मुख्यमंत्री स्वत:च जातीवर उतरतात तेव्हां...

By Admin | Updated: October 26, 2016 05:12 IST2016-10-26T05:12:53+5:302016-10-26T05:12:53+5:30

ज्याला न भूतो म्हणता येईल असाच हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जेव्हां स्वत:च आपण केवळ जातीने ब्राह्मण आहोत म्हणून आपणाला

When the Chief Minister himself falls on the caste ... | मुख्यमंत्री स्वत:च जातीवर उतरतात तेव्हां...

मुख्यमंत्री स्वत:च जातीवर उतरतात तेव्हां...

ज्याला न भूतो म्हणता येईल असाच हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जेव्हां स्वत:च आपण केवळ जातीने ब्राह्मण आहोत म्हणून आपणाला पदावरुन हटविण्यात येणार नाही, असे जाहीर विधान करतात तेव्हां त्यास जातीवर उतरणे नाही म्हणायचे तर काय म्हणायचे असते? गेले सुमारे दोन महिने राज्यातील मराठा समाज आपल्या काही मागण्यांसाठी प्रचंड मोठ्या उपस्थितीमधील मूक मोर्चे आयोजित करीत आहे. या मागण्यांमधील दोन प्रमुख मागण्या म्हणजे सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण आणि दलित-आदिवासी अत्त्याचार विरोधी कायद्याला विश्रांती. पैकी पहिल्या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे निदान सकृतदर्शनी तरी दिसून येते. मराठा मोर्चांपासून प्रेरणा घेऊन अन्य मागासवर्गीय, दलित आणि मुस्लीम या समाजांचेही मोर्चे निघत आहेत. पण यापैकी एकाही मोर्चाने उघडपणे फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना हटवा अशी मागणी आजवर तरी केलेली नाही. मुख्यमंत्री म्हणून ते रयतेला न्याय देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणे वेगळे आणि त्यांच्या जातीवर जाऊन ती करणे साफ वेगळे. अर्थात याचा अर्थ त्यांचे जातीने ब्राह्मण असणे कोणाला खटकतच नाही असे मात्र अजिबात नाही. मुद्दा इतकाच की आपण पांघरलेले सर्वसमावेशकतेचे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या वारशाचे आणि निधर्मी व जातरहित राजकारणाचे उसने अवसान गळून पडू नये म्हणून कोणी तशी उघड मागणी केली नाही व करणार नाही, इतकेच. सबब फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा घास घेण्यासाठी अनेकजण टपले आहेत हा माध्यमांनी व्यक्त केलेला (अचूक) अंदाज आहे. पण अशा अंदाजास सत्य मानून दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर करणे म्हणूनच औचित्यास फारकत देणारे ठरते. देशात लोकशाही आहे व लोकशाहीत बहुसंख्या हाच एक निर्णायक निकष मानला जातो. त्या न्यायाने महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला राज्याची सत्ता सदैव आपल्याच हाती असावी असे वाटत राहाणे तार्किक आणि सयुक्तिकच ठरते. स्वाभाविकच जेव्हां केव्हां राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठेतर व्यक्तीची योजना केली जाते तेव्हां तेव्हां मराठा समाज अस्वस्थ होऊन उठतो, हे प्राचीन वास्तव आहे. ज्यांना १९७२ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आठवत असेल त्यांना हेदेखील आठवत असेल की मुंबईतील मालाड मतदारसंघात खुद्द इंदिरा गांधी यांनी न्या.माधवराव परांजपे यांना उमेदवारी दिली होती व निवडून आले तर ते मुख्यमंत्री बनवले जातील अशी जोरात चर्चा काँग्रेस पक्षात सुरु झाली होती. पण परांजपे पडले. विरोधात मृणाल गोरे विजयी झाल्या. त्याच वेळी राज्यात काँग्रेसने २७० पैकी तब्बल २२२ जागा खिशात घातल्या होत्या. यात परांजपे कसे पडले याची उकल करण्याची गरज नाही. यातून एक झाले, इंदिरा गांधी यांच्या मनात राज्यातील प्रस्थापित काँग्रेस नेत्यांविषयी अढी बसली. हे प्रस्थापित कोण आहेत याची साऱ्या महाराष्ट्राला जाण आहे. स्वाभाविकच इंदिरा गांधींनी अंतुले, बाबासाहेब भोसले, शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले, पण या प्रस्थापिताना कधीच थारा दिला नाही. अर्थात त्यांच्या पुढ्यात या प्रस्थापितांचीही कधी डाळ शिजली नाही. त्याची दोन कारणे. बाईंचा करारी व कडक स्वभाव व त्यातून पक्षावर असलेली त्यांची जरब आणि देशातील कोट्यवधी जनतेला त्यांच्याविषयी वाटणारा विश्वास. पुढे राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले तेव्हांही थोडीफार चलबिचल निर्माण झालीच होती. पण पुन्हा तेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढ्यात बोलण्याची कोणाचीच हिंमत आणि प्राज्ञा नव्हती. या संदर्भात त्या काळात लोक गंमतीने असेही म्हणत असत की, मनोहर जोशी आणि शरद पवार हे बालपणी जत्रेत हरवलेले सख्खे भाऊ आहेत. असो. मुद्दा हा की, इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात एक सीमित पण आश्चर्यकारक साम्य होते. दगडालाही शेंदूर फासून त्याला देवत्व प्राप्त करुन देण्याची किमया आणि ताकद त्यांना प्राप्त होती. विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या बाबतीतही असेच म्हणता येऊ शकेल. अन्यथा भाजपातील आणि शिवसेनेतीलही नर्मदेतले अनेक गोटे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तळाशी न जाता तरुन जाऊच शकले नसते. तेव्हां फडणवीसांनी अंतुले जे म्हणत असत, ते पाठ करावे. ‘जोवर मॅडमचा हात माझ्या डोक्यावर आहे तोवर सारी २८८ डोकी माझ्या विरोधात गेली तरी माझे काहीही वाकुडे होणे नाही. उलट साऱ्या २८८ जणांचे हात माझ्या डोक्यावर आले आणि मॅडमनी त्यांचा हात काढून घेतला तर मला कोणीही वाली राहाणार नाही’! इत्यर्थ निदान आज देवेन्द्रांना प्राप्त असलेला मोदींचा वरदहस्त जोवर कायम आहे, तोवर त्यांना चिंता नाही. मग अकारण जीभ विटाळून घेण्यात काय हशील आहे?

Web Title: When the Chief Minister himself falls on the caste ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.