शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 9:35 AM

आधीच आपले राजकारण व समाजकारणाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काहीही करण्याचा उद्दामपणा पुरता अंगात भिनला आहे

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेतील एका वक्तव्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी चंद्रपुरात मोरवा विमानतळाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मोदींच्या भाषणाआधी शिरस्त्याप्रमाणे बाकीचे वक्ते बोलले आणि त्यात उमेदवार मुनगंटीवारही होते. त्यांची लढत या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार आणि गेल्यावेळी पक्षाला महाराष्ट्रातील ही एकमेव जागा जिंकून देणारे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याशी होत आहे. दिवंगत खासदारांच्या पत्नी म्हणून प्रतिभा धानोरकर यांच्याप्रति मतदारांमध्ये थोडीबहुत सहानुभूती आहे आणि त्यामुळे राज्यातील वजनदार मंत्री असतानाही मुनगंटीवार यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. ते आव्हान पेलताना आपल्या चिरपरिचित आक्रमक शैलीत काँग्रेसवर टीकेची झोड उठवून देण्याचे त्यांनी ठरविले असावे. त्यातूनच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर, विशेषत: राजधानी दिल्लीत उसळलेल्या शीख दंगलीचा मुद्दा मुनगंटीवारांनी उचलला. त्या दंगलीतील हिंसाचाराचे वर्णन करताना त्यांची जीभ घसरली आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याबद्दल असे घाणेरडे, बीभत्स वाक्य त्यांनी उच्चारले की, असभ्य वगैरे सांस्कृतिक दूषणेही अपुरी पडतील. ते विधान अजाणतेपणे निघाले असावे, असे म्हणायलाही वाव नाही. कारण, मुनगंटीवारांच्या भारतीय जनता पक्षाकडून त्याचे समर्थन केले जात आहे. केवळ ते वाक्य ऐकू नका, संपूर्ण भाषण व त्यातील संदर्भ समजून घ्या, अशा पद्धतीने समर्थन केले जात असल्याने संतापात भर पडत आहे. एकंदरीत, याहीपेक्षा आणखी काही खालची पातळी असू शकते का, असा प्रश्न पडावा इतके हे आपल्या राजकारणाचे चिंताजनक अध:पतन आहे.

आधीच आपले राजकारण व समाजकारणाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काहीही करण्याचा उद्दामपणा पुरता अंगात भिनला आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा खुलेआम वापर करता करता सार्वजनिक जीवनातील वर्तणुकीचे पावित्र्य, राजकारणातील सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, शूचिता या सगळ्याचे भान आपण हरवून बसलो आहोत. धर्माचे उल्लेख जाहीरपणे करू नयेत, असे संकेत असताना टीव्हीच्या पडद्यावर सकाळ - संध्याकाळ खुलेआम हिंदू - मुस्लीम चालते आणि त्याला राजकारणाची खुलेआम फूस आहे. कब्रस्तान व स्मशानभूमीवर मते मागितली जातात. धर्माच्या आधारावर मते मागण्यासाठी वर्षानुवर्षे लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून तीस - पस्तीस वर्षांपूर्वी कधीतरी धार्मिक मालिकेत काम केलेल्या नटनट्यांना निवडणुकीत उतरविले जाते. हे सगळे तिकडे उत्तरेच्या हिंदी पट्ट्यात चालते, आमचा महाराष्ट्र सुसंस्कृत व सभ्य आहे, असे मराठी माणसे म्हणायची. तथापि, हा तुमचाआमचा तोराही आता पार गळून पडला आहे. कारण, महाराष्ट्राचे राजकारणही अत्यंत गढूळ, असभ्य बनले आहे. दरोडेखोरांच्या टोळ्या चालवाव्यात तसे पक्ष चालवले जात आहेत. आपल्या वयाइतके ज्यांचे सार्वजनिक आयुष्य, त्यांनाही अरेतुरे करीत अश्लाघ्य भाषेत टीका करणारी एक टोळी महाराष्ट्रातही फोफावली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे विधान हा तर त्यापलीकडचा प्रकार आहे.

गेली पस्तीस वर्षे सार्वजनिक जीवनात, राजकारणात असलेल्या आणि अलीकडच्या काही वर्षांत वित्त, वन वगैरे खात्याचे मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप उमटविलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या तोंडून असे काही बाहेर पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. मुनगंटीवारांच्या घराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा आहे. त्यांचे दिवंगत वडील संघात वरिष्ठ पदावर होते. त्या सांस्कृतिक संघटनेतील मूल्यांचा वारसा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे आणि विशेषकरून गेली पावणेदोन वर्षे त्यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी आहे. या खात्याचे मंत्री म्हणून काम करताना छत्रपती शिवरायांची वाघनखे इंग्लंडमधील संग्रहालयातून आणण्याच्या आणि राज्यभर त्यांचे प्रदर्शन भरविण्याच्या त्यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा झाली. वाघनखांचे हे असे प्रतिकात्मक राजकारण करण्यापेक्षा त्यांनी छत्रपतींनी प्रत्यक्ष कृतीमधून महाराष्ट्रासमोर ठेवलेले आदर्श आत्मसात केले असते तर ते अधिक चांगले झाले असते. ते आदर्श हेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे आणि निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी संपूर्ण महाराष्ट्राला मान खाली घालावी लागावी, असा मोठा तडा मुनगंटीवार यांच्या विधानामुळे त्या संचिताला गेला आहे, हेच खरे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा