लोकशाहीसाठी सावधानता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:23 IST2019-01-18T06:23:19+5:302019-01-18T06:23:29+5:30
अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलामुलींना त्या देशाचे नागरिकत्व जन्मजात हक्काने मिळते. तेथे जन्मलेल्या अनेक मेक्सिकन मुलामुलींना मिळालेले असे नागरिकत्व ट्रम्प यांना रद्द करायचे आहे.

लोकशाहीसाठी सावधानता
अमेरिकेच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प यांच्याएवढा अहंमन्य अध्यक्ष झाला नाही. जी गोष्ट मनात आणली ती पूर्ण करण्यासाठी आपले सरकार थांबले वा अडले तरी त्याची पर्वा ते करीत नाहीत. आपल्याला हवा असलेला निर्णय राबवण्यासाठी ते अनेकदा टोकाची भूमिका घेतात. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यादरम्यान एक अनुल्लंघ्य भिंत बांधून मेक्सिकोतून अमेरिकेत बेकायदेशीररीत्या येणाऱ्या लोकांना पायबंद घालण्याच्या आकांक्षेने ते एवढे वेडावले आहेत की त्या भिंतीसाठी लागणारा पैसा द्यायला तेथील विधिमंडळाने (काँग्रेस) नकार दिला तेव्हा इतर खात्यांच्या रकमा त्या कामाकडे वळविण्याची व त्यासाठी सरकारातील तब्बल २२ खाती बंद करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्या ‘बंद’ खात्यात काम करणाºयांचे पगार थकले व त्यांच्यात स्वाभाविकच असंतोष निर्माण झाला. याआधी या भिंतीच्या बांधकामाचा निम्मा खर्च आपण मेक्सिकोकडून वसूल करू असे ते म्हणत होते. त्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी आता काँग्रेसकडे त्या पैशाची मागणी चालविली आहे.
काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाउस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह’चा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अधिकार चालतो. ते हाउस आता डेमोक्रेटिक म्हणजे विरोधी पक्षाच्या ताब्यात गेले आहे. शिवाय ट्रम्प यांच्या पक्षातील अनेकांचाही त्या भिंतीला विरोध आहे. अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलामुलींना त्या देशाचे नागरिकत्व जन्मजात हक्काने मिळते. त्यामुळे तेथे जन्मलेल्या अनेक मेक्सिकन मुलामुलींना ते प्राप्तही झाले आहे. ट्रम्प यांना त्यांचे नागरिकत्व रद्दही करायचे आहे. मात्र त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती करायला त्यांच्याजवळ काँग्रेसमध्ये पुरेसे बहुमत नाही. आपल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी रशियाची मदत घेतली, या आरोपाची चौकशी तेथील काँग्रेस करीत आहे. मंत्री, अधिकारी, सरकारी वकील व इतरांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकारही ते बेबंदपणे वापरत आहेत. लोकमत विरोधात आहे, परंतु त्यांच्या घोषणांवर खूश असलेल्या कडव्या उजव्या मताच्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यातून त्यांनी मुस्लीम देश, युरोपातील मित्र देश आणि द. अमेरिकेतील लहानसहान देश यांच्याशी उघड वाद घातला आहे. चीन आणि रशियाशी करयुद्ध सुरू केले आहे आणि युरोपीय देशातील अमेरिकन फौजा मागे घेण्याची व ‘नाटो’ ही संघटना मोडण्याचीही भाषा ते बोलत आहेत. अनेक देश त्यांच्या अशा बेबंद उपद्व्यापांमुळे कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांच्या या उद्दाम वागणुकीला अनैतिक वर्तनाचीही जोड आहे. मात्र त्यांना त्याची पर्वा नाही. असा महाभियोग मंजूर व्हायला हाउसचे संपूर्ण बहुमत आणि सिनेटचे (वरिष्ठ सभागृह) दोन तृतीयांश बहुमत लागते. ते तसे होत नाही तोवर सरकारची खाती बंद पडली काय, त्यांच्या कामकाजात खंड पडला काय, ट्रम्प यांना त्याची काळजी नाही. किंबहुना आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी ते कोणतीही किंमत चुकवू, अशा मानसिकतेने अध्यक्षपदाचा कारभार पाहत आले आहेत.
आपले पद सुरक्षित असले की लोकशाहीचे सरकारही केवढे उद्दाम एककल्ली आणि हुकूमशाही वळणावर जाऊ शकते याचे ट्रम्पएवढे मोठे उदाहरण जगात दुसरे नाही. अध्यक्षीय निवडणुका २०२० च्या नोव्हेंबरात व्हायच्या आहेत. तोवर आपली मनमानी करायला ट्रम्प मोकळे आहेत. पक्ष विरोधात, विधिमंडळ विरोधात, अनेक प्रमुख न्यायाधीश नाखूश आणि माध्यमेही विरोधात. तरीही ट्रम्प यांची मुजोरी कायम आहे. या काळात ते किती बेदकारपणे कोणते निर्णय घेतील आणि ते जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करतील याचा नेम नाही. आपल्या हेकेखोरपणाने ट्रम्प यांनी ते भूषवत असलेल्या पदाची शान घालवली आहे. त्यामुळे केवळ लोकशाही आहे आणि निवडणुका होतात म्हणून जनतेने शांत बसण्याचे कारण नाही. आपल्या सत्ताकाळात ट्रम्पसारखा पुढारी देशाचे कायमचे नुकसान करू शकतो. त्यामुळेच ‘अखंड सावधता’ हीच लोकशाहीची खरी मागणी आहे असे म्हटले जाते. त्यातून अमेरिकेच्या लोकशाहीला
तीनशे वर्षे होत आली. त्यामुळे तर इतर लोकशाही देशांनी हे सावधपण किती जपले पाहिजे याची कल्पना साºयांना करता यावी. अनेक लोकशाही देशांचे हुकूमशाहीत अलीकडे रूपांतरही झाले आहे हे येथे महत्त्वाचे.