(वि)संगीत भाऊबंदकीचा नवा खेळ!
By Admin | Updated: October 30, 2015 21:26 IST2015-10-30T21:26:52+5:302015-10-30T21:26:52+5:30
‘आपण दोघे भाऊभाऊ, गोळ्यामेळ्याने खाऊ खाऊ आणि झिंज्या उपटत परस्परांशी झोंबतही राहू’, असा एक नवाकोरा खेळ सध्या महाराष्ट्रभर धुमधडाक्यात सुरु आहे

(वि)संगीत भाऊबंदकीचा नवा खेळ!
‘आपण दोघे भाऊभाऊ, गोळ्यामेळ्याने खाऊ खाऊ आणि झिंज्या उपटत परस्परांशी झोंबतही राहू’, असा एक नवाकोरा खेळ सध्या महाराष्ट्रभर धुमधडाक्यात सुरु आहे. कोण थोरला आणि कोण धाकला, हा याच खेळातील एक उपखेळ. खेळाच्याच दरम्यान मग तद्दन फालतू सिनेमातील एक तितकाच फालतू डायलॉगदेखील बोलला जातो, ‘बरसों आपने हमारी दोस्ती देखी, अब वाघोबाके पंजे का ओरखडा भी देखो’. महाराष्ट्रदेशीच्या करमणोत्सुक जनतेची मन:पूत करमणूक या खेळातून होते आहे. दीर्घकाळ यातील कोणीतरी म्हणे एक मोठा भाऊ होता. अचानक तो म्हणे धाकला झाला. वाद तिथेच सुरु झाला. जन्मतारखांची शोधाशोध सुरु झाली. मधेच कोणीतरी बोलला, ‘भाऊ बिऊ कुछ नही, रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है’! पण ही मांडणी कुणी फारशी मनावर घेतलेली दिसत नाही. त्यामुळे भाऊ-भाऊचा खेळ अव्याहत सुरु. त्यातील थोरला-धाकला या वादात कशाला पडा? त्यांचे ते काय ठरवायचे ते ठरवतील. पण सहोदरांमध्ये म्हणजे भावाभावांमध्ये कदाचित त्यांचा डीएनए सारखा असल्याने काही गुण नक्कीच समान असतात. ते इथे दिसतात, तेव्हां हे भाऊच. यातील तूर्तास मोठ्या भावाचाही आणखी मोठा भाऊ दिल्लीवरती राज्य करतो आहे. त्याचीही तिथे वेगळी भाचरं आहेतच. ही भाचरं मनाला येईल ते बोलत असतात. लहान मूल एकेक अक्षर बोलू लागलं की त्याला तोंड आलं असं आया मावशा कवतिकानं म्हणतात. तसंच या भाचरांनाही बहुधा तोंड आलंय. आपण कोण आहोत, आपण काय बोलतो, त्याचे काय परिणाम संभवतात या कशा कशाचा ताळतंत्र नाही. मधूनच मोठा भाऊ ‘चूप’ असं म्हणतो, पुन्हा कोशात जातो आणि भाचरांची तोंडं पुन्हा येतात. जे या मोठ्या भावाचं, तेच सध्याच्या धाकल्या भावाचं. शिवाजी पार्कात विचारांच्या (?) सोन्याची लुटालूट करताना या धाकल्यातल्या थोरल्यानी स्पष्ट बजावलं होतं की, जे काही बोलायचं ते आम्ही बोलू, इतरांनी फालतूची वटवट करायची नाय! अगदी कोण्या भाईचं नाव घेऊन ही दटावणी केली गेली. पण पार्कातल्या लुटालुटीच्या आवाजाचे डेसीबल्स मोजून होण्याच्या आतच धाकल्यातल्या थोरल्याच्या दटावणीचे तीन तेरा. आपण कोण, आपला अधिकार काय, कोणाला उद्देशून बोलतो, याचा काही धरबंद नाही. पण तरीदेखील थोरल्यातला थोरला आणि धाकल्यातलाही थोरला यांनी ऐकून न ऐकल्यासारखं. म्हणजे दोन्ही