वन्दे ज्ञानदेवं पुन: पुन:

By Admin | Updated: August 3, 2016 05:01 IST2016-08-03T05:01:54+5:302016-08-03T05:01:54+5:30

अठरा अध्याय-सातशे श्लोक़ पण हे सातशे श्लोक हजारो वर्षे बंदिस्त होऊन पोथीमध्ये अडकून पडले़ अलौकिक, दिव्य ज्ञानाला, व्यासांच्या वाणीला सामान्यजन पारखे झाले़

Vande Dnyandeo and again | वन्दे ज्ञानदेवं पुन: पुन:

वन्दे ज्ञानदेवं पुन: पुन:


‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ आजपर्यंत अब्जावधी माणसांचा जन्म झाला असेल़ अनेकाना अनेक विशेषणे लागली़ परंतु जगाच्या निर्मितीपासून आजतागायत ‘विशालबुद्धे’ हे विशेषण केवळ महर्षी व्यास आणि व्यासांनाच़ त्यांचे महाभारत आणि महाभारतात कुरूक्षेत्रावर सांगितलेली श्रीकृष्ण मुखातून अवतरलेली गीता, महर्षी व्यासांचीच़ संस्कृतमध्ये असली म्हणून काय झाले? देववाणी तर आपलीच भाषा. अठरा अध्याय-सातशे श्लोक़ पण हे सातशे श्लोक हजारो वर्षे बंदिस्त होऊन पोथीमध्ये अडकून पडले़ अलौकिक, दिव्य ज्ञानाला, व्यासांच्या वाणीला सामान्यजन पारखे झाले़
आपेगावच्या ज्ञानोबा कुलकर्णी नावाच्या मुलाने मनावर घेतले़ सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांची सुंदर टीका लिहिली़ ‘ज्ञानेश्वरी’ नावाचे देशीकार लेणे इथे मराठीचिये नगरी जन्मा आले़ जगात महाराष्ट्राचा परिचय झाला तो ज्ञानदेवांचा महाराष्ट्र म्हणूऩ ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे भव्यदिव्य काम ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या ज्ञानदेवांना पुन: पुन: नमस्काऱ भक्तीला उधाण आले़ लक्षावधी पावले पंढरीच्या वाटेवर देहभान विसरून चालू लागली़ ‘पंढरीचा महिमा वर्णावा किती’ असे कोणी म्हणू लागले तर ‘आधी रचिली पंढरी-मग वैकुंठ नगरी’ असेही म्हणू लागले़ अशी कोणती ताकद या नऊ हजार ओव्यांत होती म्हणून सातशे वर्षे होऊन गेली ज्ञानदेवाचा गजर जराही कमी होत नाही? कित्येकांना ज्ञानेश्र्वरी कळली नाही पण वळली म्हणून तर पाऊले पंढरीकडे वळली़ अठरापगड जातीचे लोक भक्तिवेडे झाले़ ज्ञानवेडे झाले़ जीवनाचा अर्थ आकळला़ सातशे वर्षे होऊन गेली तरी माऊली बनून ज्ञानोबा लक्षावधी भक्तांचा उद्धार करीत इंद्रायणीकाठी विसावला आहे़ म्हणूनच वन्दे ज्ञानदेवं पुन:पुन:।
एका ज्ञानदेवाचे केवढे मोठे योगदान. प्रेमाने विश्वाला मंत्रमुग्ध करून सोडले ते माऊलीनी़
सुद्धं सर्व भूतानां मातरं पितरं प्रभुम्
प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुन:पुन:॥
ज्ञानदेव सखा आहे, मित्र आहे, माऊली आहे, तात आहे़ असे ज्ञानदेव विश्वात एक आणि एकच होऊन गेले ज्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला़ परस्परांच्या मैत्रीला जाग आणली़ ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात’ असे विश्वकल्याणाचे पसायदान मागितले़ आम्ही सारी भगवंताची लेकुरे याचे आत्मभान जागविले़ ‘प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप:। महर्षी व्यासांनी लावलेल्या ज्ञानदीपाला येऊ पाहाणारी काजळी माऊलींनी दूर केली आणि ज्ञानभक्तीचा नंदादीप अखंड तेवत राहील याची काळजी घेतली म्हणूनच ‘वन्दे ज्ञानदेवं पुन: पुन:। म्हणायचे आणि ज्ञानेश्वरांना नमस्कारायचे मनोभावे़
-डॉ.गोविंद काळे

Web Title: Vande Dnyandeo and again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.