व्ही.के. सिंग नावाचे वादळ
By Admin | Updated: October 25, 2015 02:10 IST2015-10-25T02:10:35+5:302015-10-25T02:10:35+5:30
जनरल व्ही.के.सिंग यांनी दलित मुलांच्या हत्येबद्दल केलेले विधान आतापर्यंत सर्वत्र पोचले आहे. प्रथेप्रमाणे सिंग यांनी आपल्या विधानाचा संवेदनशील खुलासाही केलेला आहे.

व्ही.के. सिंग नावाचे वादळ
दांडपट्टा / - डॉ. दीपक पवार
जनरल व्ही.के.सिंग यांनी दलित मुलांच्या हत्येबद्दल केलेले विधान आतापर्यंत सर्वत्र पोचले आहे. प्रथेप्रमाणे सिंग यांनी आपल्या विधानाचा संवेदनशील खुलासाही केलेला आहे. काही काळापूर्वी असे करायला राजकीय नेत्यांना पत्रकार परिषद घ्यायला लागायची, नाहीतर एखादं परिपत्रक तरी काढायला लागायचं. आता तेवढे कष्ट करावे लागत नाहीत. काहीही बोलून मग एखादी फेसबुक पोस्ट टाकली किंवा टिष्ट्वट केलं तरी चालून जातं. म्हणजे लोकांना तुमची लबाडी माहीतच असते, पण त्यातून सुटण्याचा व्हायरल मार्गही तुम्हाला उपलब्ध असतो. आयुष्याची तीनेक दशके लष्करात काढलेल्या माणसाला शिस्तीचे इतके वावडे असावे, याचा अर्थ मेंदूच्या मध्यवर्ती यंत्रणेत अपरिवर्तनीय बिघाड झालाय, असे समजायला हरकत नाही.
जनरल सिंग यांचे असे कशामुळे झाले असावे? हा प्रश्न विचारण्याआधी जनरल व्ही.के.सिंग भारतीय जनतेला नेमके कधीपासून माहीत झाले ते बघूया. साधारणपणे भारतात एका विशिष्ट पदापर्यंतचे लष्करी अधिकारी भारतीय जनतेला अपवादानेच माहीत असतात. याचे कारण पाकिस्तानसारखे आपले लष्कर जळी-स्थळी-काष्ठी - पाषाणी दिसत नाही आणि ते योग्यच आहे. अगदी या देशातल्या काही हौशी मंडळींना आपल्याकडे लष्कराची सत्ता हवी, असं वाटत असलं, तरी हा देश आणीबाणीचा अपवाद वगळता कायम लोकशाही राहिल्यामुळेच लोकांना असं बोलण्याची चैन परवडतेय. ही पार्श्वभूमी लक्षात घेता युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणारे, क्वचित शहीद झालेले अधिकारी आपल्याला माहीत असतात. त्या व्यतिरिक्त संरक्षण दलाशी संबंधित चर्चेच्या वेळेस अधनंमधनं लष्कराचा उल्लेख होतो, पण ते तेवढ्यापुरतंच. लष्कराने आणि त्याच्या विचाराने बराकीत राहिलं पाहिजे, ही भूमिका आपण ठामपणे अंमलात आणल्याचा तो परिणाम आहे.
जन्मतारखेच्या वादामुळे जनरल सिंग पहिल्यांदा लोकांपुढे आले. त्यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या तारखा अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत चर्चिल्या गेल्या. तो काळ यूपीए -२ वरची सार्वत्रिक टीका सुरू होण्याचा होता. त्यामुळे आपल्यावर सरकार अन्याय करतेय, असे चित्र निर्माण करण्यात सिंग यशस्वी झाले. दरम्यान, अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनालाही मित्रांची गरज होती. शत्रूचा शत्रू तो मित्र या नात्याने त्यांनी जनरल सिंग यांना सोबत घेतलं. चेकाळलेल्या मीडियाने त्यांना प्रसिद्धीही भरपूर दिली. आधीच मर्कट तशात मद्य प्याला या न्यायाने सिंग यांनी ती प्रसिद्धी आपल्या कर्तृत्वालाच आहे अशी स्वत:ची समजूत करून घेतली. काँग्रेसने स्वकर्माने पुरेशी कुप्रसिद्धी ओढवून घेतलीच होती. त्यामुळे मोदींचा झंझावात सुरू झाल्यावर, सिंग यांनी लगेच आपली नव्या जहाजातली जागा निश्चित केली. निवृत्त सैनिकांचे मेळावे घेऊन आणि वन रँक -वन पेन्शन योजनेला भाजपचा पाठिंबा मिळवून देऊन स्वत:चं स्थान पक्क केलं. भाजपला सत्ता मिळाल्यावर नुसतं राज्यमंत्रीपद देऊन मोदींनी त्यांना नक्की दु:खी केलं असणार, पण त्यापेक्षा काही जास्त या तोंडाळ माणसाला न दिल्याबद्दल मोदींचं कौतुकच केलं पाहिजे.
मधल्या काळात विविध देशांतल्या अडचणींत सापडलेल्या भारतीयांच्या सुटकेत त्यांनी लक्ष घातलं आणि ते चोख पार पाडलं, म्हणून भाजपभक्तांनी त्यांचं केवढं कौतुक मांडलं होतं? त्याचंच बहुदा त्यांना अजीर्ण झालं असावं. त्यामुळे जाळून मारलेल्या दोन दलित मुलांबद्दल बोलताना त्यांनी किमान माणुसकीचा अभाव असलेले उद्गार काढले. असा माणूस या देशाच्या सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात आहे ही बाब काळजी करायला लावणारी आहे. समाजमाध्यमांवर कडाडून टीका झाल्याने खुलासा करणाऱ्या या खुलासाबहाद्दराची झाडाझडती भाजपचे अध्यक्ष घेणार आहेत का ?
नजीकच्या काळी जेव्हा मोदी आपल्या काही सहकाऱ्यांना नारळ देतील, तेव्हा जनरल सिंग आणि राज्यवर्धन राठोड यांचा त्यात नक्की समावेश पाहिजे. राठोड यांनीसुद्धा म्यानमारमधल्या दहशतवादविरोधी मोहिमेपासून दाऊद इब्राहीमचा छडा लावण्यापर्यंत प्रत्येक विषयावर नाक खुपशेगिरी केली आहे. खरं तर सरकारने या दोघांच्या थोरपणाचा वापर करून एक द्विसदस्यीय मोहीम आखावी आणि दोघांना दाऊदचा छडा लावून नि:पात करण्यासाठी पाठवावे. एकदा का दाऊद जिंदा या मुर्दा सापडला की, या देशापुढचं सर्वात मोठं संकट संपेल. एका राष्ट्रद्रोही मुसलमानाला फासावर लटकवल्यामुळे हिंदुस्थानात चैतन्य सळसळेल ते वेगळंच आणि समजा काही दगाफटका होऊन या थोर वीर-वीरांगनांचे काही बरेवाईट झाले, तरी त्यांना आपल्या देशासाठी बलिदान करण्याची संधी मिळेल. सध्याच्या परिस्थितीत देशासाठी बलिदान करण्याचा पहिला अधिकार अशा खऱ्या राष्ट्रभक्तांनाच आहे. बाकी पुरोगामी, समाजवादी, डावे, उदारमतवाद्यांनी जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा का बरे बलिदान केले नाही? आता त्यांनी त्यांचे सरकार येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. म्हणूनच जनरल व्ही.के.सिंग. तुम्ही तुमच्या सर्व कुत्र्यांच्या पिलांसहित पुढे व्हा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच.