नामांतराच्या पुढे कधी जाणार?
By Admin | Updated: July 26, 2015 22:16 IST2015-07-26T22:16:29+5:302015-07-26T22:16:29+5:30
मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेबाबत १९५७ साली न्यायमूर्ती एस. एम. पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने विद्यापीठाच्या नावासंदर्भात

नामांतराच्या पुढे कधी जाणार?
मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेबाबत १९५७ साली न्यायमूर्ती एस. एम. पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने विद्यापीठाच्या नावासंदर्भात अनेक नावांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चर्चिले होते; पण त्यावेळी महाराष्ट्रात व्यक्तिवाचक नावे विद्यापीठांना नसल्यामुळे विद्यापीठास मराठवाडा विद्यापीठ हे प्रदेशवाचक नाव देण्यात आले. कालांतराने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, पंजाबराव देशमुख आदि महनीय व्यक्तींची नावे विद्यापीठास देण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठवाड्यात रोवलेली उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ आणि त्यांनी निजामाविरोधी घेतलेली भूमिका लक्षात घेता डॉ. आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन बाबासाहेबांचे उचित स्मारक उभारले जावे, अशी दलित संघटनांकडून मागणी होऊ लागली. नामांतराची मागणी आधी कुणी केली, याबाबत दलित संघटनांत अजूनही श्रेयाचे पोरकट नि निरर्थक भांडण असल्यामुळे मी त्या तपशिलात जात नाही; पण नामांतरासाठी कवी सुरेश भट म्हणतात तसे,
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला
कापले गेलो तरी सोडले नाही तुला
घे तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची ही वंदना ।
या निष्ठेने आंबेडकरानुयायांनी रक्त, अश्रू आणि घाम गाळून नामांतराचा लढा लढविला. नामांतराची मागणी जोर धरीत असतानाच मराठवाड्यात नामांतरवादी व नामांतरविरोधक, खरे तर दलित विरुद्ध दलितेतर अशा दोन फळ्या पडल्या होत्या. बंद वगैरे पुकारण्यात येत होते. दरम्यान, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव संमत केला होता. या धामधुमीतच शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ‘तो’ ऐतिहासिक खंजीर खुपसून जनता पक्षाच्या सहकार्याने (त्यात जनसंघही होता, आजचा भाजपा) पुलोदचे सरकार आणले होते. शरद पवारांचा तत्कालीन पक्ष होता समाजवादी काँग्रेस. शरद पवारांच्या पुलोद सरकारने २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या उभय सभागृहात नामांतराचा तो ऐतिहासिक ठराव संमत करून घेतला आणि मराठवाड्यात दलितविरोधी अत्याचाराचा एकच आगडोंब उसळला. शरद पवारांच्या विरोधी असणाऱ्या काँग्रेसजनांनी शरद पवार यांना गोत्यात आणण्यासाठी तेव्हा मराठवाड्यात दलितांना सळो की पळो करून सोडण्यात जसा पुढाकार घेतला, तद्वतच दलितविरोधी मानसिकता असणाऱ्या तथाकथित गांधीवादी समाजवाद्यांनीही नामांतरविरोधी भूमिका घेतल्यामुळे दलित अत्याचाराचा भडका उडाला होता. मराठवाड्यातील तत्कालीन पत्रकार एखाद-दुसरा अपवाद वगळता नामांतरविरोधी होते. (या पार्श्वभूमीवर १९८२ साली मराठवाड्यात आलेल्या ‘लोकमत’ने मात्र नामांतराची बाजू चांगलीच लावून धरली होती.)
नांदेडला एस. एम. जोशी यांच्या उपस्थितीत एक विचारवंत म्हणाले, ‘मराठवाड्यातील दंगलीची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर आहे.’ तेव्हा एस. एम. जोशी म्हणाले होते, ‘ही बाब पुराव्याने सिद्ध झाली तर मी फासावर जाईन.’ अपप्रचार तर इतका झाला, की नामांतर झाले तर पदवी प्रमाणपत्रावर डॉ. आंबेडकरांचा फोटो येणार, विद्यापीठ दलितांचे होणार, दलितांनाच नोकऱ्या मिळणार वगैरे. तात्पर्य, दलित खेडोपाडी स्वाभिमानाने जगतात, गावकीची कामे नाकारतात, बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, म्हणजेच पायरी सोडून वागतात, हा सल मनात ठेवूनच नामांतर ठरावानंतर सवर्णांच्या मनातील हिंस्रता उफाळून आली, जी अजूनही बदललेली नाही, हे वारंवार दलितांवर होणाऱ्या अन्यायाने सिद्धच होत आहे. ही चिंतेचीच बाब म्हटली पाहिजे.
नामांतर हा दलितांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा लढा होता. एकदाचे नामांतर होऊन तो संपला; पण नामांतर हाच ज्यांचा राजकीय पुढारपण टिकविण्याचा उद्योग होता, ते अजूनही नामांतर एके नामांतर करीत आपले हरवलेले आणि विश्वासार्हता पार गेलेले अस्तित्व टिकविण्याची केविलवाणी धडपड करीत असताना नामांतराचे आपणच शिल्पकार आहोत, असे भासवून आरत्या ओवाळून घेण्याचा पोरकट खेळ खेळतात, याला काय म्हणावे? नामांतर लढ्यात दलित नेते, कार्यकर्ते यांच्यासह दलितेतरांनी जो सहभाग नोंदविला, तो तरी कसा विसरावा? एस. एम. जोशी, डॉ. बाबा आढाव, बाबा दळवी, प्रा. बापूराव जगताप, कॉ. शरद पाटील, प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. बापूसाहेब काळदाते, अॅड. काशीनाथ नावंदर, अॅड. अंकुश भालेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, गं. बा. सरदार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, लक्ष्मण माने, प्राचार्य राजाराम राठोड, प्राचार्य गजमल माळी अशा कित्येक दलितेतर नेत्यांनी नामांतर लढ्यात भाग घेऊन वा पाठिंबा देऊन नामांतर लढ्यास एक नैतिक नि तात्त्विक अधिष्ठान दिले, हे कसे विसरावे? नामांतरासाठी हौतात्म्य पत्करणारे जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे असे कितीतरी ज्ञात-अज्ञात हुतात्मे नामांतर लढ्याचे खरे नायक आहेत. ते राहिले बाजूला आणि आम्हीच खरे नामांतराचे हीरो म्हणून स्वत:च्या हाताने स्वत:ची पाठ जे थोपटून घेतात, त्यांची ही कृती तरी दलित चळवळ पुढे नेणारी आहे काय?
- बी. व्ही. जोंधळे