Where did this incinerator come from in the field of scholarship? | विद्वत्तेच्या क्षेत्रात हे भस्मासुर आले कोठून?

विद्वत्तेच्या क्षेत्रात हे भस्मासुर आले कोठून?

- सुधीर लंके 
(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार व संपादक बाळ बोठे याच्यावर एका महिलेच्या खुनाच्या कटाचा गंभीर आरोप झाला. तर प्राचार्य भाऊसाहेब कराळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदावर असताना पैसे घेऊन प्राध्यापकांना नोकऱ्या दिल्याचेही प्रकरण नुकतेच समोर आले. या दोन घटनांनी विद्वत्तेशी संबंधित असणाऱ्या क्षेत्रांतील नैतिकतेबाबत भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

बोठे हा एका दैनिकाचा संपादक तर होताच. पण, वकील, डॉक्टरेट अशा पदव्या, दोन-चार डझन पुरस्कारांची व पुस्तकांची यादी तो आपल्या बायोडेटाला जोडत असे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचा तो सदस्य आहे. तो सदस्य असताना त्याची स्वत:चीच सहा पुस्तके एकाच वेळेस अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा महापराक्रम प्राचार्य बाळ कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास मंडळाने केला. जेव्हा बोठेवर खुनाचा आरोप झाला तेव्हा त्याची ही पुस्तके अभ्यासक्रमातून बाद केली जातील असे सांगण्याची नामुष्की कुलगुरुंवर आली. बोठे याने नगर जिल्ह्यातील राजकारणावर प्रबंध लिहून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. मिळविलेली आहे. तेथेही बाळ कांबळे हेच त्याचे मार्गदर्शक आहेत. कांबळे हे नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेत प्राचार्य आहेत. कांबळे यांनी आपला अधिकार वापरत आपल्या शिष्यालाच अभ्यास मंडळावर घेतले असे प्रथमदर्शनी दिसते.

एखाद्या पत्रकाराकडे संशोधकाची नजर असणे व विविध क्षेत्रांतील ज्ञान त्याने संपादन करणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, बोठे याच्या पीएच.डी. प्रबंधातील निष्कर्ष वाचल्यानंतर त्यातील तपशील व संदर्भ  ‘बाळबोध’, अतीसामान्य व विसंगत वाटतात. ‘नगर जिल्ह्यातील विखे घराणे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुढे आले’  असा एक  विसंगत निष्कर्ष हा प्रबंध नोंदवितो. अर्थात प्रबंध तपासणे हा त्याचे मार्गदर्शक, प्रबंध तपासणारे तज्ज्ञ व विद्यापीठाचा अधिकार आहे. बोठे याचा राज्यशास्त्र या विषयात सैद्धांतिक अभ्यास किती आहे? त्याच्या प्रबंधाचा व पुस्तकांचा दर्जा काय ? ही तपासणी होऊनच त्याची अभ्यास मंडळावर वर्णी लागली असेल असे गृहीत धरावे तर हे गृहीतक तरी बरोबर आहे का याची कुलगुरुंनी शहानिशा करावी.  ते चुकीचे असेल तर त्याची वर्णी लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी. पत्रकारांचे अथवा इतर कुणाचेही लांगूनचालन करण्यासाठी विद्यापीठे असा खटाटोप करत असतील तर ते गंभीर आहे. कुणाचीही वर्णी लावण्यासाठी विद्यापीठ हे काही गणेशोत्सव मंडळ नव्हे. 

रयत शिक्षण संस्थेतही असाच नैतिकतेचा खून झाला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही संस्था सुरू केली. ‘स्वावलंबी शिक्षण’ हे या संस्थेचे ब्रिद. रयतमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जात नाहीत अशी तत्त्वनिष्ठा ही संस्था सांगत आली. मात्र, या संस्थेच्या सचिव पदावर असताना प्राचार्य भाऊसाहेब कराळे व अरविंद बुरुंगले यांनी पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या, पैसे घेण्यासाठी एजंट नेमले असे आरोप पुढे आले आहेत. संस्थेने या दोघांचेही  राजीनामे घेतले. मात्र, याप्रकरणात संस्थेने गुन्हा दाखल केलेला नाही. . बहुतांश रयत सेवक आपल्या अडचणी घेऊन सचिव व सहसचिवांकडे जातात. मात्र, सचिवच लुटारू होते हे यानिमित्ताने समोर आले. त्यांना आणखी काही मंडळींची साथ असू शकते. रयतमध्ये सेवकांच्या बदल्यांसाठी अडवणूक केली जाते, प्रवेशासाठी शुल्क घेतले जाते अशा अनेक तक्रारी आहेत. रयत संस्था ‘कॉर्पोरेट’ बनविण्याची भाषा त्यांचे वारसदार करत आहेत. पण ‘रयत’मध्ये स्वावलंबनाच्या पाठाऐवजी भलतेच धडे गिरविले जाऊ लागले आहेत. 

ही संस्था पुरोगामित्वाचा वारसा सांगते. मात्र या संस्थेत गुणवत्ता व वैचारिक बांधिलकी सांगणाऱ्या प्राध्यापकांची कोंडी करुन ‘चमचेगिरी’ करणाऱ्यांची सध्या चलती आहे. ‘रयत’चा कारभार हा विद्यार्थ्यांऐवजी पदाधिकारी केंद्रित होत आहे. शैक्षणिक  व पत्रकारितेच्या क्षेत्रात अशी बदमाशी सुरू असताना संस्था, समाज हेही मौन बाळगून आहेत. चुकीला चूक व ढोंगाला ढोंग म्हणण्याचे धाडस समाज करत नाही. त्यातूनच अशा घटनांची उत्पत्ती होते. समाजमान्यता वाढत गेली की मुखवटेही सभ्य वाटू लागतात. 
म्हणून मुखवटे व खरा चेहरा याची पारख व्हायला हवी.

Web Title: Where did this incinerator come from in the field of scholarship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.