी होती. या कलाकारांनी सर्वत्र झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करणारे व्यापक पत्रक प्रसिद्ध केले. मात्र यामुळे युद्धखोरांचे समाधान झाले नाही. त्यानंतर दिशा बदलून पाकिस्तानी कलाकारांऐवजी या कलाकारांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या भारतीय निर्मात्यांना लक्ष्य केले गेले. निर्माते करण जोहर (केजो) यांचा ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट २८ आॅक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झालेला आहे. त्यांनाच यामुळे लक्ष्य करण्यात आले.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘ऐ दिल...’ हा चित्रपट प्रदर्शित होईल तेथे आंदोलन करण्याची धमकी दिली. यानंतर तातडीने चित्रपटगृह मालक संघटनेने आपल्या संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी हा चित्रपट दाखविणार नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमधील सुमारे ४०० सदस्य या संघटनेचे सभासद आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये काचेच्या तावदानाच्या भिंती असून, त्यांचे नुकसान होण्याची भीती वाटल्याने संघटनेने हा निर्णय जाहीर केला. या आधीही मनसेच्या आंदोलनात आर्थिक फटका बसल्याचा इतिहास आहेच.
अशा वातावरणात ‘ऐ दिल...’चे प्रदर्शन दिवाळीत होणार की नाही याबाबत शंका उत्पन्न झाली. त्यानंतर व्यावहारिक करण जोहर यांनी समझोत्यासाठी प्रयत्न सुरू केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे या प्रयत्नांना शरणागती म्हणू शकतात; मात्र ज्यांचे करिअर आणि घामाचा पैसा पणाला लागला आहे ते काय करतील, असा प्रश्न यांना विचारायला हवा. यानंतर चित्रपट निर्मात्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. राजनाथसिंह यांना त्यांनी देशवासीयांच्या भावनांचा चित्रपट उद्योगाला आदर असल्याचे सांगत, यापुढे बॉलिवूडमध्ये कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला घेणार नसल्याचे आश्वासन दिले. या बदल्यात ‘ऐ दिल...’चे प्रदर्शन सुुलभ होण्याचे आश्वासन चित्रपट निर्मात्यांना मिळाले. या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे आणि करण जोहर यांच्यात समझोता घडवून आणला. यासाठी, चित्रपटाचे निर्माते सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये देतील, तसेच या चित्रपटाच्या प्रारंभी उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल, अशा दोन अटी घालण्यात आल्या. हा सर्व प्रकार पैशासाठी होता की मनसेच्या खंडणीखोर वृत्तीला कायदेशीर ठरविण्यासाठी केला गेला, हा खरा प्रश्न आहे.
या युद्धखोर देशाभिमानी व्यक्तींना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. भारताकडून पाकिस्तानला दोन अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या वस्तूंची अधिकृतपणे पाठवणी केली जाते. याशिवाय अनेक वस्तू या दुबईतील एजंटमार्फत दोन्ही देशांमध्ये दिल्या-घेतल्या जातात. याला अनौपचारिक निर्यात असे म्हटले
जाते. अशी अनौपचारिक निर्यात अधिकृत निर्यातीच्या दुप्पट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे
युद्धखोर देशाभिमानींकडे उद्योजक, व्यापारी यांना थांबविण्याची काही योजना आहे का किंवा ते निर्यात होणाऱ्या मालाचे ट्रक रोखणार काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. यामुळे हा युद्धखोर देशाभिमान आपल्याला कोठे नेणार, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा.
या कठीण प्रसंगी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचे मी स्वागत करतो. त्यांना आपली आतिथ्यशीलता दाखविण्याची गरज नाही. तसेच येथे पैसा आणि प्रसिद्धी कमावण्याची संधी देणेही गरजेचे नाही. क्रिकेटबाबतही आपण असेच धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट खेळले जात नाही. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी जरी सामने खेळविण्याची तयारी दर्शविली तरी भारत सरकार मात्र त्यासाठीे फारसे उत्सुक दिसत नाही. आपण पाकिस्तानबरोबर पुन्हा क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला तर स्थिती पूर्ववत झाली असा समज होईल. मात्र तशी परिस्थिती अद्याप तरी नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडताना तसेच बंदीचे अस्त्र उगारताना केवळ चर्चेनेच प्रश्न सुटू शकतात हे विसरून चालणार नाही. भारत- पाकिस्तान संबंधांबाबत विचार करताना दोन्ही देशांच्या अंतर्गत स्थितीचाही विचार करायला हवा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे भारतीय पंतप्रधानांप्रमाणे परराष्ट्र व लष्करविषयक धोरण ठरविण्यास मोकळे नाहीत. पाकिस्तानी लष्कराचा शरीफ यांच्यावर पगडा आहे. लष्करप्रमुख रशील शरीफ हे येत्या ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर येणारे लष्करप्रमुख निर्णय घेतील. तोपर्यंत सध्याची अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता दिसते. याशिवाय नवाज शरीफ यांना अन्य समस्यांचाही सामना करावा लागेल. इम्रान खान यांनी इस्लामाबादची नाकाबंदी करण्याचा इशारा दिला आहे. मागील वेळी लष्कराच्या मदतीने शरीफ यांनी इम्रान खान यांचा प्रयत्न मोडून काढला होता.
दोन्ही देशातील नागरिकांमध्ये विचारांचे आदान- प्रदान होऊन सहमतीचे वातावरण तयार होऊ शकते. सध्या त्यासाठी फारशी अनुकूलता नसली, तरी मतभेदांपेक्षा समान विचारांवर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात, हे निश्चित.
लिखाण संपविण्यापूर्वी...
‘ऐ दिल...’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील मनसेच्या भूमिकेबाबत काही गंभीर प्रश्न आहेत. काही लोक कायदा हातात घेऊन आपल्या अटी कोणावर लादू शकतात का? सैनिक कल्याण निधीसाठी देणग्या घेण्याचा अधिकार मनसेला कोणी दिला? पाच कोटींची रक्कम कशी ठरली? पश्चात्तापासाठी ही रक्कम पुरेशी आहे का? राष्ट्रीय भावना बाजूला सारून अशा संघटनांकडून हिंसाचार आणि अव्यवस्थेचे निर्माण केले जाणारे वातावरण हा चिंतेचा विषय आहे. या व्यूहरचनेमध्ये न अडकता अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.