शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते?

By shrimant mane | Updated: June 24, 2023 08:47 IST

जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो?

- श्रीमंत माने(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)

मृत्यू म्हणजे काय, तो होतो म्हणजे नेमके काय होते, आपले धर्मग्रंथ व मिथके सांगतात तसे आत्मा शरीर बदलत राहतो का, प्रवचनकार सांगतात किंवा सिनेमात दाखवतात तसे खरेच दिव्याच्या स्वरूपात कुडीतून निघून जाणारा प्राण स्वत:चा चेहरा, निचेष्ट पडलेले शरीर पाहत आकाशाकडे जातो का? 

- माणसाला जन्मापेक्षा मरणाचे कुतूहल जास्त आहे हे खरेच. कारण, मृत्यूनंतर जिवाचे काय होते किंवा स्वर्ग, नरक खरेच अस्तित्वात आहेत का हे सांगायला कुणी परत येत नाही. अमूक एक असे असे होते म्हणजे नुसत्या कल्पनाच. त्यामुळेच विज्ञानापुढे हे मृत्यूचे गूढ उकलविण्याचे आव्हान मानले गेले. जे जे अज्ञात, गूढ त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न विज्ञान करते. म्हणून मृत्यूचे गूढ जाणून घेण्यासाठी होणारे प्रयोगही खूप. संशोधकांना मृत्यूचे कुतूहल, तर सामान्यांना अमरत्वाचे आकर्षण. अमर व्हायचे असेल तर मृत्यूची प्रक्रिया समजायला हवी. तरच ती थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील ना!  मेसोपोटेमियातील उरूकचा राजा गिल्गामेशच्या अनेक दंतकथांपैकी जगप्रसिद्ध कथा मृत्यूवर विजय मिळविण्यात आलेल्या अपयशाची आहे. आपण चक्रवर्ती सम्राट असूनही जीवलग मित्राचे प्राण वाचवू शकलो नाही, अमरत्व मिळाले नाही, ही त्याची निराशा. हिंदू संस्कृतीत अमरत्वासाठी केलेल्या तपश्चर्येच्या कितीतरी कथा आहेतच.

सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रेस्यूसिटेशनचा शोध लागेपर्यंत म्हणजे १९५९ पर्यंत असे मानले जायचे की हृदय बंद पडले म्हणजे मृत्यू झाला. सीपीआरमुळे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्याचे तंत्र गवसले. अनेकांचे जीव वाचू लागले. अगदी वीस मिनिटांपर्यंत बंद हृदय सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. हृदय बंद पडणे म्हणजे मृत्यू नसल्याने असा पुनर्जन्म झालेल्यांचे अनुभव मृत्यूचे गूढ जाणून घेताना कामी येऊ लागले. त्या अवधीत काय झाले हे ते सांगू लागले. मेंदूतील काही पेशी मृत्यूनंतरही बराच वेळ कार्यरत राहतात, ते वेगळेच. 

त्याशिवाय अल्झायमर, डिमेन्शिया, स्क्रिझोफ्रेनिया यांसारख्या मेंदूशी संबंधित आजाराच्या रुग्णांचे अनुभव याबाबत लक्ष्यवेधी आहेत. न्यूयॉर्क लँगोन हेल्थचे फिजिशियन सॅम पर्निया, तसेच सेंटर फॉर हॉस्पाइन अँड पॅलियाटिव्ह केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफर केर यांनी केलेल्या स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या अंतिम क्षणांच्या अभ्यासात आढळून आले, की मृत्यूच्या दारात पाेहोचल्यानंतर या रुग्णांची स्मरणशक्ती अचानक उसळी मारते. आप्तस्वकीय व मित्रमंडळींची नावेच नव्हे, तर अगदी लहानपणीच्या गोष्टी, नावे-गावे सारे काही चमत्कार वाटावे असे आठवायला लागते. ते चांगले बोलायला, खायला-प्यायला लागतात. हे मृत्यूच्या काही तासच नव्हे तर काही दिवस, काही महिनेही आधी होते. अवतीभोवती जमलेल्या नातेवाइकांच्या आशा पल्लवित होतात. त्यांना वाटते, की रुग्ण बरा झाला. प्रत्यक्षात तसे नसते. म्हणतात ना दिवा विझताना मोठा होतो. तसे हृदय कमकुवत होताच त्यांच्या मेंदूने दिलेला तो प्रतिसाद असतो. मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाला की तो मिळविण्यासाठी मेंदू अधिक कार्यशील होतो. वैद्यक विज्ञान त्याला होमिओस्टॅटिक मेकॅनिझम म्हणते. हा ‘लास्ट डिच एफर्ट’ असतो. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास वाढतो. रुग्ण मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करीत असताे.

