भाजपचे प्रदेश कार्यालय हे सध्या ‘प्रवेश कार्यालय’ बनले आहे. मध्यंतरी तिकडे ‘जाहीर प्रवेश’ असा मोठ्ठा फ्लेक्सच लावलेला होता आणि एक व्यासपीठही बनविलेले होते. ते आता दिसत नाही; पण म्हणून प्रवेशाचा ओघ मात्र अजिबात थांबलेला नाही. भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट या सत्तेतील तीन पक्षांनी विधानसभा निवडणूक भरभक्कम बहुमताने जिंकल्यापासून राजकीय कार्यकर्ते, नेत्यांना आपापल्या पक्षात ओढून नेण्याचा सपाटा लावला आहे. अल्पावधीत सर्वाधिक पक्षांतरे झाल्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर निश्चितच होईल.
या तिघांच्या कचाट्यातून कोणी सुटलाच तर त्याला आपल्याकडे ओढून घेण्यात काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट मागे राहत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आधी अशी घाऊक पक्षांतरे घडलेली होती, ती नेत्यांची निवडणूक होती. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येला मर्यादा होती. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असल्याने पक्षांतराची महाजत्राच भरलेली आहे. कोण कार्यकर्ता, खालचा नेता आज कोणत्या पक्षात आहे हे छातीठोकपणे सांगणेही कठीण झाले आहे. काही तासांपूर्वी प्रवेश दिला अन् लगेच नगराध्यक्षाचे तिकीट दिले अशी उदाहरणे सर्वच पक्षांमध्ये दिसत असून, कायम गृहीत धरले गेलेले निष्ठावंत बिचारे हतबल झाले आहेत. जमेल तिथून बाहेरची माणसे आणली जात आहेत.
राजकारणात शत्रू-मित्र अशी शाब्दिक विभागणी असते; पण प्रत्यक्षात दोघांमध्ये फारशी भिंत राहत नाही. पूर्वी ती असायची; पण आजच्या उथळ राजकारणात ती फारच तकलादू झाली आहे. सत्ता म्हणजे चुंबक आणि राजकारणी म्हणजे लोहकण. चुंबकीय क्षेत्र जिथे जास्त तिकडे चटकन झुकण्याचा लोहकणाचा जन्मजात स्वभाव. महायुतीच्या सत्ताचुंबकाला सध्या तासागणिक हजारो लोहकण पटापट चिकटत आहेत. भविष्यात या चुंबकाची खेचून घेण्याची शक्ती कमी होईल तेव्हा हे लोहकणही चुंबकापासून निसटतील आणि त्यावेळी असलेल्या अधिक ताकदीच्या चुंबकाला जावून चिकटतील. सत्तेसोबत जाण्यामागे राजकीय आकांक्षा आणि सुरक्षित जागेचा शोध अशी दोन मुख्य कारणे असतात. या प्रवेशाआड पालघरपासून तुळजापूरपर्यंतची गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसेही स्वत:ला पवित्र करवून घेतात. ते तर संधीसाधू आहेतच; पण त्यांना प्रवेश देऊन पवित्र करवून घेणाऱ्यांना आपल्या पक्षाचे संख्याबळ कसेही अन् काहीही करून वाढविण्याचा लागलेला रोग हा अधिक चिंतेचा विषय आहे.
अपप्रवृत्तींना आपल्यात घेऊन ताकद वाढल्याचे समाधान मिळेलही; पण पक्षाच्या प्रतिमेशी आपण तडजोड करत आहोत याचे भान ठेवले गेले नाही तर राजकीय अवमूल्यनाचा प्रवास अधोगतीकडे होण्याची भीतीच अधिक. विरोधी पक्षातील लोकांना आपल्यात आणण्याची महत्त्वाकांक्षा हा एक भाग झाला; पण आता विरोधकांमधून आपल्याकडे ओढण्यासारखे फारसे महत्त्वाचे कोणी राहिलेले नाहीत म्हणून की काय मित्रपक्षातील लोकांना गळाला लावण्याची तीव्र स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात कटुता आली आहे. दोघेही आपसात झालेला विश्वासाचा अलिखित करार मोडत आहेत. हे दोन पक्ष एकमेकांवर करत असलेल्या राजकीय कुरघोडीचा परिणाम सरकारवरही होईल, अशी चिन्हे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारातून दिसू लागली आहेत.
एकमेकांची शक्ती कमी करण्याचे असेच प्रयत्न होत राहिले तर सरकारवर त्याचा आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय युती ही परस्पर आदरावर टिकते. आज खेचाखेचीमुळे हा आदर कमी होताना दिसतो. युतीतील गोडवा साखरेचा नाही, तर मधुमेहाचा वाटत आहे. अशा ओढाओढीचा फटका सरकारच्या स्थैर्याला बसू शकतो, याचे भान दोन्ही पक्षांना दिसत नाही. एकमेकांची माणसे पळविल्याने सरकार लगेच अस्थिर होईल किंवा दोन पक्षांमध्ये लगेच टोकाची कटुता येईल, असे नाही; पण भविष्यात एकमेकांपासून दुरावण्याचा प्रसंग आलाच तर त्याचे मूळ या पळवापळवीतही असेल. ‘पळा, पळा कोण पुढे पळे तो’, याऐवजी ‘पळवा पळवा कोण आधी पळवे तो’ हे जे काही चालले आहे ते लगेच थांबेल असेही दिसत नाही. दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी ‘नो-पोचिंग’ करारावर सहमती दर्शविली आहे खरी; पण एकामागे एक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत पळवापळवी होणारच नाही, याची खात्री देता येत नाही.
Web Summary : Maharashtra's ruling parties are aggressively poaching members, leading to widespread defections, especially before local elections. This competition strains relationships, particularly between BJP and Shinde Sena, potentially affecting government stability. The relentless pursuit of numbers raises concerns about compromising party integrity.
Web Summary : महाराष्ट्र में सत्तारूढ़ दल आक्रामक रूप से सदस्यों की तलाश कर रहे हैं, जिससे व्यापक दलबदल हो रहा है, खासकर स्थानीय चुनावों से पहले। यह प्रतिस्पर्धा रिश्तों को तनावपूर्ण बनाती है, खासकर भाजपा और शिंदे सेना के बीच, जिससे सरकार की स्थिरता प्रभावित हो सकती है। संख्याओं की अथक खोज पार्टी की अखंडता से समझौता करने के बारे में चिंता बढ़ाती है।