प्रदूषण कशा कशाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 04:44 IST2016-07-20T04:44:40+5:302016-07-20T04:44:40+5:30
एकूणच दैनंदिन जीवन प्लास्टिकमय झाले आहे. सोय, सुविधा आम्ही पाहिली; पण परिणामाकडे काणाडोळा केला. त्याचा फटका तर बसणारच.

प्रदूषण कशा कशाचे?
एकूणच दैनंदिन जीवन प्लास्टिकमय झाले आहे. सोय, सुविधा आम्ही पाहिली; पण परिणामाकडे काणाडोळा केला. त्याचा फटका तर बसणारच.
बातम्यांच्या गर्दीत एक बातमी दुर्लक्षित राहिली; म्हणण्यापेक्षा ती हरवली. ना तिची चर्चा ना तिचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले. औरंगाबादपासून ३० कि़मी. अंतरावर म्हैसमाळ नावाचे थंड हवेचे तसेच पर्यटन स्थळ आहे. गिरीजा देवी, व्यंकटेश्वर बालाजी ही मंदिरेही प्रसिद्ध. त्यामुळे बाराही महिने तिथे लोकांचा राबता असतो. पर्र्यटन विकास महामंडळाने तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. गेल्या आठवड्यात म्हैसमाळ गावातील शंभरावर गुरे दगावली आणि आणखी काही गुरांची प्रकृती खालावली. एका खेड्यात गुरांची संख्या चार-पाचशे. त्यात शंभरावर गुरे दगावणे ही हाहाकार माजविणारी गोष्ट. गुरे हा शेतीचा मुख्य आधार. कोणत्याही रोगाची साथ नसल्याने मृत्यूचे कारण सापडेना. तज्ज्ञांचे पथक पोहोचले. दोन वर्षांच्या दुष्काळामुळे कुपोषणाचे कारण असावे असा अंदाज निघाला. जनावरे सडली असल्याने शल्यचिकित्सा करता आली नाही. शेवटी तपासाअंती पोटात प्लास्टिक गेल्याचे भयानक सत्य पुढे आले.
प्लास्टिकचे प्रदूषण कसा बळी घेऊ शकते याची ही झलक समजायची का? बाराही महिने पर्यटक आणि भक्तांचा राबता असल्याने म्हैसमाळच्या विस्तीर्ण माळावर प्लास्टिकचा कचरा पसरलेला दिसतो. प्रसाद, विविध पदार्थांचे पुडे, गुटख्याच्या पुड्या, शिवाय मंदिरामध्ये ज्या पंगती उठतात त्यातही प्लास्टिकच्या पत्रावळीचा सर्रास वापर होतो. पळस, कमळाच्या पानांच्या पत्रावळी आता ‘एथनिक’ समजल्या जातात. त्या वापरातून हद्दपार झाल्या आहेत. एकूणच दैनंदिन जीवन प्लास्टिकमय झाले आहे. सोय, सुविधा पाहिली; पण परिणामांकडे काणाडोळा केला. त्याचा फटका तर बसणारच. माळरानावर चरणारी गुरे गवताबरोबर हा प्लास्टिक कचरा खातात आणि त्यांची पचनसंस्था बिघडते. यातूनच म्हैसमाळचा प्रकार घडला.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येतात. कचरा गोळा करुन विल्हेवाट लावतात; पण अशा संस्थाचे प्रयत्न तोकडे पडतात. पर्यावरण नियंत्रण मंडळ नावाचे एक सरकारी खातेही यासाठी निर्माण केले आहे. ते खरोखरच काम करते का? प्लास्टिकसारख्या प्रदूषणाने खेड्यातही प्रवेश केला. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणि दंडाचा केवळ देखावा होतो. प्लास्टिकची कॅरीबॅग नष्ट होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. आपण किती वेगाने प्रदूषण करतो याची कल्पना करवत नाही. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण मानव, प्राणी, वनस्पती यावर परिणाम करणारे आहे. भारतात तर भूगर्भातील पाण्यामध्येही प्लास्टिकचे अंश सापडतात. वाऱ्यामुळेही प्लास्टिकचे प्रदूषण होते. प्लास्टिक जाळले तर त्यातून विषारी वायू बाहेर पडतो. असे हे प्लास्टिक विषारी रसायने वापरुन तयार केले जाते. आज शहरे प्लास्टिकच्या कचऱ्यांनी ओथंबून वाहात आहेत. पर्यटनस्थळी तर पाहायलाच नको. सार्वजनिक स्वच्छतेविषची एकूणच अनास्था असणाऱ्या आपल्यासारख्यांमुळे ही समस्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणून पुढे आली आहे. कागदी बॅग नष्ट होण्यासाठी केवळ सहा दिवस लागतात. शेवटी घटकाभराची सोय म्हणून प्लास्टिक स्वीकारायचे की पर्यावरणपूरक कागद हा विवेकाचा प्रश्न आहे. यासाठी प्रबोधन आणि त्यानंतर कडक कायदेशीर कारवाईची गरज आहे. फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करुन चालणार नाही. कायदे अस्तित्वात असतील; पण त्याची परिणामकारक अंमलबजावणी हवी. आपल्याकडे कारवाई ही दिलेला कोटा पूर्ण करण्यासाठी असते. वाहतूक पोलिसाने महिनाभरात दंडाच्या इतक्या पावत्या फाडाव्या असे उद्दिष्ट दिले की, वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा पावत्या फाडण्यावर भर दिला जातो. पर्यावरण संरक्षण कायद्याचेही असेच आहे. खरे तर हे कामातील प्रदूषण आधी थांबले पाहिजे.
- सुधीर महाजन