बाबासाहेब, काय हे?
By Admin | Updated: April 20, 2017 02:38 IST2017-04-20T02:38:23+5:302017-04-20T02:38:23+5:30
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली.

बाबासाहेब, काय हे?
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली. मुंबईच्या दादर भागातील आंबेडकर भवनाच्या बाबतीत गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचा राग मनात धरून त्यांना ही मारहाण केली गेली. गायकवाड यांनी आंबेडकर भवनच्या बाबतीत जे काही केले ते चूक की बरोबर हा वादाचा आणि चर्चेचा विषय असला तरी त्यांना मारहाण करणे ही कृती अत्यंत खालच्या पातळीवरची आहे. गायकवाड यांच्यावर राग होताच, तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता, अशी जी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी दिली, तीदेखील तेवढीच चुकीची आहे. गायकवाड यांचे म्हणणे पटले नसेल तर ते कसे चुकीचे आहे, माहिती आयुक्तांना अशा भूमिका घेता येतात का, असे प्रश्न उपस्थित करून प्रा. डोळस आणि त्यांच्या पक्षाला सनदशीर मार्ग अवलंबता आले असते. पण तसे न करता आमच्या विरुद्ध जाल तर फोडून काढू म्हणणे ही तालिबानी वृत्ती झाली. समतेचा आणि शिक्षणाचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोळस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती कशी मान्य होणार? आज जर बाबासाहेब असते तर ते या सगळ्यावर कसे वागले असते, त्यांची प्रतिक्रिया काय घडली असती? याचे उत्तरही प्रा. डोळसांनी द्यायला हवे. एरव्ही टीकाटिप्पणी करताना पुढे असणारे पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल बाळगलेले मौन हेही अक्षम्य आहे. आज आंबेडकरी जनतेला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्यासाठी उच्च आणि परदेशी शिक्षणासाठीचे वातावरण गावागावांत तयार करण्याची गरज असताना ते काहीही न करता अशी मारहाण करत जर कार्यकर्ते फिरू लागले तर त्यातून समाजाची घोर उपेक्षा होईल त्याचे काय? बाबासाहेबांनी ‘शिका आणि संघटित व्हा’ असा नारा दिला. मिळालेली विद्या समाजाच्या भल्यासाठी वापरावी हे त्यांना अभिप्रेत होते. ‘विद्या विनयेन शोभते’ असेही एक वचन आहे. ज्याच्याजवळ विद्या असते, ज्ञान असते तो कायम नम्र असतो असा त्याचा सरळ अर्थ. पण या कृतीने तो अर्थदेखील निरर्थक ठरला आहे. बाबासाहेबांनाही या कृतीचा पश्चाताप झाला असता. प्रकाश आंबेडकरांना काय वाटले, ते मात्र अजूनही समजलेले नाही..!