थोरल्यांचं दटावण म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखंही करु नकोस. भाऊबंदकी म्हटलं की ते चालायचंच म्हणतात. पण भाऊबंदकी म्हटलं की खरं तर द्विपात्री प्रयोग. पण या अत्याधुनिक भाऊबंदकीत एक तिसरं पात्रदेखील आहे. हे तिसरं पात्र बराच काळ तूर्तासच्या धाकल्या आणि तूर्तासच्याच थोरल्याच्या वळचणीला राहून आलेलं. पण दोघं तसे डांबीस. त्यांनी या तिसऱ्याला इस्टेटीचा वाटा तर सोडाच पण त्याच्या हातावर साधे साखरफुटाणेदेखील ठेवले नसावेत. त्यामुळे त्याची टिवटीवही जास्त, आकांडतांडवही अधिक आणि आदळआपटही मनसोक्त. हा तिसरा एकाचवेळी दोन्ही भावांना शाब्दिक बुकलून काढत असतो. त्याला फक्त इतकंच जमतं म्हणतात! दोघंही कसे बोगस, भ्रष्ट आणि कुचकामी आहेत व आपणच कसे लै भारी आहोत असे हा सांगत फिरत असतो. मध्यंतरी त्याच्याही हाती नाशिक महापालिका नावाचं एक घबाड लागलं. अगदीच काही नाही असं नाही. तिथं त्याला काहीही करता आलं नाही. पण हे सांगावं कसं आणि सांगितलं तर कोण मग दारात उभं करील? तेव्हां परवा या तिसऱ्यानी मोठी धमाल उडवून दिली. तुम्ही लोकाना फसवू शकता, पण स्वत:च स्वत:ला नाही असं म्हणत असले तरी या बहाद्दरानं जाहीरपणे स्वत:च स्वत:ला फसवलं. नाशकात यंव केलं आणि त्यंव केलं. चक्क वास्तुरचनाकारांनी रेखाटलेली संकल्पचित्रच लोकांसमोर आपल्या कर्तृत्वखुणा म्हणून पेश केली. तीदेखील कोणापुढे, तर कल्याण-डोंबीवलीकरांच्या पुढ्यात. या परिसराला महाराष्ट्राची प्रयोगशाळा म्हणून किमान वृत्तपत्रसृष्टीत तरी वेगळी मान्यता आहे. जे अस्सल तेच इथं टिकल आणि नक्कल ते अव्हेरलं जाईल असं म्हणतात. त्यांच्या पुढ्यातच ठोकाठोकी. पूर्वीचा काळ असता तर बात वेगळी होती. हल्ली मेडीसन स्क्वेअरात पंतप्रधानाला उचकी आली तरी ती त्याक्षणी सोनुशीकोनुशीच्या ग्रामस्थाला कळतं. पुन्हा ठोकाठोकी करताना रतन टाटा अमुक म्हणाले, मुकेश अंबानी (तसा मी त्याला मुक्याच म्हणतो व तो मला राज्या!) भारावून गेला इत्यादि इत्यादि. आचार्य अत्र्यांच्या ‘तो मी नव्हेच’मधल्या राधेश्याम महाराजांच्या ‘अरे काय पार्था, काय म्हणते उमरावतीची खबर’ या वाक्यावर डोलणारा समाज आज राहिलेला नाही. तुम्ही एक बोला, तो लगेच स्मार्ट फोनमध्ये गुगल सर्चमध्ये डोकं घालतो. पण ते काहीही असलं तरी अत्र्यांनाही जो प्लॉट लिहिता आला नसता तो प्लॉट कोणीही न लिहिता आज महाराष्ट्रासमोर रात्रंदिवस उलगडला जातो आहे. खऱ्या आणि खोट्या भावांमधली भाऊबंदकी नवनवे प्रवेश सादर करते आहे. तूर्तास लोक तिचा आनंद घेत स्वत:ची करमणूकही करुन घेत आहेत. परंतु अति झालं आणि हसू आलं व हसण्यानंतर रडू आलं हा काळ काही दूर नाही.