बचावाचा मतलब?
By Admin | Updated: February 3, 2016 03:02 IST2016-02-03T03:02:39+5:302016-02-03T03:02:39+5:30
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या बचावार्थ शरद पवार पुढे येणे त्यांच्या दृष्टीने पक्षकर्तव्य म्हणून कदाचित अनिवार्य असेलही पण भुजबळांनी घेतलेले निर्णय

बचावाचा मतलब?
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या बचावार्थ शरद पवार पुढे येणे त्यांच्या दृष्टीने पक्षकर्तव्य म्हणून कदाचित अनिवार्य असेलही पण भुजबळांनी घेतलेले निर्णय त्यांचे एकट्याचे नव्हते तर त्यांच्या प्रत्येक निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी होती असा जो काही युक्तिवाद पवारांनी केला आहे त्याचा नेमका मतलब काय? मुुुुुुुुुुुुुुुुुुळात पवार जे काही सांगत आहेत ती भुजबळ यांचीच भूमिका आहे. पण भुजबळ तेथे थांबत नाहीत. ते म्हणतात, चौकशी आणि चौकशी पाठोपाठ कारवाई करायचीच झाली तर मग तत्कालीन मु्ख्यमंत्र्यांपासून साऱ्यांचीच करा. सरकारच्या सामूहिक नेतृत्व आणि जबाबदारीच्या तत्त्वास हे अनुसरुनच आहे. पण मग पवारांना हा युक्तिवाददेखील मान्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्याला पवारांची तयारी आहे का असा त्याहून महत्वाचा प्रश्न यात दडलेला असतो. मुळात अंमलबजावणी संचालनालय असो की लाचलुचपत प्रतिबंध विभाग असो, त्यांच्या लक्ष्यस्थानी छगन भुजबळ आहेत की त्यांचे कुटुंबीय आहे? कारण पवार जो बचाव करीत आहेत तो मोठ्या भुजबळांचा आणि ते परदेशी रवाना झालेले असताना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे ती छोटे भुजबळ म्हणजे माजी खासदार समीर भुजबळ यांना. पवारांनी या अटकेवरही आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपाच्या एका खासदाराच्या सूचनेवरुन समीर यांना अटक केल्याचे म्हटले आहे. हा खासदार म्हणजे किरीट सोमय्या तर नव्हे? वास्तविक पाहाता कोणत्याही राजकारण्याला अटक केली गेली किंवा त्याच्या विरुद्ध खटला दाखल केला गेला तर त्यावर एकच प्रतिक्रिया असते आणि ती म्हणजे ‘कायदा त्याचे काम चोख करील, आपला न्यायसंस्थेवर विश्वास आहे’. मग कोणाच्या सांगण्यावरुन का होईना अटका आणि खटले होत असतील तर इतके कासावीस होण्याचे कारण काय?