अवैज्ञानिक ‘कौमार्य चाचणी’च्या रोगट मानसिकतेचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 05:34 AM2019-05-18T05:34:36+5:302019-05-18T05:35:56+5:30

केवळ शिक्षण देऊन नव्हेतर, अंधश्रद्धेच्या विळख्यातून राज्याला बाहेर काढणं हेच राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.

 Victims of unscientific 'virginity test' diseased mentality | अवैज्ञानिक ‘कौमार्य चाचणी’च्या रोगट मानसिकतेचे बळी

अवैज्ञानिक ‘कौमार्य चाचणी’च्या रोगट मानसिकतेचे बळी

Next

- नम्रता फडणीस (वार्ताहर-उपसंपादक)

स्त्रीचं ‘योनिपटल’ हा समाजाच्या चर्चेचा विषय होईल हे कधी कुणाला स्वप्नातदेखील वाटलं नसेल. पण स्त्रीच्या योनीचा अत्यंत छोटासा भागच अनेक कुटुंबांच्या चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यामध्ये हे एक धक्कादायक वास्तव आहे.
आजही कंजारभाटसारख्या समाजात तिचं कौमार्य सहीसलामत आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची परीक्षा घेतली जाते. एवढंच नव्हे, तर तरुणांनी वधूची ही कौमार्य चाचणी करण्यास विरोध दर्शविला तर त्यांना बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली जाते. या कंजारभाट समाजातील अमानवीय प्रथेचा पर्दाफाश झाल्यानंतर समाजात सर्व स्तरांतून वादंग उठले. अनेक पातळीवर विचारमंथन झाले. या प्रकरणात एकाच समाजाला लक्ष्य केले गेले तरी आता हा फक्त विशिष्ट समाजापुरताच मुद्दा राहिलेला नाही हे वास्तव म्हणावं लागेल.

विविध समाजवर्गांमध्ये अजूनही हे बुरसटलेले विचार डोक्यामध्ये पक्के घर करून बसलेले आहेत. का? आजही स्त्रियांच्या योनिपटलातील एक छोटासा पापुद्रा फाटला आहे की नाही यावर तिचे कौमार्य ठरवले जात आहे? खरंच ते इतकं महत्त्वाचं आहे? वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेक वेळा ही बाब अधोरेखित केली आहे की शरीरसंबंधाच्या वेळीच हा पडदा फाटतो केवळ एवढेच त्यामागचे कारण नाही; तर आजच्या धकाधकीच्या काळात सायकलिंग, व्यायाम किंवा खेळामुळेही हा पडदा फाटला जाऊ शकतो किंवा अनेक मुलींमध्ये तो जन्मजातच नसतो. तरीही तज्ज्ञांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून तरुणीच्या योनिपटलात तो पडदा असायलाच हवा आणि तो लग्नानंतर शरीरसंबंधावेळीच फाटायला हवा, तरच तिचं कौमार्य शाबूत आहे ही रोगट मानसिकता अजूनही समाजात मूळ धरून आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला. अभ्यासक्रमातून हा विषय पुसला गेला तरी विचारांमधून तो पुसला गेलेला नाही. आजही कुटुंबांच्या दडपणामुळे तरुणी कौमार्य शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांचे दरवाजे ठोठावत आहेत. हे नक्की कशाचे द्योतक आहे?

पुण्या-मुंबईसारख्या स्मार्ट शहरांमधील तरुणींचा ओढा या शस्त्रक्रियेकडे वाढत चालला आहे ही तर त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणता येईल. प्रसिद्ध कॉस्मॅटिक आणि प्लॅस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे यांच्या म्हणण्यानुसार, पुण्या-मुंबईत वर्षाला २0-३0 तरुणी ‘कौमार्य शस्त्रक्रिया’ करून घेत आहेत. आमच्याकडे तरुणी जेव्हा येतात तेव्हा त्या जरा अस्वस्थ किंवा घाबरलेल्या असतात. कुणाशी तरी त्यांचे शरीरसंबंध आलेले असतात आणि त्यांचे लग्न दुसºया तरुणाबरोबर ठरविले जाते. लग्नाच्या पहिल्या रात्री नवºयाच्या हे लक्षात आले तर? याची तरुणींना अधिक भीती आहे. पूर्वी कुणाबरोबर तरी शरीरसंबंध आले असल्याची गोष्ट कुटुंबातील कुणालाच त्या सांगू शकत नाहीत. खरंतर या शस्त्रक्रियेमुळे तरुणींचे कौमार्य पुन्हा मिळवून देणे शक्य नाही याची त्यांनाही कल्पना दिलेली असते.

या शस्त्रक्रियेत योनिपटलातील पापुद्र्याचा जो काही भाग शिल्लक राहिलेला असतो तो जोडून देण्याचे काम फक्त केले जाते. लग्नाच्या दहा ते पंधरा दिवस आधी ही शस्त्रक्रिया केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. परंतु हेही तितकेच खरे आहे की हा पापुद्रा फाटला तरी रक्तस्राव होईलच याची शाश्वती देता येत नाही. तरीही तरुणींकडून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आग्रह केला जातो. याचा अर्थ असा की आजच्या काळात तरुणी कितीही शिकल्या तरी काय योग्य आणि काय अयोग्य? हे समजण्याइतकी विवेकबुद्धी त्यांच्यात अद्यापही जागृत झालेली नाही.

एकीकडे कंजारभाटसारख्या समाजातील तरुणी ही प्रथा बंद होण्यासाठी आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या शहरी भागातील तरुणी शरीरातील अत्यंत निरर्थक भागाच्या जोडणीसाठी हजारो रुपये खर्च करीत आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली, पण या क्रांतिज्योतीचा लढा अयशस्वी तर ठरला नाही ना? असे वाटण्यासारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. जाती-धर्माच्या अस्पष्ट चौकटी अजूनही मिटल्या गेलेल्या नाहीत. उलट शिक्षितांच्या मनातच या जाती-धर्माच्या रेषा अधिक गडद होऊ लागल्या आहेत. केवळ शिक्षण देऊन नव्हेतर, अंधश्रद्धेच्या विळख्यातून राज्याला बाहेर काढणं हेच राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.

Web Title:  Victims of unscientific 'virginity test' diseased mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला