पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:49 AM2017-10-12T00:49:04+5:302017-10-12T00:49:14+5:30

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो.

 Understanding the world ... | पराधीन आहे जगती...

पराधीन आहे जगती...

Next

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो. आपण चंद्रापर्यंत तर भरारी घेतली पण येथे राहणाºया नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांच्या समस्या जाणू अथवा सोडवू शकलो नाही. त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही. येथील एक खूप मोठा आदिवासी वर्ग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही उपासमारी, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणाच्या अंधाºया खाईतून अद्यापही बाहेर आलेला नाही आणि अशा लोकांना मदतीचा हात देणारेही येथे क्वचितच भेटतात. त्यामुळेच मग ओडिशात एका दाना मांझीला आपल्या पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्याने १२ किमी. खांद्यावर वाहून न्यावा लागतो. तर उत्तर प्रदेशात एक आजारी मुलगा वेळेत उपचार न झाल्याने आपल्या वडिलांच्या खांद्यावरच प्राण सोडतो. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी, मन अस्वस्थ करणारी घटना गेल्या आठवड्यात घडली. अमरावतीच्या मेळघाटातील दुर्गम भागातून ५५ वर्षांचा एक आदिवासी रुग्ण चांगल्या उपचाराच्या आशेने नागपुरात आला होता. मेडिकलमध्ये दाखलही झाला. परंतु दुसºया दिवशी पत्नी अचानक दिसेनासी झाल्याने प्रचंड भांबावला आणि तडक परतीच्या प्रवासाला निघाला. गाठीशी पैसे नाही. काय करणार? उपचारादरम्यान छातीतील रक्त काढण्यासाठी पोटात लावलेल्या नळीसह तब्बल ६५ किमी पायी चालत गेला. नुसत्या विचारानेच कुणाच्याही अंगावर काटा यावा. त्याने यामागील जे कारण सांगितले ते आणखी धक्कादायक आणि दुर्गम भागात राहणाºया आदिवासींच्या मनात असलेला अविश्वास दर्शविणारे तर आहेच. शिवाय त्यांच्यावर अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे, हे सुद्धा अधोरेखित करणारे आहे. डॉक्टर आपल्या शरीरातील रक्त काढून विकतील आणि आपल्याला मरण येईल या भीतीने आपण नागपुरातून पळ काढल्याचे त्याचे म्हणणे आहे. बहुतांश आदिवासी अजूनही रोगांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भूमकाकडेच (मांत्रिक) जाणे पसंत करतात. त्यांचा डॉक्टरांवर अजूनही विश्वास बसलेला नाही, हे या व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृृष्टीने त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्या या आदिवासींपर्यंत कितपत पोहोचतात, त्यांना याचा किती लाभ होतो, याबद्दलही आता शंका वाटते. परंतु शासनाने हे समजून घेतले पाहिजे की जंगलातील हा आदिवासी शहरात निर्भयपणे राहू शकेल तेव्हाच हा देश महासत्ता बनेल.

Web Title:  Understanding the world ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.