ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन फर्स्ट’ची जादू चालेल काय?
By Admin | Updated: August 12, 2016 03:33 IST2016-08-12T03:33:00+5:302016-08-12T03:33:00+5:30
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता खरा रंग भरू लागला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन तर रिपब्लिकन पक्षातर्फे बांधकाम व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन फर्स्ट’ची जादू चालेल काय?
अंजली जमदग्नी, (ज्येष्ठ पत्रकार)
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता खरा रंग भरू लागला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन तर रिपब्लिकन पक्षातर्फे बांधकाम व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प यांच्यात येत्या आठ नोव्हेंबर रोजी ही महत्त्वाची निवडणूक पार पडत असून निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिकन फर्स्ट’ हे कार्ड चालेल की अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून हिलरी क्लिंटन यांची निवड केली जाईल याचा उलगडाही तेव्हांच होईल.
अमेरिकेचे राजकारण प्रामुख्याने द्विपक्षीय राहिले आहे. पण यंदाच्या निवडणुकीत या पद्धतीस सुरुंग लागतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जळजळीत आणि वादग्रस्त विधानांमुळे रिपब्लिकन पक्षात पडू पाहणारी फूट हे याचे महत्त्वाचे कारण आहे. ट्रम्प यांना वारशात प्रचंड संपत्ती व उद्योगधंदे मिळाले असले तरी या समृद्धीत दरम्यानच्या काळात जी भरीव वृद्धी झाली तिचा मार्ग गोलमाल असल्याची चर्चा आहे. ट्रम्प अद्याप कायद्याच्या कचाट्यात सापडले नसले तरी भविष्यात तसे होणारच नाही, याची खात्री देता येत नाही.
अमेरिकेने मुस्लीम जगातील युद्धे बंद करावीत, अमेरिका व मेक्सिको दरम्यान भिंत बांधून तिचा खर्च मेक्सिकोकडून वसूल करावा, यासारख्या त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना कडाडून विरोध होत आहे व त्यापायीच ते मुस्लीमविरोधी असल्याची प्रतिमा तयार झाली आहे. तथापि अमेरिकी समाजातील एका घटकाचा या वक्तव्यांना पाठिंबाही आहे. तो देणाऱ्यांच्या मनात भारतीयांसकट सर्वच बिगर अमेरिकनांविषयी राग आहे.
रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले असले तरी त्या पक्षातील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. तथापि पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळणे, हा आपला फार मोठा सन्मान असल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच त्यांनी ‘अमेरिकन्स फर्स्ट’ ही घोषणा दिली आहे. देशातील नोकऱ्यांवर अमेरिकन नागरिकांचा पहिला हक्क आहे, असे जाहीर करतानाच ‘आमच्या नोकऱ्या आम्ही परत मिळवू’ अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी सार्वजनिक पदावर ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांना बडतर्फ करण्याची जाहीर घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. ज्यांना बडतर्फ करायचे, त्यांची यादी तयार करण्याचे काम ट्रम्प यांचे सहकारी करीत आहेत. कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे व त्यासाठी त्यांना ‘यू आर फायर्ड’ असा आदेश देणे ट्रम्प यांना मनापासून आवडते. ‘द अॅप्रेंटिस’ या टीव्ही शोमध्येही त्यांनी ‘यू आर फायर्ड’ हा आदेश लोकप्रिय केला होता. अमेरिकेतील गौरवर्णीय समाज ट्रम्प यांच्या पाठीशी असला तरी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी तेवढे पुरेसे नाही, असा निवडणूक पंडितांचा कयास आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या ज्या राष्ट्रीय अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच्या आधी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनियम ट्रम्प यांचे भाषण झाले. या भाषणातील साधेपणा, सहृदयता यांचे टीव्ही वाहिन्यांनी कौतुकही केले; पण दुसऱ्याच दिवशी मिलेनिया यांनी केलेले भाषण २००८ साली मिशेल ओबामा यांनी केलेल्या भाषणासारखेच होते व मिशेल यांच्या भाषणातील काही मुद्दे मिलेनिया यांनी आपल्या भाषणात जसेच्या तसे सांगितले, अशी टीका होऊ लागली.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासाठी राजकारण नवे नाही. राजकारणाचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष व २००८ च्या निवडणुकीतील हिलरी यांचे पक्षांतर्गत स्पर्धक बराक ओबामा यांनी आपली सर्व शक्ती हिलरी यांच्यामागे उभी केली आहे. एवढेच नाही, तर उत्तर कॅरोलिनात ते हिलरी यांच्या प्रचारसभेतही सहभागी झाले होते. मात्र हिलरी यांचे व्यक्तिमत्त्व आजही संभ्रम निर्माण करणारे असल्याचा समज आहे. त्या महिला व मुलांसाठी न्याय व समान संधीची मागणी करतात तर दुसरीकडे वॉल स्ट्रीटवरील उद्योजकांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. एकीकडे त्या स्त्रीमुक्तीवादाचे समर्थन करतात, तर दुसरीकडे आपल्या विलासी पतीचा बचाव करतात. तरीही महिलांचा मोठा वर्ग त्यांचा समर्थक आहे. पण एक महिला देशाचे प्रभावी नेतृत्व करू शकेल काय, असा प्रश्नही महिला स्वत:ला विचारत आहेत. दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांच्यामागे ई-मेलचे शुक्लकाष्ठ लागले आहे. परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी काही गोपनीय पत्रव्यवहारासाठी सरकारी ई-मेल सेवेचा वापर न करता, गुगलचा वापर केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. सरकारी गोपनीयतेबाबत त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, असा आरोपच एफबीआयने त्यांच्यावर ठेवला असून ही चौकशी व आरोप हिलरी यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
कॅरोलिनाच्या सभेत ओबामा यांनी हिलरी यांची प्रशंसा करताना यंदाच्या निवडणुकीत त्याच सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याचे जे विधान केले त्यावर ट्रम्प यांनी ओबामा यांच्या दिशेने जोरदार टीकास्त्र सोडले. ही संयुक्त सभा राजकारण भ्रष्ट मार्गाने चालले असल्याचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप करताना केलेले भाषण अत्यंत प्रदीर्घ होते. सामान्यत: असे भाषण आशादायी, आनंदाचे चित्रण करणारे असावे, अशी परंपरा असली तरी ट्रम्प यांनी तो पायंडा मोडला. एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे हे भाषण युद्धाची घोषणा करणाऱ्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे होते. ‘भयंकर धोका’ हा शब्द या भाषणात सात वेळा आला. अमेरिकेत वाढलेल्या गुन्हेगारीचा ठपका त्यांनी देशात येणाऱ्या स्थलांतरितांवर ठेवला. या स्थलांतरितांचा भूतकाळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्यामुळे गुन्हे वाढत आहेत, असे ते म्हणाले. हिलरी क्लिंटन यांनी परराष्ट्र मंत्रिपदाच्या काळात सीरिया, इराक, इजिप्त, लिबिया या देशांत गोंधळ माजवला असा आरोप करताना त्यांचे राजकारण विघातक असून, अध्यक्ष बनण्यास त्या पात्र नाहीत, असेही ट्रम्प म्हणाले.
अमेरिकन अर्थव्यवस्थेचा घसरता आलेख हाही या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक आहे. तेथील आर्थिक विषमता वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अमेरिकेने मुस्लीम जगात सुरू केलेली युद्धे चालूच आहेत व त्यांचा खर्च हजारो अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊनही यश मात्र दृष्टिपथात नाही. याबद्दल सामान्य जनतेत क्षोभ आहे.