भाजपाचे खरे स्वरूप उघड झाले

By Admin | Updated: February 19, 2015 00:01 IST2015-02-19T00:01:37+5:302015-02-19T00:01:37+5:30

रा.स्व. संघ / भाजपाने दिल्लीच्या निवडणुका स्वत:च्या प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पंतप्रधान मोदींवरील ते सार्वमत असेल असे म्हटले गेले.

The true nature of the BJP is exposed | भाजपाचे खरे स्वरूप उघड झाले

भाजपाचे खरे स्वरूप उघड झाले

रा.स्व. संघ / भाजपाने दिल्लीच्या निवडणुका स्वत:च्या प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पंतप्रधान मोदींवरील ते सार्वमत असेल असे म्हटले गेले. या निवडणुकांसाठी पंतप्रधान आणि भाजपा यांनी अतोनात कष्ट घेतले. किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करून प्रचारातील त्रुटी भरून काढण्यात आली. विजय झाला तर मोदींचा, पराभव झाला तर तो बेदींचा असा धूर्त डाव टाकण्यात आला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपातर्फे १२० खासदारांना आणि २० केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी आणण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी चार दिवसात तीन सभांना संबोधित केले. एवढी आक्रमक प्रचार मोहीम आखूनही आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागी विजय मिळविला तर भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरही त्या पक्षाला दावा करता आला नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाची एकूण घसरण पहावयास मिळते. लोकसभा निवडणुकीत जेथे पक्षाला बहुमत मिळाले होते, तेथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक जागी पक्षाला पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यातील ५० विधानसभा पोटनिवडणुकींपैकी भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला १८ जागाच मिळाल्या. उत्तर प्रदेशातील ज्या विधानसभा मतदारसंघात तो पक्ष विजयी झाला होता त्याच मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत तो पक्ष पराभूत झाला. भाजपाला लोकसभा निवडणुकीत अवघी ३१ टक्के मते मिळूनही त्या पक्षाला बहुमत मिळाले. त्या पक्षाने महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात अनुक्रमे पहिल्या राज्यात २९ टक्के मते मिळवून १२३ जागा जिंकल्या आणि ३३ टक्के मते मिळवून दुसऱ्या राज्यात बहुमत प्राप्त केले.
झारखंडमध्ये भाजपाने लोकसभेत मिळालेल्या मतांपैकी १० टक्के कमी मते मिळवूनही सत्ता हाती घेतली. अल्प मतांनी पक्षाने बहुमत प्राप्त केले. ही स्थिती दिल्लीच्या निवडणुकीत अस्तित्वात नव्हती. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून दिल्लीत केंद्राची राजवट होती. तरीही तेथे मोदी विरोधातील लाट पहावयास मिळाली.
एकूणच मोदींची जादू जास्त वेगाने नाहीशी होताना दिसत आहे. समृद्धतेचा भ्रम निर्माण करणाऱ्या घोषणा आणि जातीय प्रवृत्तीचे धृवीकरण यामुळे भाजपाला निवडणुकीत यश मिळाले होते. पण आता विकासाचा भ्रम दूर होत असून ‘घर वापसी’ आणि ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करून त्यांनी भारताच्या इतिहासाचे नव्याने लेखन करण्यास सुरुवात केली होती. पुराणकथांचा इतिहास मानून त्यांचा खरा कार्यक्रम उघड झाला होता. दिल्लीतील मतदानानंतर आणि निकाल जाहीर होण्यापूर्वी भाजपाच्या एका नेत्याने महात्मा गांधींना राष्ट्रपिता समजणे चूक आहे असे मत व्यक्त केले होते. नथुराम गोडसेला राष्ट्रीय पुरुष म्हणून त्याचे पुतळे उभारण्याची मोहीम रा.स्व. संघाने चालविली होती. हे हिंदू राष्ट्रच आहे असे प्रतिपादन रा.स्व. संघाच्या सरसंघचालकांनी करणे सुरू केले होते.
या तऱ्हेच्या प्रचारातूनच सध्याची वादग्रस्त जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्या सरकारी जाहिरातीतून घटनेतील धर्मनिरपेक्षता हा शब्दच वगळून टाकण्यात आला होता. त्यानंतर भाजपाने ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर चर्चा घेण्याची तयारी दर्शविली. हा शब्द इंदिरा गांधींनी १९७५ च्या आणीबाणीच्या वेळी घटनेत समाविष्ट केला असे भाजपाचे म्हणणे आहे. धर्मनिरपेक्षतेवरील वाद संपवा असे आवाहन भाजपाच्या अध्यक्षांनी करूनही तो पक्ष त्या विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरीत आहे. कुप्रसिद्ध रथयात्रेच्या वेळी भाजपाने हाच वाद उपस्थित केला होता, ज्याची परिणती डिसेंबर १९९६ मध्ये बाबरी मशिदीच्या विध्वंसात झाली होती.
ज्या घटनेची शपथ घेऊन मोदी सरकार अधिकारावर आहे, त्या घटनेत धर्मनिरपेक्षता निहित आहे. तो शब्द काढून टाकण्याची मागणी करणे म्हणजे ती शपथच नाकारण्यासारखे आहे. इंदिरा गांधींनी ज्या आणीबाणीची रचना केली होती ती आणीबाणी नष्ट करण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी केले होते. जनता पक्षाच्या सरकारने घटनेच्या प्रिअ‍ॅम्बसला दुरुस्ती केली कारण त्यात घटनेतील विचारांचीच पुनरुक्ती झाली होती.
घटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. कलम २५ मध्ये निधार्मिकतेचे सारस्वरूपच समाविष्ट झाले आहे. त्यात धर्माचा मुक्तपणे वापर व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट करण्यात आले आहे. दुरुस्त केलेल्या प्रास्ताविकात धर्मनिरपेक्षता शब्द सामील करण्यात आला आहे. ही बाब त्याची पुष्टीच करते. पण भाजपा त्याचा वापर करून जातीय भावना उद्दिपित करीत आहे. मोदी हे दिल्लीत जेव्हा प्रचाराची भाषणे देत होते तेव्हा दिल्लीतील चर्चमध्ये तोडफोड करण्यात येत होती. पण मोदींनी त्याविषयी खेद व्यक्त केला नाही.
आता धर्मनिरपेक्षता हा विषय लोकशाही गणराज्यात्मक घटनेच्या संदर्भात पूर्णपणे निकालात लागला आहे. रा.स्व. संघ/भाजपाने धर्मनिरपेक्षतेवर चर्चा घडवून आणण्याची जी मागणी केली आहे त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. त्यांना भारतीय गणराज्याचे रूपांतर ‘हिंदू राष्ट्र’ असे करायचे आहे. भारताच्या अस्तित्वासाठी असे घडू न देणे हेच योग्य आहे.


सीताराम येचुरी
(संसद सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)

Web Title: The true nature of the BJP is exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.