अमर्याद माहितीचा खजिना
By Admin | Updated: January 4, 2015 01:56 IST2015-01-04T01:56:12+5:302015-01-04T01:56:12+5:30
म्युझियमचे मूळ नाव फार कमी जणांना ठाऊक असेल. गेल्या काही वर्षांपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ या नावाने ते प्रचलित आहे.

अमर्याद माहितीचा खजिना
जवळपास पन्नास हजारांहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय! प्राचीन, मुघलकालीन कलाकुसर, चित्रकला, विविध कालखंडातील नाणी, प्रमुख राजांच्या राजवटीत वापरण्यात येणारी शस्त्रे आणि बराच खजिना इथे पाहायला मिळतो. ‘प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम आॅफ वेस्टर्न इंडिया’ हे म्युझियमचे मूळ नाव फार कमी जणांना ठाऊक असेल. गेल्या काही वर्षांपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ या नावाने ते प्रचलित आहे.
पूर्व आशियातील कलाकृती असलेले भारतातील मोजक्या वस्तुसंग्रहालयांपैकी ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ हे एक. मुघल, मराठा सरदारांच्या वापरातील शस्त्रे, त्यांचे प्रकार यांचे दालन तर हरखून जाण्यासारखेच! त्यात १२ राशी दर्शविणारी चित्रे कोरलेली अकबराची ढाल, त्याचे चिलखत तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रे पाहायला मिळणे ही म्युझियमप्रेमींसाठी पर्वणीच. या प्रशस्त इमारतीत एकूण १२ दालने आहेत. वास्तूत प्रवेश केल्यावर ‘मार्गदर्शक कक्ष’ येथे रेवा खंजीर, नक्षीदार सुरई, ऋषभनाथाची चोवीसी (२४ तीर्थकारांची एकत्रित प्रतिमा), बाहुबली, विष्णूचे त्रिविक्रम रूप अशा शिल्पाकृती मांडलेल्या आहेत.
मुख्य इमारतीत भारतीय शिल्पकलेची परंपरा दर्शवणारे ‘शिल्पकला दालन’ आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, काश्मीर या राज्यांतील शिवगण, महिषासुरमर्दिनी, गरुड, चामुण्डा, गणेश, शांतिनाथ यांची प्राचीन शिल्पे आहेत. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही शिल्पे आहेत. त्यानंतर ‘प्रागैतिहास आणि पूर्वइतिहास दालन’ दिसते. यात पश्चिम भारतातील प्रागैतिहासिक काळातील दगडांच्या आणि हत्यारांचा संग्रह तसेच हडप्पा संस्कृतीतील उत्कृष्ट दगडी शिल्पे, हडप्पा संस्कृतीची ओळख करून देणारी रत्ने आणि शंखापासून बनविलेले दागिने आणि खेळणीही इथे पाहायला मिळते.
आपल्या सभोवतालच्या वनस्पती
आणि पशुपक्ष्यांविषयी जनसामान्यांचे
ज्ञान वाढावे, हा ‘प्रकृतिविज्ञान दालना’चा
मुख्य हेतू आहे. सस्तन, सरपटणारे, उभयचर प्राणी आणि माशांच्या लोप पावत चाललेल्या प्रजाती टॅक्सीडर्मी स्वरूपात जतन करण्यात आल्या आहेत.
पहिल्या मजल्यावर ‘लघुचित्र दालन’ आहे. १४व्या ते १९व्या शतकातील राज्यकर्ते, धनिक, राधेच्या मन:स्थितीचे वर्णन करणारी सखी, माळी, अस्वल, अजमेरच्या दर्ग्यात खैरात वाटणारा जहांगीर बादशहा, राम-परशुराम भेट वगैरेंचे बारीकसारीक तपशील दाखवणारी चित्रे या दालनात आहेत. या दालनाशेजारी ‘शोभिवंत कलावस्तू’ दालन आहे. त्यात लाकूड, हस्तिदंत, धातू किंवा दगड वापरून तयार केलेल्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे नमुने बघायला मिळतात. त्यात १९०३ साली दिल्लीच्या भारतीय कला प्रदर्शनात सुवर्णपदक जिंकलेली ‘अलंकार मंजुषा’ नावाची कलाकुसर केलेली लाकडी पेटी, हस्तिदंती वाडगा, हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या भारतीय आभूषणांचा समावेश आहे. या ठिकाणी गूढ पण आकर्षक वाटणाऱ्या वज्रयान बौद्ध पंथाच्या तांत्रिक जगाचे दर्शन घडते. या मजल्यावरील विस्तारित इमारतीत ‘कार्ल आणि मेहेरबाई’ नावाचे दालन आहे. लघुचित्रे, शिल्पे, काष्ठकाम केलेल्या विविध वस्तू आणि चित्रांचा यात समावेश आहे. तर ‘नाणे दालन’ येथे गोल, लंबगोल, वर्तूळ, चौकोनी आकारातील व पाने, फुले, पक्षी यांची कलाकुसर असलेली पंचमार्क नाणी आणि चंद्रगुप्त द्वितीय, जहांगीर बादशहा, शिवाजी महाराज यांनी आणलेली नाणी इथे पाहायला मिळतात.
मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ‘कलावस्तूंचे दालन’ आहे. त्यात पोर्सलेन, सिरॅमिक, क्रिस्टल, इनॅमलवेअर, लाकूड तसेच धातूपासून तयार केलेला खुजा, टेबलस्क्रीन, वाडगा, धूपदाणी यांसारख्या वस्तू, वूड ब्लॉक प्रिंट आणि जपानी भरतकामाचे दुर्मीळ नमुने पाहायला मिळतात. ‘युरोपियन चित्रांचे दालन’ हे आणखी एक दालन पाहायला मिळते. या दालनात बोनिफेशिओ वेरोनीझ, मत्तिया प्रेती, विल्यम पॉवेल फ्रीथ, विल्यम जेम्स मूलर, बॉदिन, कॉन्स्टेबल, डॅनियल मॅक्लीज, विल्यम स्ट्रँघ, जेकब द बेकर, पिटर पॉल रुवेन्स, सर थॉमस लॉरेन्स या दिग्गज कलाकारांची तैलचित्रे लावलेली आहेत. या ठिकाणी आणखी प्रेक्षणीय दालन म्हणजे ‘शस्त्र दालन’. यात हडप्पा संस्कृतीतील ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकातील म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीच्या ब्राँझ आणि तांब्याच्या तलवारी, खंजीर, बाण, भाला, १७व्या ते २०व्या शतकातील आणि मराठ्यांची विविध प्रकारची शस्त्रात्रे पाहायला मिळतात.
या वास्तूचा पायाभरणी समारंभ ११ नोव्हेंबर १९०५ रोजी खुद्द प्रिन्स आॅफ वेल्स (नंतरचे किंग जॉर्ज पंचम) यांच्या हस्तेच झाला. १९०९मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी स्थापत्य विशारदांची खुली स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून जॉर्ज विटेट यांची निवड झाली. ते इंडो-सारसेनिक शैलीचे वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध होते.
संग्रहालयाची ही इमारत इंडो-सारसेनिक शैलीच्या बांधकामाचा उत्तम नमुना आहे. इंडो-सारसेनिक शैलीत हिंदू आणि इस्लामी वास्तुशैलीचा मिलाफ असल्याने या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या पांढऱ्या गोल घुमटाकडे पाहून विजापूरच्या घुमटाची आठवण येते. इमारतीचे बांधकाम १९१४मध्ये पूर्ण झाले. मात्र, जनतेसाठी हे वस्तुसंग्रहालय १० जानेवारी १९२२ रोजी खुले झाले. दरम्यानच्या काळात या इमारतीचा उपयोग लष्करासाठी इस्पितळ तसेच बाल कल्याण केंद्र म्हणून करण्यात आला.