‘त्याचा’ काय संबंध?
By Admin | Updated: February 13, 2017 23:35 IST2017-02-13T23:35:07+5:302017-02-13T23:35:07+5:30
एक सुप्रसिद्ध तरुण स्त्री. तिचा अतीव यशस्वी असा बॉयफ्रेंड. दोघेही प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार. त्या प्रसिद्धीबरोबर हल्ली येणारे फॅन फॉलोइंग आणि चहुमार्गांनी येणारी संपत्ती याला काही कमी नाही.

‘त्याचा’ काय संबंध?
एक सुप्रसिद्ध तरुण स्त्री. तिचा अतीव यशस्वी असा बॉयफ्रेंड. दोघेही प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार. त्या प्रसिद्धीबरोबर हल्ली येणारे फॅन फॉलोइंग आणि चहुमार्गांनी येणारी संपत्ती याला काही कमी नाही. त्या दोघांनी आपले नाते ‘स्वीकारलेले’ नसले, तरी प्रयत्नपूर्वक ‘लपवलेले’ही नाही. पुरुषांच्याच म्हणून ठरवल्या गेलेल्या जगात ‘तिने’ एकटीचे पाऊल उचलले, तेव्हा कोण कौतुक झाले होते तिचे! पण आता पहिल्या यशाच्या बळावर ती दुसरे पाऊल उचलू गेली, तसा काही माध्यमांना कंठ फुटला. आपापल्या ‘सूत्रां’चा हवाला देऊन लोक बोलू लागले, ‘तिला एकटीला कसे जमेल हे? चेहरा तिचा असला, तरी यामागे तिचा बॉयफ्रेंड असणारच!’ ती स्वाभाविकच संतापली... तिने स्वच्छ सांगून टाकले, माझे व्यावसायिक काम माझ्या एकटीच्या बळावर आणि हिमतीने करण्यास मी समर्थ आहे. त्याच्याशी ‘अन्य’ कुणाचा संबंध जोडण्याचे भलते उद्योग कुणी न केले तर बरे! ही कहाणी आहे अनुष्का शर्मा आणि अर्थातच विराट कोहली यांची! अनुष्काच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘फिलौरी’ हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होतो आहे. ‘फिलौरी’च्या निर्मितीमध्ये विराट कोहलीचा सहभाग असल्याची पुडी काहींनी सोडून दिली आणि समाजमाध्यमात चर्चा सुरू झाल्या. एरवी ‘अशा’ प्रसंगी गप्प बसण्याचा शहाणपणा स्वीकारणाऱ्या अनुष्काने यावेळी मात्र मौन सोडून या भोचक ट्रोल-टोळ्यांना स्पष्ट शब्दात बजावले आहे. ‘माझ्या चित्रपटांची निर्मिती आणि प्रमोशन करण्याची हिंंमत माझ्याकडे आहे’ असे ठणकावून सांगणारी अनुष्का बॉलीवूडच्या बदलत्या पिढीचे खणखणीत प्रतिनिधित्व करते. व्यक्तिगत संबंधांचे ‘सार्वजनिकीकरण’ करून त्यातून व्यावसायिक फायदा साधून घेण्याला सोकावलेल्या बॉलीवूडच्या दुनियेत आपले खासगी आयुष्य निकराने ‘खासगी’च ठेवणारी अनुष्का आणि तिचे स्वतंत्रपण आग्रहाने जपणारा विराट ही ‘खासगीपणाच्या सार्वजनिक चिखलात’ली तरुण, उमेदीची झुळूक आहे. व्यक्तिगत नात्याची प्रतिष्ठा जपण्याचे हे असे धडे जेव्हा प्रसिद्धीच्या झोतातली तरुण युगुले देतात, तेव्हा त्यांचे महत्त्व मोठे असते. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीत आलेल्या बॅडपॅचला त्याची अनुष्काबरोबरची जवळीकच कारणीभूत असल्याचे गृहीत धरून अनुष्कावर तुटून पडलेल्या ट्रोलधाडीला विराटनेच स्पष्ट शब्दात फटकारले नव्हते का? आता त्याच्या उत्तुंग यशाचे वादळ क्रिकेटच्या मैदानावर सुसाट सुटलेले असताना तोल सुटलेल्या टीकाकारांना अनुष्काने सुनावले; हे उत्तमच!