स्वतंत्र विदर्भाचा विषय तापणार
By Admin | Updated: August 1, 2016 05:19 IST2016-08-01T05:19:47+5:302016-08-01T05:19:47+5:30
निमित्त स्वतंत्र विदर्भाच्या प्रस्तावाचे असले तरीही त्याच्या आडून भाजपा- शिवसेनेच्या राजकीय लढाईची ही सुरुवात झाली आहे.

स्वतंत्र विदर्भाचा विषय तापणार
निमित्त स्वतंत्र विदर्भाच्या प्रस्तावाचे असले तरीही त्याच्या आडून भाजपा- शिवसेनेच्या राजकीय लढाईची ही सुरुवात झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे काय हा विषय यात कुठेच नाही...
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष ज्या पद्धतीने विधान दोन्ही सभागृहात कार्यरत आहे ते पाहाता एकाच राज्यात विरोधकांच्या दोन भूमिका पाहायला मिळत आहेत. ज्या आक्रमकतेने विधान परिषदेत विरोधी पक्ष कार्य करीत आहे त्याविरुद्ध विधानसभेत चित्र पाहायला मिळत आहे. याचा अर्थ दोघांमध्ये संवाद नाही किंवा एकवाक्यता तरी नाही. भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीवरून विधान परिषदेचे कामकाज विरोधकांनी तीन दिवस पूर्णपणे रोखून धरले. त्याच वेळी विधानसभेत मात्र रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते! स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव लोकसभेत भाजपाचे नाना पटोले यांनी मांडल्याचा मुद्दा सगळ्यात आधी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत उपस्थित केला. प्रचंड गदारोळ होऊन वरच्या सभागृहाचे कामकाज बंद पडल्यानंतर विधानसभेत हा विषय चर्चेला आला. यावरून विरोधकांच्या भूमिका दोन्ही सभागृहांत वेगवेगळ्या कशा आहेत, याचे चित्र राज्यासमोर आले. दोन्ही सभागृहातील विरोधकांच्या दोन वेगळ्या भूमिका हाच सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
तिकडे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सत्तेत वाटेकरी असणाऱ्या भाजपा-शिवसेनेतच जोरदार जुंपली. हा विषय एवढ्यावरच थांबणारा नाही. उलट आता कुठे या विषयाला सुरुवात झाली आहे. नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा ठराव त्यांच्या मनात आला आणि लगेच मांडला एवढ्या सहजतेने हा विषय घडला असेल असे वाटत नाही. त्याआधी राज्यातले राजकीय वातावरण पाहिले पाहिजे.
राज्याचे गृहमंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे येणारी माहिती अमर्याद असते. अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन जेवण करून आले. तरीही शिवसेनेने आपली ‘लाईन’ बदलली नाही किंवा मवाळही केली नाही.
‘शिवसेनेची एकहाती सत्ता कधीच आली असती, पण युतीत आमची २५ वर्षे सडली..! बोले तैसा चाले असे वागणारा नेता अजून तरी देशाला मिळालेला नाही, शिवसेनेची कोंडी होत असेल तर सरकारमधून बाहेर पडेन... समजलं का’? अशी दम भरणारी भाषा करून, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत स्वत:चा ‘स्टॅण्ड’ स्पष्ट केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक झाली. आमच्या आमदारांची कामे होणार नसतील तर सत्तेतून बाहेर पडू, असा सूर त्यात सगळ्या आमदारांनी लावला. दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जो मोर्चा काढला त्यात शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते. मोर्चा प्रचंड निघाला. ‘तुमचे रामदास आठवले तर आमचे प्रकाश आंबेडकर’ असा मेसेजही त्यात होता. या सगळ्या घटनाक्रमाच्या साखळीत शेवटची कडी होती राज-उद्धव यांची भेट. दोघांची भेट शुक्रवारी झाली. पण त्याआधी दोन-तीन दिवस आधीच तिचे नियोजन झाले होते. दोघांची फोनाफोनी झाली होती, तारीख, वेळही ठरवून दोघे भेटले. हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा विषय सहजपणे आला की सहेतूक आणला गेला, याचा शोध घेणे राजकीय दृष्टीने महत्त्वाचे आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी या भांडणांमध्ये आणि वादावादीत वाढ होईल. भाजपाला आपल्या जागा वाढवायच्या आहेत आणि उद्धव ठाकरेंना पक्ष एकसंध ठेवून मुंबई महापालिका कायम राखायची आहे. मुंबईत काँग्रेस थोडीफार टक्कर देऊ शकेल. पण राष्ट्रवादीचा आणि मनसेचा स्वत:च्याच अस्तित्वासाठी लढा असल्याने आपली खरी लढत भाजपासोबतच राहणार आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आली आहे. त्यामुळे सत्तेत राहूनही आम्ही तुमच्या चुकीच्या कामात सहभागी नाही, तुम्ही काही चुकीचे कराल तर आम्ही त्याच्या पाठीशी राहणार नाही, हे ठसवण्यात आज तरी उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा ठराव सहजपणे घेण्याचा विषय राहिलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करणारी असेल. त्याची ही सुरुवात आहे.
- अतुल कुलकर्णी