म्हादईचे नष्टचक्र कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 08:17 PM2019-12-20T20:17:09+5:302019-12-20T20:17:27+5:30

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने अद्याप संपूर्णत: सोडून दिलेला नाही. ही टांगती तलवार गोव्यावर कायम राहणार आहे.

When will Mhadai's destruction cycle end? | म्हादईचे नष्टचक्र कधी संपणार?

म्हादईचे नष्टचक्र कधी संपणार?

Next

- राजू नायक

म्हादई नदीच्या कळसा आणि भंडुरा या उपनद्यांचे पाणी वळविण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित ठेवण्यात आले असले तरी गोव्यावरचे संकट अजून संपूर्णत: दूर झालेले नाही अशी शंका गोव्यात व्यक्त होते, ती चुकीची नाही. गोवा या प्रश्नावर गेली २५ वर्षे लढत आहे. केंद्राने या संदर्भात नेमलेल्या जल लवादाच्या निर्णयाला दोन्ही राज्यांनी आव्हान दिले आहे. परंतु तो मुद्दा प्रलंबित असता, केंद्राने राजकीय दबावाखाली कर्नाटकला पाणी वळविण्यास मंजुरी देऊन टाकली. त्यामुळे केंद्र सरकार गोव्यासारख्या छोटय़ा राज्याला कितीसे खिजगणतीत घेईल, असा प्रश्न उपस्थित होतो.

म्हादई नदी कर्नाटकातून पश्चिम घाटातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या भीमगड अभयारण्यात उगम पावून गोव्यात येते. या नदीचे पाणी कर्नाटकला हुबळी-धारवाडचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथील मलप्रभा जलाशयात वळवायचे आहे. बागलकोट, गदग, धारवाड व बेळगावला पाणीपुरवठा करण्यासाठी ७.५६ टीएमसी पाणी वळविण्याची ही मूळ योजना. त्यासाठी कर्नाटकला तीन बंधारे उभारावे लागतील; हा मार्ग ४९९.१३ हेक्टर वनजमिनीतून जातो व त्यासाठी ४०६.६ हेक्टर वन क्षेत्रावर संक्रांत ओढवणार आहे. जल लवादाने कर्नाटकला ३.९० टीएमसी पाणी वळविण्यास मान्यता दिल्यानंतर गोवा व कर्नाटकने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत; परंतु त्या दरम्यान गेल्या महिन्यात कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकांत राजकीय फायदा मिळविण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने पाणी वळविण्यास मान्यता देऊन टाकली.

हा प्रकल्प भीमगड अभयारण्यात मोडतो व म्हादई अभयारण्याला अत्यंत निकट आहे. परंतु आम्ही कायद्याचे रक्षण करू म्हणणा-या कर्नाटकने गेल्या १५ वर्षात या भागात बरीच मोठी बांधकामे करून टाकली असून न्यायालयाच्या आदेशांकडेही सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम असा की गोव्यात येणा-या नदीचा प्रवाह सध्या खूपच कमी झालेला आहे.

गोवा राज्याचा सत्तरी तालुका या नदीवर बव्हंशी अवलंबून आहे. पाणी वळविले गेल्यास या भागातील शेती, कुळागरे व मत्स्यजीवनही धोक्यात येणार आहे. शिवाय खारे पाणी आत येऊन आणखी विध्वंस होण्याची भीती आहे. पर्यावरणाचा समतोल ढळेल, तो वेगळा!

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला पाणी वळविण्यासंदर्भात पत्र देताना गोव्याकडे साधी विचारणाही केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. आंदोलन सुरू झाले आहे आणि लोक नव्या मुख्यमंत्र्यांना अत्यंत ‘कमकुवत नेता’ संबोधू लागले आहेत. ‘‘म्हादाईचा ओघ आटत चालला आहे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमाही पातळ होत चालली आहे,’’ अशी टिप्पणी एक सामाजिक कार्यकर्ते आयरीश रॉड्रिग्स यांनी केली. कार्यकत्र्यानी म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्याची भूमिका ठामपणे मांडावी, केंद्रापुढे लोटांगण घालू नये.

दुर्दैवाने, राजकीय कारणासाठी कर्नाटकच्या दबावापुढे नमते घेणारे केंद्र चिमुकल्या गोव्याला वाटाण्याच्या अक्षता लावेल, अशी भीती येथे व्यक्त होते. केंद्राने उपनद्यांचे पाणी वळविण्यासंदर्भात पत्र मागे घेतले असले तरी हे संकट संपूर्णत: दूर झालेले नाही. कर्नाटक बेदरकारीने बांधकाम पुढे रेटेल व पाणी वळविण्यास सुरुवात करेल, अशीच सध्याची स्थिती आहे. गेले दोन दिवस कर्नाटकात त्यासाठी आंदोलनही सुरू झालेले आहे. गोव्याचा प्रभाव केंद्रात पडत नाही. गोव्याचे भाजपा नेतेही हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: When will Mhadai's destruction cycle end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.