राजकारणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 02:28 IST2016-02-01T02:28:17+5:302016-02-01T02:28:17+5:30
हैदराबाद विद्यापीठाच्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून ज्याने आपणहूनच स्वत:चे प्राण त्यागले, (अर्थात त्याने आपल्या मृत्युपूर्व निवेदनात तसे स्पष्ट म्हटले

राजकारणाचा बळी
हैदराबाद विद्यापीठाच्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून ज्याने आपणहूनच स्वत:चे प्राण त्यागले, (अर्थात त्याने आपल्या मृत्युपूर्व निवेदनात तसे स्पष्ट म्हटले नव्हते) त्याच रोहित वेमुला या बुद्धिमान विद्यार्थ्याचा आता दुसऱ्यांदा राजकीय बळीदेखील घेतला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. डाव्या विचारसरणीचा रोहित विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता होता. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर लटकविण्याच्या कृतीचा या संघटनेने निषेध केला म्हणून संघप्रणीत अभाविप या विद्यार्थी संघटनेच्या मागणीवरून रोहितसह सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या वसतिगृहातून गेल्या जुलैमध्ये हकालपट्टी केली गेली व रोहितला मिळणारी दरमहा पंचवीस हजारांची शिष्यवृत्तीदेखील गोठवून ठेवली गेली. याशिवाय अभाविपनेच दिल्ली विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या लघुपटाच्या प्रदर्शनावर जो हल्ला चढविला त्याचाही रोहितने निषेध केला होता. परंतु केवळ तितकेच नव्हे तर अभाविपच्याच एका कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ला प्रकरणीही रोहितलाच जबाबदार धरले गेले होते. मुळात याकूब मेमन याला फासावर लटकविण्याच्या कृतीच्या विरोधात अनेकानी विरोधी सूर लावला होता. पण तोच सूर लावला म्हणून रोहित मात्र देशद्रोही ठरविला गेला. तरीही इथपर्यंतचा सारा प्रकार म्हणजे विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला कोणतेही सबळ कारण आणि ठोस पुरावे नसताना, भाजपाचे एक मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दबाव टाकला म्हणून कारवाई केली गेली, जी नि:संशय अन्यायकारक होती. या अन्यायाचा सर्व स्तरांमधून निषेध केला जाणे म्हणूनच समर्थनीयही होते. पण रोहित जन्माने दलित होता म्हणूनच त्याच्यावर अन्याय केला गेला असा सूर सर्व दिशांनी आळवायला प्रारंभ झाला. याचा अर्थ रोहित जन्माने सवर्ण असता तर त्याच्यावर झालेला अन्याय समर्थनीय ठरला असता! साहजिकच सारे लक्ष तो दलित असण्यावरच केन्द्रित केले गेले. याचा होऊ नये तोच परिणाम होऊन मग रोहितची मुळे शोधण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला. तो दलित नसल्याचे सर्वप्रथम केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी जाहीर केले. त्यावरून व्हायचा तो गदारोळही झाला. आता काहींनी असेही शोधून काढले आहे की रोहित वेमुला वडार समाजात जन्मला होता आणि हा समाज आंध्र प्रदेशात म्हणे अन्य मागासवर्गात मोडतो. हे संशोधन ज्यांनी जाहीर केले त्यांच्या मते आता ‘तो वडार ठरला आहे, दलित नव्हे ना, मग बोलू नका’ असा तर होत नाही? मुळात दलित्वाची व्याख्या तरी कुणी केली आहे का आणि जर व्यक्ती वा विद्यार्थी दलित असेल तरच तिला किंवा त्याला मिळालेली हिणकस वर्तणूक अन्याय आणि एरवी ती न्याय ठरत असते?