यासोबतच स्मृतिभ्रंशाचा आजार नसलेल्यांच्या अंतिम क्षणी मेंदूतील क्रियांविषयीचे काही अभ्यास अमेरिकेतील प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने केले आहेत. त्यांचे निष्कर्ष गेल्या मे महिन्यात जाहीर करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी याच संस्थेने उंदरांच्या मेंदूची सक्रियता मोजली होती. या दोन्ही अभ्यासांमध्ये सहभागी, मिशिगन विद्यापीठातील श्रीमती जिमो बोर्जिगिन यांच्या मते, या सगळ्यांच्या मुळाशी हृदयाची स्पंदने आहेत. हृदयविकारानंतर काही मिनिटांत मेंदूतील गॅमा लहरींची सक्रियता वाढते. त्यामुळे मेंदू अधिक ताजातवाना, अधिक सचेतन होतो. सारे काही आठवायला लागते. या अकस्मात सक्रियतेचे केंद्र कवटीच्या मागच्या बाजूला, पोस्टेरिअर कॉर्टिकल हॉटझोनमध्ये असते. आपण त्याला लहान मेंदू म्हणतो व शरीराचा सगळा तोल त्यावर अवलंबून आहे, असे मानतो. नाना पाटेकरांच्या भाषेत छोटा दिमाग!

याविषयीचे धार्मिक समज, श्रद्धा बाजूला ठेवून अभ्यासक वर्षानुवर्षे निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस अर्थात एनडीईचे संकलन करीत आले आहेत. अलीकडे अशा ६२५ जणांचे अनुभव नोंदले गेले. अर्थातच, ते भन्नाट आहेत. शरीर सोडून जात असतानाच्या संवेदना कोणत्या असतात, तर स्वत:चा चेहरा व अचेतन शरीर पाहत आपण दूर निघून जात असल्याचे, अगदी आनंदाने अंधारलेल्या बोगद्यातून चालत प्रकाशाकडे निघाल्याचे जाणवते. म्हणजे जीव स्वत:च प्रकाश बनतो किंवा तो प्रकाशाकडे चालू लागतो. पण, हे स्वप्न अथवा भ्रम नसतो. वास्तवातच तसे घडल्याचा अनुभव येतो. - पण, याबाबत थोडे सावध राहायला हवे. कारण, मादक द्रव्यांचे सेवन करणाऱ्यांचेही अनुभवही असेच आहेत. नैसर्गिकरीत्या मृत्यू समीप आलेल्यांच्या अनुभवांशी त्याचे कमालीचे साधर्म्य आहे. विविध प्रकारच्या १६५ मादक द्रव्यांच्या परिणामांचा अभ्यास केला असता, विशेषत: केटामाइन हे मादक द्रव्य सेवन करणाऱ्यास मृत्यूला स्पर्श केल्याची अवस्था प्राप्त होते. स्वत:चे अचेतन शरीर, शांत चेहरा पाहत आपण अनंताच्या प्रवासाला निघालो आहोत, ही ती अवस्था असते. 

टॅग्स :Deathमृत्यू