सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत!
By गजानन दिवाण | Updated: May 17, 2025 06:58 IST2025-05-17T06:58:11+5:302025-05-17T06:58:36+5:30
लुकलुकत्या हजारो काजव्यांनी झाडांना घातलेल्या दिव्यांच्या माळा; ही मोठी मौज खरीच! पण या उन्मत्त काजवे महोत्सवांची ‘किंमत’ कोणी मोजायची?

सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत!
गजानन दिवाण, सहायक संपादक, लोकमत, छ.संभाजीनगर
वळवाच्या पावसाचे वेध लागताच काजव्यांचा मिलन उत्सव सुरू होतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी नर काजवे लुकलुकत असतात. तसे पाहिले तर काजव्यांचे हे खासगी जीवन; मात्र माणसांना ते फार आकर्षित करते. याच आकर्षणापोटी अभयारण्याचे सर्व नियम पायदळी तुडवून शेकडो-हजारो माणसे मे-जूनमध्ये कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा रोमँटिक सीन पाहण्यासाठी जातात. दरवर्षी साधारण ३० हजार पर्यटक येथे जातात. काही जण रात्री तंबूमध्ये तिथेच मुक्काम करतात. वाहनांची वर्दळ, चालण्या-बोलण्याचा गोंधळ, वाहनांचे हेडलाइट, मोबाइलच्या बॅटऱ्यांचा लख्ख प्रकाश, हॉर्न आणि कधीकधी संगीतदेखील. साधारण महिनाभर हा धिंगाणा चालतो. अभयारण्याच्या कुठल्या नियमावलीत हे बसते?
‘काजवा महोत्सव वगैरे काही नसते’ असा वनविभागाचा युक्तिवाद. ‘या काळात म्हणजेच मे-जूनमध्ये जेवढे पर्यटक येतात त्यांना आम्ही गेटवर पावती घेऊन आत सोडतो. रात्री नऊनंतर प्रवेश दिला जात नाही’, असे ते सांगतात. आत गेलेल्यांनी जास्तीत जास्त रात्री दहा वाजेपर्यंत बाहेर यावे, हा इथला नियम. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांच्या जागेत तंबूची व्यवस्था केलेली असते. काही पर्यटक रात्रभर या तंबूत मुक्काम करतात. ही गावे आणि या गावकऱ्यांच्या मालकीची जागा हे तसे अभयारण्याचेच क्षेत्र. या महोत्सवातून स्थानिकांना रोजगार मिळतो; ही त्यातली सकारात्मक बाब. त्यांना तो मिळायलाच हवा; पण अभयारण्यात म्हणजे संरक्षित क्षेत्रात हे सारे घडते त्याचे दु:ख.
हीच बाब संगमनेरचा ३८ वर्षीय तरुण गणेश बोराडे याला खटकली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात त्याने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर कंत्राटदाराला ३९ हजार झाडे लावायला भाग पाडणारा हाच तो गणेश. यासाठी त्याने पाच वर्षांची कोर्टवारी केली. कोरोनाकाळात गणेशनेही हा काजवा महोत्सव अनुभवला. ‘दो गज की दूरी’ असलेला तो काळ. तेव्हादेखील बाजार भरावा असा प्रसंग होता. अभयारण्यात जे काही टाळायला हवे ते सारे केले जात होते. त्यामुळेच गणेशने आता ‘या महोत्सवाची नियमावली काय?’ हा प्रश्न घेऊन न्यायाधिकरणात धाव घेतली आहे.
भंडारदरा, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, रंधा धबधब्याजवळ, भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी, लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्रात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. हौशी पर्यटक काजव्यांच्या लखलखाटाचा नैसर्गिक आनंद घेऊन थांबत नाहीत. त्यांना या काजव्यांसोबत सेल्फी हवी असते. ते बसलेल्या झाडांचा क्लोजअप हवा असतो. यासाठी पुरेसा प्रकाश नसेल तर वाहनांचे हेडलाइट, मोबाइलची बॅटरी हवी असते. हे काजवे बाटलीबंद करून घरी न्यायचे असतात. अभयारण्यातली शांतता दूरच, बाजारातला गोंगाट कमी वाटावा अशी स्थिती. या गोंगाटामुळे जंगलातील पक्षी, प्राणी, कीटकांचे काय होत असेल? त्यांचा अधिवास किती जणांच्या पायदळी तुडवला जात असेल? आपल्या घरात एखाद्या पाहुण्याने यावे आणि आपले रोजचे शेड्यूल आणि शांतता भंग करावी यातला हा प्रकार.
जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांनी झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे, हे चित्र पाहायला कोणाला नाही आवडणार? पण, या आवडीची किंमत ती किती? आणि ती कोणी मोजायची? राखीव क्षेत्र म्हणजे अभयारण्याचे ठिकाण सोडून बाजूच्या गावांमध्ये काजवे दिसतात. प्रमाण कमी-जास्त असेल. त्या ठिकाणी असे महोत्सव का भरवले जात नाहीत? अभयारण्यात भरवायचे तर कडक नियम का नाहीत? वाहनांचे पार्किंग बाहेर का नाही? येणाऱ्यांच्या संख्येला मर्यादा का नाही? मोबाइल, कॅमेऱ्यावर बंदी का नाही? जंगल, त्यातील पक्षी, प्राणी, कीटक माणसाने पाहायलाच हवेत. समजून घ्यायलाच हवेत. तरच जंगल का वाचवायला हवे, हे समजेल. मात्र, या नावाखाली पर्यटकांचा हा धिंगाणा अभयारण्यात असाच सुरू राहिला तर उद्या काजव्यांचा लखलखाट पाहायला मिळणार नाहीच. अभयारण्य, त्यातील पक्षी, प्राणी आणि एकूणच जैवविविधता संपुष्टात येईल. अशा पर्यटनातून वनविभाग आणि स्थानिकांना चार पैसे मिळतात हे छानच. अशा पर्यटनाचे स्वागतही आहे; पण सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारायला सोकावलेल्या बेबंद उत्साहाचे काय करावे?
Gajanan.diwan@lokmat.com