अतुल कुलकर्णी
संपादक लोकमत, मुंबई
देशाने मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यानिमित्ताने तिरंगी ध्वजासोबत स्वतःचा फोटो लावून एकमेकांना व्हॉट्सअॅपवर भरपूर शुभेच्छा देऊन झाल्या. विजयी विश्व तिरंगा प्यारा... बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! अशी गाणी दिवसभर ऐकून रात्री नेटफ्लिक्सवर एखादा इंग्लिश मुव्ही बघून एकदाचा स्वातंत्र्य दिन आम्ही पार पाडला ! सुट्टी असल्यामुळे आपल्या मनाला जे वाटते ते खात-खात, सोशल मीडियातून कोणी काय खावे? आणि काय खाऊ नये?, आम्हाला काही स्वातंत्र्य आहे की नाही?, या प्रश्नांसाठी व्हॉट्सअॅपवर भरपूर वादविवादही करून झाले. यानिमित्ताने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपापली पक्षीय बांधिलकी हिरिरीने मांडल्यामुळे अनेकांना रात्री शांत झोपही लागली असेल. त्यामुळे आजपासून आपण वाटेल तसे वागायला आणि स्वातंत्र्याचा खरा आस्वाद घ्यायला मोकळे झालो आहोत.
'बलसागर भारत होवो' ही कविता साने गुरुजींनी लिहिली होती. ती त्यांच्या 'पत्री' नावाच्या संग्रहात १९३५ मध्ये प्रकाशित झाली होती. साने गुरुजींनी जगन्माता, भारतमाता आणि जन्मदात्री आईला तो कवितासंग्रह समर्पित केला होता.
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, तिमिर घोर संहारिन, या बंधु साहाय्याला हो. हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो.
अशा ओळी लिहिताना साने गुरुजींना आपला देश कधीतरी स्वतंत्र होईल, तेव्हा तो वैभवाच्या शिखरावर जावा म्हणून मी माझे सर्वस्व त्यासाठी अर्पण करीन. माझी शक्ती, बुद्धी सगळे काही मी देशासाठी देईन, असा शब्द त्यांनी या गाण्यातून दिला आणि त्याप्रमाणे ते वागले. आम्ही हे गाणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ऐकतो आणि मी कसा वैभवाच्या शिखरावर जाईन, याचा विचार करतो. बंधु साहाय्य, हातात हात घालून हृदयास हृदय जोडून सगळ्यांनी एकत्र येण्याचा मंत्र केवळ या गाण्यापुरता उरला आहे. आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीचे वातावरण राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार करून ठेवले आहे, त्यात आम्ही नकळत अडकलो आहोत. सख्खे भाऊ, बाप आणि मुलगा एकाच घरात असूनही वेगवेगळ्या पक्षांत विभागले आहेत. तावातावाने एकमेकांच्या विरुद्ध भांडत आहेत. आम्ही दिलेल्या मताची किंमत जिथे आम्हालाच उरली नाही तिथे ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांनी ती करावी, अशी अपेक्षा तरी कशी धरावी. नेता ज्या दिशेला जातो त्या दिशेला वाहत जाणे हा कार्यकर्त्याचा धर्म बनला. छोटी-मोठी आमिषे घेऊन आम्ही आमची मतं विकून टाकली. त्यावेळी आम्ही आमच्या मत स्वातंत्र्याचा विचारही केला नाही. आता मात्र अमुक एक गोष्ट करू नका असे कोणी सांगितले की, आमचे स्वातंत्र्य धोक्यात आले, असे आम्हाला का वाटते? आज जर साने गुरुजी असते तर त्यांनी हे गाणे कसे लिहिले असते, याचा विचारही करवत नाही.
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो. त्यांनी या ओळी लिहिल्या खऱ्या. पण, या ओळींच्या विपरीत जाऊन प्रत्येक जण आज स्वतःचा पुरुषार्थ नको तिथे दाखवत आहे. अशाने ही मायभूमी थोर कशी होणार आणि सोन्याचा दिवस कोणाला दिसणार? प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला कळो किंवा न कळो त्यावर बोलण्याचे स्वातंत्र्य... वाट्टेल ते लिहिण्याचे स्वातंत्र्य... कुठेही कसाही कचरा करण्याचे स्वातंत्र्य... पान खाऊन कुठेही पिचकारी मारण्याचे स्वातंत्र्य... मोकाट कुत्र्यांना रस्त्यावर कुठेही, कसेही खायला टाकण्याचे स्वातंत्र्य.... भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना वाटेल तेवढे दाणे फेकण्याचे स्वातंत्र्य... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध देखील वाट्टेल तसे वागण्याचे स्वातंत्र्य... फुटपाथवर दुकाने थाटण्याचे स्वातंत्र्य.... रस्त्याच्या दुतर्फा कशाही हातगाड्या लावून धंधा करण्याचे स्वातंत्र्य... लोकांनी एखाद्या नेत्याला एका पक्षासाठी निवडून दिलेले असते. त्याचा विचार न करता कोणत्याही पक्षात, कधीही जाण्याचे स्वातंत्र्य.... अधिकाऱ्यांना लोकांची कामे नियमानुसार करण्यासाठी देखील लाच घेण्याचे स्वातंत्र्य.... समोरची व्यक्ती लाच देत नसेल, तर कामे अडवून ठेवण्याचे स्वातंत्र्य... विनाकारण कर्कश हॉर्न वाजवण्याचे स्वातंत्र्य... असे सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे. आमच्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून हे स्वातंत्र्य मिळवले आहे, याचा विचारही कोणाच्या मनात येत नाही. स्वातंत्र्याचा हाच अर्थ असतो का? सध्या 'नाणे गुरुर्जी'च्या जमान्यात साने गुरुजींच्या कवितेला काय किंमत असणार? साने गुरुजींनी रत्नागिरीत बसून कधीकाळी लिहिलेली कविता गाण्यासाठी ठीक आहे. कवितेनुसार वागावे, असा दंडक त्यांनी स्वतःला घालून घेतला होता. स्वतंत्र भारतात राहणाऱ्यांनीही तसे वागावे, असे त्यांनी कुठे लिहून ठेवले होते? जोपर्यंत या असल्या अघोरी स्वातंत्र्याच्या कल्पनेतून आम्ही स्वतःला बाजूला करणार नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे केवळ साजरे करण्याचे उपचार पार पाडले जातील.
atul.kulkarni@lokmat.com