आपलाही डायनासोर

By Admin | Updated: July 23, 2015 23:17 IST2015-07-23T23:17:08+5:302015-07-23T23:17:08+5:30

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते.

We also dinosaurs | आपलाही डायनासोर

आपलाही डायनासोर

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते. संशोधनांती काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा समावेश असलेले अहवालही नियमितपणे प्रकाशात येत असतात. असाच एक अहवाल नुकताच सार्वजनिक झाला आहे. ब्रिटनच्या विदेश व राष्ट्रकुल कार्यालयाद्वारा गठित करण्यात आलेल्या शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या एका गटाने, वातावरणातील बदलांमुळे संभवणाऱ्या धोक्यांबाबत स्वतंत्र अभ्यास केला. या गटाने दिलेला एक इशारा भारतासंदर्भातील आहे. गटाच्या अहवालात म्हटले आहे, की जागतिक सरासरी तपमानात एक अंश सेल्सिअसने जरी वाढ झाली तरी, उत्तर भारतातील लोकाना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घराबाहेर पडून कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक काम करता येणे अशक्य होण्याची ४० टक्के शक्यता आहे. जागतिक सरासरी तपमान चार अंश सेल्सिअसने वाढले, तर घराबाहेर अगदी साध्या स्वरूपाची कामे करणेही अशक्यप्राय होऊन बसण्याची शक्यता ३० टक्के असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी न झाल्यास, गंगेच्या खोऱ्यातील जागतिक सरासरी तपमानात वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्यामागच्या कारणांबाबत शास्त्रज्ञांमध्येच दोन गट पडले आहेत. जागतिक तपमानवाढीसाठी केवळ मनुष्य प्राण्याचे नसते उद्योगच कारणीभूत नसल्याचे मानणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटानुसार, जागतिक तपमानवाढीचे सारे खापर केवळ मनुष्य प्राण्यावरच फोडणारा गट, त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष खूप फुगवून भीतीदायक वातावरण तयार करतो. ताज्या अहवालातील एक अंश तपमानवाढीबाबतचा इशारा कदाचित त्याच पठडीतला म्हणता येईल. आयपीसीसीच्या अहवालानुसार, १८८० ते २०१२ या १३२ वर्षांच्या कालखंडात जागतिक सरासरी तपमानात ०.८५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. म्हणजेच तपमानात एक अंशाने वाढ होण्याचा धोका काही आगामी काही वर्षातच संभवत नाही, तर त्यासाठी एखाद्या शतकाचाही कालावधी लागू शकतो आणि चार अंश वाढ ही तर खूपच दूरची गोष्ट भासते. दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही अशा अहवालांच्या बातम्या देताना पुरेशी माहिती व आवश्यक ते संदर्भ देण्याची तसदी घेत नाहीत. जागतिक तपमानवाढ हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असून या जागतिक संकटावर मात करण्यात यश येऊ शकेल. पण तारतम्य न बाळगल्यास मात्र भविष्यात कधी तरी मानव जातीच्या वाट्यालाही डायनासोरसारखा उच्चाटनाचा धोका येऊ शकतो.

Web Title: We also dinosaurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.