दोन ‘विकासपुरुषां’तील लढत

By Admin | Updated: July 30, 2015 03:24 IST2015-07-30T03:24:43+5:302015-07-30T03:24:43+5:30

बिहार या देशातील सर्वात मोठ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणूक - युद्धाला तोंड लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार

Two 'Vikas Purusans' fight | दोन ‘विकासपुरुषां’तील लढत

दोन ‘विकासपुरुषां’तील लढत

बिहार या देशातील सर्वात मोठ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणूक - युद्धाला तोंड लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर तोफ डागून त्याचे रणशिंग फुंकले आहे. मोदींचा भाजपा आणि नितीशकुमारांचा जदयु यांच्यात १७ वर्षे ऐक्य होते आणि ते दोन्ही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली आणि नितीशकुमारांनी धर्मनिरपेक्षतेचे कारण पुढे करून ते ऐक्य तोडले. तोपर्यंत नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे सुशील मोदी हे उपमुख्यमंत्रिपदावर होते व त्यांच्या पक्षाचे अनेक सभासदही मंत्रिमंडळावर होते. मात्र युती तुटल्यापासून त्या दोन पक्षांत व त्यांच्या पुढाऱ्यांत जी तोंडातोंडी सुरू झाली ती आजतागायत तशीच राहिली आहे. नोव्हेंबर महिन्यापूर्वी बिहारात निवडणूक व्हायची आहे आणि तीत नितीशकुमारांएवढेच नरेंद्र मोदींचेही भाग्य पणाला लागणार आहे. नितीशकुमारांनी ही निवडणूक गमावली तर ते राज्याच्या राजकारणातून दीर्घकाळ दूर जातील व त्याच बरोबर त्यांच्या पक्षाचे अस्तित्वही धूसर होईल. या उलट मोदींनी ही निवडणूक गमावली तर दिल्लीनंतर त्यांनी गमावलेले हे दुसरे महत्त्वाचे राज्य ठरेल आणि त्यांची जादू ओसरत असल्याचा तो दुसरा व भक्कम पुरावा ठरेल. (अमित शाह यांचे पक्षाध्यक्षपदही त्यामुळे अडचणीत येईल.) त्यामुळे स्वाभाविकच दोन्ही तट या निवडणुकीत अटीतटीने उतरले आहेत. नितीशकुमारांनी त्यांचे राज्यातील प्रतिस्पर्धी लालू प्रसाद यादव यांच्याशी मैत्री व आघाडी केली आहे आणि त्यांच्या या आघाडीला काँग्रेसनेही आपले पाठबळ देऊ केले आहे. तिकडे मोदी व शाह यांनी कोणतीही जोखीम न पत्करता आपल्या प्रचाराचा धडाक्यात आरंभ केला आहे. आपल्या पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदींनी नितीशकुमारांच्या डीएनएमध्ये काहीतरी गडबड असल्याची जीवघेणी टीका केली आहे. ‘माझ्यामुळे त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला अस्पृश्य समजणे ही त्यांच्या डीएनएमधील गडबडीची साक्ष देणारी बाब आहे’ असे ते म्हणाले. त्यांना लागलीच उत्तर देताना नितीशकुमारांनी ‘माझा डीएनए हा बिहारचाच डीएनए असल्याचे’ सांगून ‘मोदी बिहारच्या डीएनएबाबत शंका घेत असल्याचा’ घणाघाती आरोप केला आहे. आरंभीच या पातळीवर गेलेली ही लढाई येत्या काही दिवसांत आणखी उग्र स्वरूप धारण करील यात शंका नाही. ‘मोदी हे कालिया नाग असल्याची’ व ‘आम्ही यदुवंशी (कृष्णाच्या वंशाचे) लोक त्यांना ठेचून काढणार असल्याची’ टीका लालूप्रसादांनीही केली आहे. ही टीका येणाऱ्या लढाईचे तीव्रपण सांगणारी आहे. बिहार हे जातीच्या आधारावर मतदान करणारे राज्य आहे असे म्हटले जाते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्या राज्यात विकासाचा मुद्दा प्रबळ ठरून ती निवडणूक भाजपाने जिंकली. आताची निवडणूक तिच्याहून वेगळी आहे. कारण मोदींएवढेच नितीशकुमार हेही विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे नेते आहेत आणि नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांच्या मुख्यमंत्रिपदाला राज्यातील ४६ टक्के लोक अनुकूल असल्याचे आढळले आहे. त्यांचे भाजपातील प्रतिस्पर्धी सुशील मोदी यांना अवघ्या २६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा प्रभावही मोठा असेल व त्यामुळे ही निवडणूक दोन विकास पुरुषांतील लढतीसारखी होईल. त्यातला एक भूमिपुत्र तर दुसरा देशाचा प्रशासक असेल. त्यातला पहिला पाटण्यात राहून आपला किल्ला लढवणारा तर दुसरा दिल्लीहून त्याचे हल्ले चढविणारा असेल. त्याचमुळे या निवडणुकीबाबत आगाऊ अंदाज बांधणे तशा पंडितांनाही अवघड होऊन बसले आहे. सध्याच्या घटकेला ४३ वि. ४१ टक्के असे विभाजन दाखवून हे पंडित भाजपाला २ टक्क्यांचा लाभ दाखवीत असले तरी अखेरपर्यंत ही आकडेवारी अशीच राहील याची खात्री तेही देत नाही. मात्र त्याच वेळी या दोन्ही तटांना भेगा गेल्याचेही साऱ्यांच्या लक्षात येणारे आहे. मोदींच्या विकासपुरुष या प्रतिमेला गेल्या वर्षभरात अनेक तडे गेले आहेत आणि त्यांची अनेक विकासविषयक आश्वासने हवेत राहिली आहेत. तिकडे नितीशकुमारांनी जीतन मांझी या जुन्या अनुयायाला औटघटकेच्या मुख्यमंत्रिपदावरून काढून राज्यातील महादलितांच्या एका वर्गाचा रोष ओढवून घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे स्टार प्रचारक, खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना नितीशकुमारांशी असलेल्या त्यांच्या जुन्या मैत्रीचे ऐनवेळी स्मरण झाले आहे. भाजपाचा सारा भर मोदींच्या प्रतिमेवर राहणार आहे आणि नितीशकुमारांनी आरंभीच मोदींच्या लोकसभेतील प्रचारयंत्रणेच्या प्रमुखाला आपल्याकडे ओढून आणून आपल्या प्रचाराला जुंपले आहे. तात्पर्य, सहजपणे घ्यावी अशी ही लढत नाही. मोदींचा उत्साह जसा मोठा आहे तशी नितीशकुमारांची कामेही मोठी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत बिहारातले गुंडाराज संपले व लोकजीवन सुरक्षित झाले. त्यामुळे आताची लढत परिवर्तन की विकासाची सध्याची दिशा यांच्यात आहे व तिच्याकडे कुतूहलाने व उत्कंठेने पाहणे एवढेच आपल्या हाती
आहे.

Web Title: Two 'Vikas Purusans' fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.