खोऱ्यातील वणवा

By Admin | Updated: April 24, 2017 00:19 IST2017-04-24T00:19:46+5:302017-04-24T00:19:46+5:30

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता

In the valley | खोऱ्यातील वणवा

खोऱ्यातील वणवा

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता तेथील विद्यार्थ्यांनाही आपल्या कवेत घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यानच्या संघर्षात येथील बेरोजगार तरुण जवानांवर दगडफेक करताना दिसत असत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थीही या दगडफेकीत सामील झाल्याचे चित्र समोर आले आहे. पुलवामा येथील महाविद्यालयात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईच्या विरोधात काश्मिरी विद्यार्थी रस्त्यावर आले असून, परिस्थिती आणखी चिघळली आहे. विद्यार्थ्यांकडून होणारी ही दगडफेक आणि स्वतंत्र काश्मीरची नारेबाजी धोक्याचा इशारा देणारी आहे. बहुधा येथील लोकांनीही एवढी अस्थिरता आणि वाईट दिवस यापूर्वी कधी बघितले नसावेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर खोऱ्यात जी अराजकता माजली त्यावर नियंत्रण मिळविण्यात जम्मू-काश्मीरचे सरकार आणि सुरक्षा दलालाही अपयश आले आहे. या आठ-दहा महिन्यांच्या काळात राज्यात उफाळलेल्या हिंसाचारात शंभरावर लोक मृत्युमुखी पडले असून, जवळपास १२ हजार लोक जखमी झाले आहेत. याशिवाय पॅलेट गनच्या माऱ्यात एक हजार लोकांनी आपली एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. येथे नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये केवळ ७.१४ टक्केच मतदान झाले. यावरून येथील लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष आणि दहशत लक्षात यावी. सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढविणारी आणखी एक बाब म्हणजे येथील तरुणांचा दहशतवादाकडील ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात २५० तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमुळे काश्मिरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. येथील लोकांच्या मनातील परकेपणाची भावना तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत असून, केवळ बळाच्या वापराने त्यांच्यातील ही अस्थिरता दूर होईल असे वाटत नाही.

Web Title: In the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.