उद्याचे माउली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:24 IST2018-01-03T00:24:03+5:302018-01-03T00:24:51+5:30
विठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली.

उद्याचे माउली
- डॉ. गोविंद काळे
विठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली. हे तर आणखी सोपे झाले. माउलीच्या रूपाने चैतन्य साक्षात साकारले. वारकरी तर देहभान विसरून माउली! माउली! एवढाच जयजयकार करूलागले. माउलीचा ध्वनी ब्रह्मांड भेदून पार पैलाड गेला. मराठमोळ््या संस्कृतीने विश्वाला माउली दिली आणि वेडे केले बघा. विठू अंतर्धान पावला म्हणून काय झाले. विठूची जागा ज्ञानेश्वरांनी घेतली आणि भक्तांना त्रैलोक्य तोकडे झाले. माउलीचा जयजयकार करीत वारकºयांनी चेतनाचिंतामणीचे गांव गाठले. अमृतकण नव्हे तर अमृतीचा सागर त्यांना गवसला.
परवा गावाकडच्या मंदिरात काकड आरतीसाठी उपस्थित राहाण्याचा योग आला. सारे दर्शनार्थी एकमेकांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करीत होते. सोबत असलेल्या नातीला म्हणालो अगं! त्या आजोबांना नमस्कार कर म्हणताक्षणी नातीने नमस्कार केला. त्याबरोबर त्या वयस्क आजोबांनी तिच्या पायावर डोके टेकविले नि म्हटले माउली नमस्कार. नात गांगरली. तसे ते म्हणाले आम्हा वारकरी संप्रदायाची ही शिकवण. ‘‘जे जे भेटिजे भूत। ते ते मानिजे भगवंत’’. अनाकलनीय कविता लिहिणाºया आणि मराठी साहित्यात नवकवी म्हणूून अजरामर झालेल्या मर्ढेकरांच्या कवितेत माउली भेटली.
‘‘पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो
थांब उद्याचे माउली तीर्थ पायीचे घेतो.
कुमारिकेमध्ये त्यांना उद्याचे मातृत्व दिसत होते. माउलीचा साक्षात्कार झाला. हा मर्ढेकर नावाचा नवकवी माउलीचे दर्शन घेऊनच थांबला नाही तर तिच्या पायीचे तीर्थ घेण्यासाठी पुढे सरसावला. माउलीचा परम अर्थ मर्ढेकरांच्या कवितेत गवसला. आपल्या संस्कृतीमधील ‘कुमारिका पूजन’ अर्थ कळला. नारायण अथर्वशीर्ष वाचताना
‘‘नारायणाद् ब्रह्मा जायते। नारायणाद् विष्णुर्जायते
नारायणात् प्रवर्तंते । नारायणे प्रलीयन्ते’’
अशा नारायणाला हात जोडले तेव्हा समोर माउली उभी राहिली. नारायणाचे स्वरूप म्हणजे माउली. सान्ताला कवेत घेणारी अन्नरूपी माउली. माउली या तीन अक्षरांचा परिचय ज्याला झाला त्याला परमार्थ सोपान सुलभ झाला.