वरुण गांधींच्या राजकारणाला आरोपांचे सुरुंग
By Admin | Updated: October 22, 2016 04:19 IST2016-10-22T04:19:21+5:302016-10-22T04:19:21+5:30
पक्षीय राजकारणात स्वबळावर कोणी स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा खटाटोप केला तर घरातले शत्रू सर्वप्रथम त्याचा घात करतात. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते.

वरुण गांधींच्या राजकारणाला आरोपांचे सुरुंग
- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)
पक्षीय राजकारणात स्वबळावर कोणी स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा खटाटोप केला तर घरातले शत्रू सर्वप्रथम त्याचा घात करतात. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. सत्तेची सूत्रे जर अशा ज्येष्ठांच्या हाती असली तर विचारायलाच नको. तऱ्हेतऱ्हेची कारस्थाने त्याच्या महत्वाकांक्षांना सुरूंग लावतात. भाजपाचे तरूण खासदार वरूण गांधींच्या बाबतीत गेल्या दोन दिवसात असेच काहीसे घडते असावे, असे जाणवते.
अमेरिकेत वकिली करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय शस्त्र विक्रे त्या दलालाने सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान कार्यालयाला अचानक एक पत्र पाठवले. गुरूवारी सायंकाळी स्वराज अभियानचे स्वयंघोषित नेते अॅड. प्रशांत भूषण व योगेंद्र यादवांनी आपल्या पत्रपरिषदेत ते फोडले. या पत्रात मुख्यत्वे वरूण गांधींना लक्ष्य करण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह छायाचित्राव्दारे चाललेले आपले ब्लॅकमेलिंग थोपवण्याच्या बदल्यात, वरूणनी संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती, शस्त्र विक्रे त्या दलालांना पुरवल्याचा आरोप या पत्रात आहे. पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त झालेले हे पत्र प्रशांत भूषण व योगेंद्र यादवांच्या हाती कसे लागले? पत्रातला मजकूर खरा की खोटा? त्याची शहानिशा करणारा एक तरी पुरावा कोणी तपासला आहे काय? हे सारेच प्रश्न तूर्त अनुत्तरित आहेत. आरोप करणारे सी. एडमंडस आणि शस्त्र विक्रेत्या कंपन्यांचे दलाल अभिषेक वर्मा २0१२ पर्यंत शस्त्र विक्रीची दलाली करणाऱ्या वादग्रस्त फर्मचे भागीदार होते. आपसातल्या वितुष्टामुळे चार वर्षांपूर्वी या भागीदारी फर्मचे विघटन झाले. तेव्हापासून हे दोन वादग्रस्त भागीदार ‘मनी लाँन्डरींग’, फसवणूक असे अनेक आरोप परस्परांवर करीत सुटले आहेत. या संघर्षात वरूण गांधींना हनी ट्रॅपमधे गोवणारा मजकूर तब्बल चार वर्षांनी एडमंडस यांनी पंतप्रधानांकडे पाठवलेल्या पत्रात लिहिला आहे. त्याची विश्वासार्हता किती?
आरोपांचे कठोर शब्दात खंडन करतांना वरूण गांधी म्हणतात, ‘सारेच आरोप इतके हास्यास्पद आणि मूर्खपणाचे आहेत की त्याचे उत्तर कोणत्या भाषेत द्यावे, हाच माझ्यापुढे प्रश्न आहे. या आरोपांना सिध्द करणारा एक तरी पुरावा उपलब्ध आहे काय? गेल्या १५ वर्षात अभिषेक वर्माला मी भेटलेलो नाही. संरक्षणाशी संबंधित ज्या संसदीय समितीचा मी सदस्य आहे, त्या समितीच्या पत्रात कथित बैठकांनाही मी उपस्थित नव्हतो.
संरक्षणाची एक टक्कादेखील गोपनीय माहिती या समितीला दिली जात नाही. याखेरीज मला बदनाम करण्यासाठी ज्या अश्लील छायाचित्रांचा उल्लेख एडमंडस यांच्या पत्रात आहे, ती छायाचित्रे तद्दन बनावट आहेत.’ तरूण वयात राजकारणात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करायला निघालेल्या वरूण गांधींवर अचानक या वादग्रस्त आरोपांचे खंडन करण्याची पाळी का यावी? आरोपांचा हल्ला नेमका गुरूवारीच का व्हावा? या मागे एक सुनियोजित तर्कशास्त्र दिसते आहे.
उत्तरप्रदेशातील सुलतानपूर हा वरूण गांधींचा मतदारसंघ. इथल्या पाच लहानशा खेड्यात चमकदार पिवळया रंगाने सजलेल्या छोट्या छोटया घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी त्यांनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले. ही घरे वरूण यांनी आपल्या खासदारकीच्या मासिक वेतनातून व स्वत:च्या कमाईतून बांधून दिली आहेत. अशी एकूण १00 घरे गरीबांना वितरीत करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली असून उरलेल्या ७२ घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मोहिमेचे देशव्यापी चळवळीत रूपांतर करण्याची तयारीही त्यांनी चालवली आहे. याखेरीज अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आपल्या खासदारकीचे गेल्या चार वर्षांचे १ कोटी ६0 लाखांचे संपूर्ण वेतन त्यांनी दिले. इतकेच नव्हे तर राज्यातल्या २0 जिल्ह्यात फिरून गरीब शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी धनिक वर्गामधे जागरूकता निर्माण करण्यातही त्यांनी यश मिळवले. कर्जमुक्तीच्या या अभिनव चळवळीत सधन समाज उत्साहाने सहभागी झाला आहे. आजवर १७ कोटी ८0 लाख रूपयांचे योगदान स्वयंस्फूर्तीने त्याने दिले. त्यातून आजवर ३२६0 शेतकरी कुटुंबे पूर्णत: कर्जमुक्त झाली आहेत. नव्या घरांचे वितरण ज्या पाच गावांमध्ये झाले, तिथे हजार दोन हजार ग्रामस्थांच्या पाच छोटेखानी सभांनाही वरूणनी संबोधित केले. प्रत्येक सभेच्या सुरूवातीला आणि शेवटी वरूण गांधींचे समर्थक ‘मुख्यमंत्री कैसा हो.. वरूण गांधी जैसा हो’ अशा घोषणा द्यायचे. सुलतानपूरला संपन्न झालेला हा सोहळा प्रत्यक्ष पाहाण्याचा योग प्रस्तुत प्रतिनिधीला आला, याचे कारण वरूण गांधी दिल्लीहून तीन निवडक पत्रकारांना या कार्यक्रमासाठी सुलतानपूरला घेउन गेले होते. दिवसभर धूळ मातीत त्यांच्यासोबत हिंडताना, सामान्य जनतेशी वरूण थेट संवाद कसा साधतात, त्यांच्या सुख दु:खात कसे सहभागी होतात, ते तटस्थ नजरेने पाहाता आले.
इंदिरा गांधींचे नातू, संजय-मनेका यांचे एकुलते एक पुत्र अशी जनमानसात वरूण गांधींची खास ओळख. तरीही गांधी घराण्याच्या राजकीय विरासतीची ऐट मिरवण्याचा बडेजाव त्यांच्या वर्तनात दिसत नाही. राजकीय जीवनात आपले व्यक्तिमत्व ‘डाउन टू अर्थ’ असावे, याची पदोपदी ते काळजी घेतांना दिसले. स्वत:च्या मालकीचे पक्के घर गावातल्या सर्वात गरीब कुटुंबाला मिळावे, कर्जग्रस्त शेतकऱ्यावर आत्महत्येसारखा दुर्देवी प्रसंग ओढवू नये, इतकाच आपल्या मोहिमेचा हेतू आहे, सबब पक्षाशी अथवा लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकांशी याचा संबंध नाही, हे सुरूवातीलाच वरूण प्रत्येक सभेत स्पष्ट करायचे. उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागात तरूणांना वरूण गांधींचे प्रचंड आकर्षण वाटते, हे या दौऱ्यात पदोपदी जाणवत होते.
चार महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक आहे. भाजपाने त्यासाठी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित केलेला नाही. वरूण इतका लोकप्रिय खासदार उत्तरप्रदेश भाजपाच्या नव्या पिढीत आजमितीला नाही. अनेक सर्वेक्षणातूनही ही बाब सामोरी आली आहे. तथापि सुरूवातीपासून नेहरू गांधी घराण्याचा विरोध याच पायावर उभा असलेला भारतीय जनता पक्ष, वरूण गांधींना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार बनवण्याचा धोका पत्करणार नाही, याची स्वत: वरूणनाही कल्पना आहे. बहुदा म्हणूनच राज्यातले आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना वरूणनी भाजपाच्या राजकारणापासून दूर या सामाजिक चळवळीत सहभागी करून घेतले आहे.
प्रियंका गांधी अधुन मधून वरूणना भेटतात, ही बाबही एव्हाना लपून राहिलेली नाही. या साऱ्या गोष्टी भाजपामधल्या ज्येष्ठ नेत्यांना खटकत असल्या तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. या पार्श्वभूमीवर गुरूवारी अचानक वरूणना बदनाम करणारे पत्र प्रसारमाध्यमांसमोर लीक करण्यात आले. कोणाच्या राजकीय महत्वाकांक्षांना खीळ घालायची असेल तर आरोपांच्या जंजाळात त्याला गुंतवून ठेवणे सर्वात सोपे. त्रयस्थांमार्फत असे आरोप झाले तर कारस्थानी घरभेद्यांकडे कोणी बोट दाखवत नाही की जनताही पुरावे मागत नाही. स्वत:ला निष्कलंक सिध्द करण्याची जबाबदारी मात्र त्या नेत्यावर येते आणि त्यातच अनेक वर्षे निघून जातात. भारतीय राजकारणात हा जीवघेणा खेळ पहिल्यांदाच खेळला गेलेला नाही. पूर्वीही अनेक नेत्यांना अशा अग्निदिव्याला सामोरे जावे लागले आहे. आज ती वेळ वरूण गांधींवर आली आहे. त्यांच्या आशावादी राजकारणाला सुरूंग लावण्याचा हा प्रयत्न असावा, असे जाणवते आहे.