ये दोस्ती हम नही छोडेंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:29 IST2017-10-27T00:29:46+5:302017-10-27T00:29:55+5:30
एका रविवारी विनोद मनाचा हिय्या करून सचिनच्या घरी गेला. तेव्हा सचिन गरमागरम कांदेपोहे चापत होता.

ये दोस्ती हम नही छोडेंगे
- संदीप प्रधान
एका रविवारी विनोद मनाचा हिय्या करून सचिनच्या घरी गेला. तेव्हा सचिन गरमागरम कांदेपोहे चापत होता. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला आणि जोरात ओरडली... सचिन, पेपरवाला आलाय. मागच्या महिन्यात तीन दिवस पेपर टाकला नव्हता याने. त्याचे पैसे कापून बिल दे. तेवढ्यात सचिन बाहेर आला. पाहतो तर दारात विनोद. ये विनोद आत ये. आज कस काय येणं केलंस, सचिनने प्रश्न केला. सचिन, अरे मित्रा. लग्न करायचं, नवीन घर घ्यायचं म्हणतोय. स्टेशनजवळ टॉवर होतोय तिथे. अरे वा, उत्तम. घेऊन टाक मग, सचिन हसत बोलला. पण पैशाची तंगी आहे. तसे मी ३० लाख जमा केले आहेत इकडून-तिकडून. पण आणखी १० लाखांची गरज आहे. सचिनचा चेहरा सर्रकन बदलला. विनोद, तू पोहे खातोस का, सचिनने विषयाला बगल देण्यासाठी प्रश्न केला. लागलीच स्वयंपाकघरातून आवाज आला. पोहे संपले बरं का... सचिननं दोन वेलची केळी विनोदपुढं धरली. विनोद, अरे मी तुला केली असती मदत पण मी कालच मर्सिडीज बुक केलीय. तिचा इएमआय तुला माहीत आहेच. विनोदनी मान हलवली आणि तो वेलची केळी टेबलवर ठेवून निघून गेला. काही दिवसांत सचिनची कोरी मर्सिडीज आली. विनोदच्याच टॉवरमध्ये सचिनने आलिशान फ्लॅट बुक केला. थर्टी फर्स्टच्या रात्री सोसायटीत विनोद आणि पंटर पार्टीला जमले. पार्टी रंगात असताना कुणीतरी विनोद-सचिनच्या मैत्रीचा विषय काढला आणि अचानक विनोद भसाड्या आवाजात दोस्त दोस्त ना रहा... गाऊ लागला. रडू लागला. त्याला आवरताना इतरांची पुरेवाट झाली. दसºयाला सचिन टॉवरमध्ये राहायला गेला. विनोदनी रिडेव्हलपमेंटला जाणाºया इमारतीत फ्लॅट घेतला. दिवाळीला जुन्या सोसायटीत सचिन-विनोद फराळाला जमले. जो तो सचिनशी बोलू पाहत होता. तेवढ्यात कोपºयात बसलेल्या विनोदकडे सचिनचे लक्ष गेलं. दोघांची गळाभेट झाली. सोसायटीतील सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांनी ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गीत गायलं. गातांना दोघांचे डोळे डबडबले. कार्यक्रम संपल्यावर दोघे निघाले. सचिन सहकुटुंब मर्सिडीजमध्ये बसला आणि भुर्रकन दिसेनासा झाला. विनोद रिक्षा... रिक्षा करीत नकार ऐकून शेवटी बसस्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत राहिला...