या उमाळ्यांमागील सच्चाई

By Admin | Updated: April 16, 2016 04:16 IST2016-04-16T04:16:09+5:302016-04-16T04:16:09+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साऱ्या देशाने त्यांना अभिवादन केले. असे अभिवादन करणाऱ्यांत त्यांच्या खऱ्या अनुयायांएवढाच त्यांच्या स्मृतींचे राजकारण

The truth behind these examples | या उमाळ्यांमागील सच्चाई

या उमाळ्यांमागील सच्चाई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साऱ्या देशाने त्यांना अभिवादन केले. असे अभिवादन करणाऱ्यांत त्यांच्या खऱ्या अनुयायांएवढाच त्यांच्या स्मृतींचे राजकारण करणाऱ्या ढोंगी माणसांचाही समावेश मोठा होता. या देशात आंबेडकरी विचारांना व त्यांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता यासारख्या मूल्यांना मानणाऱ्यांचा वर्ग जसा आहे तसा त्यांच्या विचारांच्या विरोधकांचा व त्यांनी सांगितलेल्या मूल्यांची खिल्ली उडविणाऱ्यांचा समूहही मोठा आहे. भारत हा एकेकाळी भक्तीभावाने भाबड्या बनलेल्यांचा देश असेल, मात्र आता तो तसा राहिला नाही. भक्तीभाव असणाऱ्यांनाही आताच्या विचारी शिक्षितांएवढेच प्रामाणिक व अप्रामाणिक यातले अंतर कळणारे आहे. कोणता नेता, कोणता पक्ष व कोणती संघटना बाबासाहेबांचे नाव त्यांच्या अनुयायांच्या मतांवर नजर ठेवून घेते याचे अचूक ज्ञान असलेल्या भारतीयांचा वर्ग आता मोठा आहे. ज्यांनी कधी सामाजिक न्यायाच्या बाजूने लढे दिले नाहीत, माणसांच्या मुक्तीसाठी जे कधी उभे राहिले नाहीत, ज्यांना समतेचे वावडे आहे आणि बंधुता हा ज्यांच्या लेखी फक्त कवितेत उच्चारायचा शब्द आहे ती माणसे, त्यांचे पक्ष व संघटना समाजाला चांगल्या ठाऊक आहेत. ही माणसे ज्ञानाला विरोध करतात आणि आंधळ्या श्रद्धा जागवतात. त्या श्रद्धांविरुद्ध जनजागरण करणाऱ्यांचे मुडदे पाडतात. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आणतात आणि भूक, दारिद्र्य आणि विषमतेपासून आझादी मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करतात. अशा जागरणकर्त्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना ‘स्यूडो सेक्युलॅरिस्ट’ अशी शेलकी नावेही तेच ठेवतात. त्यांना आंबेडकरांचे नाव हवे असते, त्यांचा विचार मात्र नको असतो. ज्यांना गांधी पचवता येत नाही, त्यांना आंबेडकर कसे आत्मसात करता येतील? पण राजकारण ही साऱ्यांनाच कोलांटउड्या मारायला लावणारी जागा आहे. मग एका बाजूला कडव्या व अतिरेकी धर्मश्रद्धेचा जयघोष करणारी ही माणसे आंबेडकरांची स्मारके उभारायला समोर येतात, त्यांच्या नावाच्या संस्था व संघटना स्थापन करतात आणि त्यांचा विचार मारून त्यांचे नावच तेवढे कायम राहील यासाठी प्रयत्न करतात. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत काँग्रेसला विरोध केला. पण देश स्वतंत्र होताच त्या पक्षाने पुढे केलेला सहकार्याचा हात हाती घेऊन ते देशाची घटना बनवायला सज्ज झाले. घटना समितीत ९० टक्क्यांहून अधिक सभासद काँग्रेसचे असतानाही त्या पक्षाने आंबेडकरी घटना शिरोधार्ह मानली. त्यातली जी कलमे घटना तयार होताना मान्य झाली नाहीत त्यांचा आग्रह नंतरच्या काळातही नेहरूंसारखे नेते धरताना दिसले. फार कशाला, पुणे करारानंतर लुई फिशर या गांधींजींच्या चरित्रकाराशी मुंबईत बोलताना बाबासाहेब म्हणाले ‘या जगात मला समजून घेणारा एकच माणूस आहे आणि तो गांधी आहे’. राजकीय विरोध असला तरी सामाजिक व वैचारिक बाबींविषयीचे हे समजूतदार ऐक्य नंतरच्या काळात साऱ्यांनीच राखले असे नाही. उलट त्यांच्यातील विरोधावरच ती माणसे भर देताना दिसली. महाराष्ट्रात यशवंतरावांच्या नेतृत्वात शिवशक्ती आणि भीमशक्ती यांना एकत्र आणण्याचा एक भव्य प्रयत्न झाला. दादासाहेब गायकवाडांनीही त्यात पुढाकार घेतलेला दिसला. नंतरच्या काळात देशात उभ्या झालेल्या जातीय व प्रादेशिक पक्षांनी या प्रयत्नात जे अडसर उभे केले तेही साऱ्यांच्या लक्षात आहेत. ज्यांनी आंबेडकर या नावाचा सोडा, पण विचारांचाही कधी उच्चार केला नाही ते संघ परिवाराशी जुळलेले पक्ष व संघटना यांचे याबाबतचे तेव्हाचे मौन व आताचा त्याविषयीचा त्यांचा उमाळाही देशाच्या लक्षात येणारा आहे. ‘धर्मनिरपेक्षता हा आजार आहे’, ‘जे आमच्या बाजूने नाहीत त्यांनी पाकिस्तानात चालवते व्हावे’, ‘हे फक्त हिंदूंचे राष्ट्र आहे, यासारखी मुक्ताफळे आंबेडकरी विचारांना छेद देणारी आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा व त्यातील जनतेच्या सहभागाचा कायम दुस्वास केला ती माणसे माणसांच्या मुक्तींच्या बाजूने कधी जाणारही नाही. ही माणसे आंबेडकरांचा लोकशाही उदारमतवाद कितीसा पचवू शकतील. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानेच त्यांचा विचार आत्मसात करता येतो व तसे दाखविता येते असे समजणे ही आत्मवंचना आहे. अशा माणसांसाठी राजकारणात मग एकच भूमिका शिल्लक राहते. तोंडाने आंबेडकर म्हणायचे आणि हाताने त्यांच्या विचारांची मान मुरगाळायची. हे ढोंग वारंवार करीत राहिेले तर ते लोकांना यथावकाश खरे वाटू लागते ही गोबेल्सची प्रचारी शिकवण या माणसांनी आपल्या अंगी चांगली मुरवली असते. त्यामुळे आंबेडकरी मूल्यांवर प्रेम करणाऱ्या साऱ्यांनी या माणसांपासून सदैव सावध राहायचे असते. ही सावधगिरी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा साऱ्या देशात जागवायचीही असते.

Web Title: The truth behind these examples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.