आसक्तिरहित कर्म
By Admin | Updated: October 18, 2016 06:55 IST2016-10-18T06:55:39+5:302016-10-18T06:55:39+5:30
कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे.

आसक्तिरहित कर्म
कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार पडतात. वर्तमानात जे केले जाते, ते क्रियमान कर्म. त्याचे फळ तत्काळ मिळते. ज्या कर्माचे फळ कालांतराने मिळते, ते संचित कर्म. योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते, तेव्हा त्यास प्रारब्ध कर्म म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानव जीवन नियंत्रित होत असते. हा संयोग अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे.
कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे प्रकार म्हटले जातात. चांगले ते कर्म, वाईट ते विकर्म आणि निष्क्रियता ते अकर्म. ्गीतेत नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे कर्माचे वर्णन आहे. नित्य कर्म देहधारी दररोज करतो. विशेष प्रसंगी केल्या जाणाऱ्या कर्माला नैमित्तिक कर्म तर काही इच्छा मनात ठेवून केल्या जाणाऱ्या कर्माला काम्य असे म्हणतात.
जर कर्म मनुष्याला बांधून ठेवते, तर व्यक्ती त्यापासून मुक्त कशी होणार व तिला मुक्ती कशी मिळणार, हा विषय श्रीकृष्णांनी गीतेत विस्तृतपणे मांडला आहे.
भगवान म्हणतात, जोवर मानव जीवन आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागेल. त्यापासून मुक्ती नाही. जे गृहस्थ सन्यस्त होतात, त्यांनाही कर्म करावेच लागते. त्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी एक अद्वितीय उपाय सांगितला आहे. व्यक्ती कर्म तर करणारच, परंतु ती कर्मफलाच्या बंधनाने प्रभावित होणार नाही. हा उपाय म्हणजेच आसक्तिरहित कर्म. कर्मफलाची इच्छा मनुष्यामध्ये चिंता आणि उद्वेग निर्माण करते व तो कर्माला बांधला जातो. परंतु, तेच कर्म जेव्हा नि:स्वार्थ भावनेने केले जाते, तेव्हा व्यक्ती कर्म फळाला बांधली जात नाही. श्रीकृष्णाने कमळाचे उदाहरण दिले आहे. कमळाचे फूल चिखलात उगवूनसुध्दा त्याच्या वरती असते, त्याप्रमाणे मनुष्य त्रिगुणांनी युक्त जगात आसक्तिरहित कर्म करतानासुध्दा मुक्त होतो.
‘पद्मपत्रभिवाभ्यसा’
जेव्हा आम्ही महान व्यक्तींच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा समजते की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन नि:स्वार्थ कर्म करणे, हीच महामानवांची विशेषता आहे. जेव्हा आम्ही भूतकाळातील चिंता आणि भविष्यकाळातील आशंका सोडून वर्तमानकाळात जगणे शिकू, तेव्हाच आम्ही निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करु शकू.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय