‘शक्तिमान’चा बळी
By Admin | Updated: April 22, 2016 02:43 IST2016-04-22T02:43:44+5:302016-04-22T02:43:44+5:30
देश-विदेशातील अनुभवी पशुवैद्यकांनी तब्बल सव्वा महिना आपले संपूर्ण कसब पणाला लावताना जे शर्थीचे प्रयत्न केले ते अखेर निष्फळ ठरले आहेत.

‘शक्तिमान’चा बळी
देश-विदेशातील अनुभवी पशुवैद्यकांनी तब्बल सव्वा महिना आपले संपूर्ण कसब पणाला लावताना जे शर्थीचे प्रयत्न केले ते अखेर निष्फळ ठरले आहेत. उत्तराखंडच्या पोलीस दलात ‘अधिकारी’ असलेला ‘शक्तिमान’ नावाचा चौदा वर्षीय अश्व अखेर निजधामी गेला आहे. प्रत्यक्षात त्या राज्यात काँग्रेस आणि भाजपा यांच्या दरम्यान जो अत्यंत कडवा, वाईट व विधिनिषेधशून्य सत्तासंघर्ष सुरु आहे त्या संघर्षानेच या अश्वाचा बळी घेतला आहे. तेथील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या सत्तेच्या विरोधात गेल्या महिन्याच्या चौदा तारखेला भाजपाने एक मोर्चा आयोजित केला होता. सरकारच्या दिशेने निघालेला हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. उत्तराखंड राज्याचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने तेथील पोलीस दलाकडे अश्वदळ आहे. मोर्चा अडविणाऱ्या पोलिसांच्या दलात शक्तिमानचाही समावेश होता. आपला मोर्चा मध्येच अडविल्याचा मोर्चेकऱ्यांना आणि विशेषत: मोर्चाचे नेतृत्व करणारे भाजपा आमदार गणेश जोशी यांना भयानक संताप आला असावा आणि तो सारा संताप त्यांनी आपल्या हातातील काठीच्या साह्याने शक्तिमानवर काढला. त्यात तो स्वाभाविकच जायबंदी झाला. त्याचा एक पायदेखील निकामी झाला. दुर्दैवाने तो जखमी पाय कापून टाकावा लागला. त्या जागी कृत्रिम पायाचे प्रत्योरोपण केले गेले आणि शक्तिमानला कसेबेसे उभे केले गेले. त्याच्यावर अन्य उपाय सुरु होते आणि कृत्रिम पायावर तो पुन्हा पहिल्यासारखा होऊ शकेल याबात सारेच आशावादी होते. पण बुधवारी सकाळी त्याला गुंगीचे इंजेक्शन दिल्यानंतर तो जो कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. तथापि त्याच्या मृत्युचे निश्चित कारण शवविच्छदनानंतरच कळू शकणारे आहे. शक्तिमानच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा समुदाय जमा झाला होता. दरम्यान आमदार गणेश जोशी यांना तेव्हांच अटक केली गेली होती व लगेच जामीनही दिला गेला. केन्द्रीय मंत्री आणि पशुरक्षक मेनका गांधी यांनी शक्तिमानला श्रद्धांजली वाहताना, इत:पर पोलीस दलात अश्वांची हजेरी राहाणार नाही असे जाहीर करुन शक्तिमानच्या हत्त्येस जबाबदार असणाऱ्यास जे कोणी जबाबदार असेल त्यास एका पोलीस अधिकाऱ्याची हत्त्या केल्याच्या आरोपाखाली अटक झाली पाहिजे असे म्हटले आहे. परंतु उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अजय भट यांनी निगरगट्टपणे या हत्त्येला शक्तिमानवर उपचार करणाऱ्यांनाच दोषी मानून त्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. मेनका गांधी यांना प्रस्तुत प्रकरणाची फारशी माहिती नसावी असेदेखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर स्वत: आमदार गणेश जोशी यांनी आपल्यामुळे शक्तिमानचा पाय कापावा लागला असेल तर आपलाही पाय कापून टाकावा असे तितकेच औधत्यपूर्ण विधान केले आहे. मुख्यमंत्री हरिष रावत यांचा घास घेण्यासाठी भाजपा सर्व प्रकारचा जो धुडगूस घालीत आहे त्यात त्या बिचाऱ्या चतुष्पादाचा बळी जाऊनही भाजपाला मात्र त्याविषयी ना खंत, ना खेद.