चिखलात रुतलेले कमळ बहरणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:45 PM2020-07-27T21:45:09+5:302020-07-27T21:46:34+5:30

मिलिंद कुलकर्णी भारतीय जनता पार्टीची महाराष्टÑातील सत्ता जाऊन सहा महिने उलटले तरी पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शोक व ...

When will the mud lotus blossom? | चिखलात रुतलेले कमळ बहरणार कधी ?

चिखलात रुतलेले कमळ बहरणार कधी ?

Next

मिलिंद कुलकर्णी
भारतीय जनता पार्टीची महाराष्टÑातील सत्ता जाऊन सहा महिने उलटले तरी पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शोक व धक्कयातून अद्याप बाहेर आलेले नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून ठोस व सबळ मुद्दे घेऊन कोणताही नेता काम करताना दिसत नाही. खान्देशसह ज्या विभागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये भाजप प्रबळ आहे, तेथेदेखील चमकदार कामगिरी होताना दिसत नाही. कमळ जरी चिखलात उगवत असले तरी ते रुतणार नाही, याची काळजी पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आलेली आहे.
केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र ही घोषणा २०१९ च्या निवडणुकीत प्रभाव दाखवू शकली नाही. देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात आणि संकटमोचक गिरीश महाजन हेदेखील नाशिकसह खान्देशात दमदार कामगिरी करु शकलेले नाही. खान्देशात २०१४ मध्ये १० आमदार निवडून आले होते. २०१९ मध्ये ते आठावर आले. विशेष म्हणजे, महाजन यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेर या दोन हक्काच्या जागा पक्षाने अंतर्गत मतभेदातून गमावल्या. नंदुरबार व धुळ्यात संख्याबळ तेवढेच राहिले. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असताना खडसे-महाजन वादात पक्षाचे मोठे नुकसान झाले.
अंतर्गत मतभेदातून या पक्षाला स्वबळ, स्वशक्तीची जाणीवदेखील राहिलेली नाही, असे एकंदरीत चित्र दिसून येते. चार खासदार, एक विधान परिषद सदस्य, जळगाव व धुळ्याची जिल्हा परिषद व महापालिका, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, दोंडाईचा, शिंदखेडा, तळोदा, शहादा अशा पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सहकारी संस्थांवर प्रभाव आहे. मात्र राज्यातील सत्ता गेल्यानंतर हतबल झालेले नेते हातातील सत्ता राबविताना दिसत नाही. कोरोनाकाळात तर ही बाब अधिक ठळकपणे दिसून आली. भाजपच्या सुदैवाने महाविकास आघाडीचे मंत्री आणि लोकप्रतिनिधीदेखील फार काही चमकदार कामगिरी करु शकलेले नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करण्याची संधी असूनही भाजप कार्यकर्ते अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेत आलेले नाही, असेच दिसते.
भाजपमध्ये प्रामुख्याने दोन गट दिसून येतात. मूळ भाजपचे आणि दुसरा गट म्हणजे अन्य पक्षातून आलेले नेते, कार्यकर्ते अशी विभागणी आहे. महाराष्टÑातील सत्ता जाताच दोन्ही गट अस्वस्थ आहेत. केंद्र सरकारच्या सत्तेचा लाभ स्थानिक पातळीवर फारसा मिळत नाही. स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यात असल्या तरी त्यात ‘आयारामां’चा अधिक प्रभाव असल्याने निष्ठावंत नेहेमीप्रमाणे उपाशी, वंचित असेच राहिले आहेत. हा असंतोष मोठा आहे. ‘आयाराम’ हे कधी ‘गयाराम’ होतील, याची शाश्वती नसल्याने संशय व अविश्वासाचे वातावरण कायम आहे.
आता भाजपवर प्रभाव कुणाचा आहे, हे दोन घटनांमधून दिसून आले. अलिकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यात गिरीश महाजन, जयकुमार रावल हे निष्ठावंत सहकारी ठळकपणे दिसून आले. तसेच गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत देखील फडणवीस यांचा प्रभाव दिसून आला. एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले. खडसे यांना गिरीश महाजन, डॉ.सुभाष भामरे, डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासह विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट केले. त्यांच्या स्रुषा खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तरीही खडसे फारसे समाधानी नाहीत, अशी चर्चा आहे. जयकुमार रावल यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. प्रदेश सदस्य म्हणून धुळ्याच्या डॉ.माधुरी बोरसे, धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तळोद्याचे डॉ.शशिकांत वाणी, जळगावच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा समावेश आहे.
जळगावचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर जळगावचे आमदार सुरेश भोळे यांची निवड करण्यात आली. जावळे यांच्या नियुक्तीच्यावेळी सरचिटणीस सुनील नेवे यांना झालेली मारहाण पाहता यंदा भोळे यांची नियुक्ती करुन पक्षाने वाद टाळण्यावर भर दिलेला दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘शतप्रतिशत’चा विषय सोडा, पण भाजप कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचे मोठे आव्हान आता भाजपच्या नेत्यांपुढे आहे. हे आव्हान ते कसे पेलतात, यावर रुतलेले कमळ चिखलातून बाहेर येते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: When will the mud lotus blossom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.