- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली) दोन मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. भाजपच्या प्रवासात हा निकाल अनेक अर्थाने नवे पर्व सुरू करील, असे मानले जाते. पक्षाची अखिल भारतीय पोहोच त्यामुळे दिसून येईलच. शिवाय एकंदर राजकारणावर मोदी-शहा यांची भक्कम पकड येणाऱ्या काळात असेल का, हेही सिद्ध होईल. याचा अर्थ असा नव्हे की भाजपच्या योजनेत आसाम, पुदुच्चेरी, केरळ, तामिळनाडू या राज्यांतल्या निवडणुका महत्त्वाच्या नाहीत. मात्र सध्या भाजपचा सगळा जोर तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातून पश्चिम बंगाल हिसकावून घेण्यावर दिसतो आहे. आसाम राखायचे, पुदुच्चेरीत एन आर काँग्रेससोबत राहायचे असा भाजपचा मानस दिसतो. केरळात मार्क्सवाद्यांनी सत्ता राखली तरी चालेल पण काहीही करून काँग्रेसला चेपायचे असा भाजपचा इरादा आहे. केरळमधील काँग्रेसजनांना भाजपने सताड दारे उघडून दिलीच होती. डाव्यांशी भाजपचा मूक समझोता झाला असल्याचे दिल्लीतली माहीतगार सूत्रे सांगतात. त्या मोबदल्यात डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला मदत करायची असे ठरले आहे. “आगे राम पोरे वाम” (आधी राम नंतर वाम) अशी डाव्यांची बंगालमध्ये घोषणा आहे, असे म्हणतात. त्याचा अर्थ असा की, आधी ममताला हरवा; भले या वेळी भाजप का निवडून येईना? २०१७ साली भाजप पंजाबात असा खेळ खेळला होता. आपचा पराभव व्हावा म्हणून पक्षाने अमरिंदरसिंग यांना मदत केली. म्हणून तर राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या सापळ्यात कसे अडकले हे गोंधळात टाकणारे आहे. ममतांशी हातमिळवणीचा देकार त्यांनी धुडकावला होता.ममता अडचणीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी जात्याच लढवय्या आहेत. आजवर त्या पुष्कळ लढल्या, पण २०२१ ची ही लढाई त्यांना जड जाईल असे दिसते आहे. त्या उतरल्या तेंव्हाच रणमैदान खराब होते. १० वर्षांची अँटी इन्कम्बन्सी, अनेक वजनदार नेत्यांनी पक्ष सोडून जाणे, त्यातच पुतण्या अभिषेक बॅनर्जीचा पक्षात उदय, भाजपने हिंदू मते एकवटणे अशा अनेक अडचणी ममतांसमोर उभ्या राहत गेल्या. मुस्लीम मते विभागली जातात किंवा कसे हे २ मे रोजीच कळेल. ओवैसी हा घटक दुर्लक्षून चालणार नाही. बिहारमध्ये राजद - काँग्रेसला ओवैसींनी फटका दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश भेटीत मथुआ मंदिराला भेट दिली. ४० ते ४५ जागांवर या भेटीचा थेट परिणाम होणार आहे. शिवाय सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी यांसारख्या तपाससंस्थांनी प्रत्येक निवडणुकीवर प्रभाव टाकला आहे हे कसे विसरता येईल? आता २ मे पर्यंत वाट पाहायची, हेच खरे! बंगालनंतर भाजपचे मोठे लक्ष्य
West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 04:44 IST