शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

दूरदेशी मराठी मनात दिवाळीचा दिवा पेटतो, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 08:56 IST

आता इथे अमेरिकेत सगळं काही मिळतं; पण आईच्या हातच्या चकल्या, तेल-उटणं-अभ्यंगस्नान या आठवणींचे तरंग उठतातच प्रत्येक दिवाळीला!

- शिल्पा केळकर(सॉफ्टवेअर कंपनीच्या अमेरिकास्थित संचालक)

‘आर यू सेइंग यू एन्जॉइड ब्लोइंग अप थिंग्ज व्हेन यू वेअर यंग? दॅट्स काइन्ड ऑफ स्केअरी, यू नो!’-  शब्दांत पकडण्यात तरबेज असलेल्या माझ्या मुलीने विचारलेल्या या प्रश्नाने मी खाडकन तंद्रीतून भानावर आले होते. अमेरिकेतल्या दिवाळीचे दिवस. प्रत्येक वर्षी माझ्या लहानपणीच्या दिवाळीची एक आठवण मी माझ्या मुलीला सांगत असे. माझ्याविषयीचा तिचा आदर वाढावा याचा एक प्रयत्न असावा तो. पण, यावेळी बेत चांगलाच फसला होता. दिवाळी संपली, की आम्ही बनवलेल्या किल्ल्याच्या  भुयारात लक्ष्मी तोटा ठेवून तो कसा उडवून देत असू याचे वर्णन करून सांगत होते. ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य आणि मग भीती दिसली हे मी माझ्याच नादात असल्याने मला कळलेदेखील नसावे. तिने विचारलेल्या प्रश्नाने मात्र मला भूतकाळातून खाडकन वर्तमानात आणले. मी सांगत असलेल्या अगदी साध्या-निष्पाप फटाक्याचा उपयोग, पण तिचे वर्तमानातले संदर्भ वेगळेच होते. माझ्या मनातली दिवाळीची सुंदर आठवण  ऐकताना तिला या काळातले बॉम्बस्फोट आणि दहशतवाद्यांची आठवण येईल हे माझ्या लक्षातच आले नाही. मी थोडी खजील झाले. मग, मी तिचा नाद सोडून दिला; आणि माझी मी एकटीच दिवाळीचे सगळे रंग मनात रंगवू लागले.

दिवाळी एकच पण आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या रंगात साजरी केली. अगदी लहानपणी नवीन फ्रॉक, खाण्याची चंगळ आणि आईने तेल चोपडून आंघोळ घालून दिली की दिवाळी साजरी होत असे. एकदम सरळ-साधी सुगंधी दिवाळी. मोठे होऊ लागल्यावर होलसेल मार्केटमधून फटाके आणायला गेलेल्या बाबांची वाड्याच्या दाराशी बसून वाट बघितलेल्याच्या आठवणी आजही झगझगीत आहेत मनात. ते आले की फटाक्यांचे वाटप होई. सगळ्यांना एकसारखे मिळण्याच्या अट्टाहासापायी मी अगदी लवंगी फटाक्याची माळही अर्धी कापून घेत असे. हळूहळू त्या दारूच्या वासाची आणि फटाक्यांच्या आवाजाची नशा उतरून मग दिवाळीला रंग चढला तो रांगोळीचा. दिवाळीवर असलेला फराळाचा खमंग रंग मात्र अगदी पक्का कायमचा बसलेला. आई आणि वाड्यातील सगळ्या काकू-मावशी एकत्र फराळाचे करत असत. मग, फराळाच्या ताटांचं वाटप. दुसऱ्या कोणाचं ताट आलं की त्याची पूर्ण चिकित्सा केली जाई. कोणाच्या चकल्या अलवार होतात, शंकरपाळी कोणाची खुसखुशीत असतात, शेजारच्या काकू सर्व फराळ विकत आणतात; पण घरी बनवल्याचं खोटंच सांगून शाबासकी मिळवतात!.. या आणि अशा अनेक बातम्यांची देवाणघेवाण फराळांच्या ताटांबरोबर चाले.

दिवाळीचे हे परिचयाचे रंग उतरून जाऊन तिला एक वेगळाच रंग चढला, जेंव्हा घर, आपली माणसं आणि देश या सर्वांपासून लांब जाऊन दूरदेशी दिवाळी एकट्याने साजरी केली तेंव्हा. साऱ्याच गोष्टी लुटुपुटीच्या वाटल्या. आईने केलेले पदार्थ आठवून तसेच करण्याचा केलेला असफल प्रयत्न. मग मनाची काढलेली समजूत. लक्ष्मीपूजनाला साळीच्या लाह्या मिळत नाहीत म्हणून वापरलेल्या राईस क्रिस्पीज, बत्तासे नाहीत म्हणून वापरलेली शुगर कँडी. हे असं करता करता परदेशी दिवाळीला रंग चढला तो अशा बदली वस्तूंचा. गुलाबजामसाठी खवाच हवा, नरकचतुर्दशीला उटणंच हवं, असले अट्टाहास कमी होऊ लागले. स्वत:ची आणि इतरांची कल्पकता वापरून जे मिळेल त्यात दिवाळी साजरी करण्यात वेगळाच आनंद वाटू लागला.  विविध पर्याय शोधून केले जाणारे अत्यंत चविष्ट फराळाचे पदार्थ दिवाळीचा मानबिंदू असत. इटालिअन रिकोटा चीजचे गुलाबजाम, फ्रेंच पेस्ट्रीशीटस वापरून बनणाऱ्या करंज्या-चिरोटे. मेक्सिकन टॉरटीआजचे  शंकरपाळे; विविध देशातली सामग्री एकत्र येऊन भारतीय दिवाळीचा फराळ बनला, की ‘हे विश्वची माझे घर’ याचा साक्षात्कार मला  होत असे आणि अजूनही होतो.

बरीच वर्षे दिवाळीला घरची आठवण काढण्यात आणि तिथल्या दिवाळीच्या प्रकाशाने इथली घरे उजळण्यात गेली. हळूहळू जग लहान होत गेले. जागतिकीकरणामुळे परदेशात राहणाऱ्या लोकांना आपल्या सण-उत्सवांचा आनंद लुटण्याची संधी मिळते आहे. दिवाळी, गणेशोत्सव यांसारख्या भारतीय सणांसाठी लागणाऱ्या वस्तू आता अमेरिकेत आणि अन्य देशांत सहज उपलब्ध होतात. यामुळे परदेशात राहणाऱ्या लोकांना ‘घरासारखे’ वाटते, त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहता येते. आकाशकंदील-फटाके-पक्वान्ने फक्त भारतीय दुकानातूनच नाहीत तर कॉस्टकोसारख्या अमेरिकन दुकानांतूनही आता सहज मिळू लागली आहेत. खरेतर, ‘घर’ हे केवळ कोणत्याही भौतिक वस्तूंमध्ये नसते तर त्या वस्तूंबरोबरच आठवणी आणि संस्कार जोडलेले असतात. सगळे काही मिळाले तरीही आईच्या हातच्या खमंग भाजणीच्या चकल्या, तेल-उटण्याचा सुगंध, अभ्यंगस्नान या मागे सोडलेल्या आठवणींचे तरंग उठतच राहतात प्रत्येक दिवाळीला. मात्र, आता त्या आठवणींनी मन उदास होत नाही, तर भुसभुशीत मातीप्रमाणे मोकळे होते. त्या मातीला ओलावा मिळतो तो अनुभवाच्या मुठीतील क्षणांचा. मग, त्या मातीतून एका वेगळ्या वैश्विक दिवाळीचे हिरवे कोंभ तरारून येतात आणि मनातल्या इंद्रधनुषी दिवाळीचे रंग सुवासिक होऊन जातात.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024