शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:55 IST

Ramoji Rao : चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने  ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, चित्रपटक्षेत्र, हॉटेल उद्योग, एनबीएफसी, राजकारण अशा विविध क्षेत्रांत रामोजी राव यांनी आपला ठसा उमटवला.

चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या यायच्या होत्या, त्या काळात ‘ई टीव्ही मराठी’ दिसू लागले.  पुण्या-मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र आहे, हे तोवर ज्यांना ठाऊकही नव्हते, त्यांना ‘ई टीव्ही’ने चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र दाखवला. आडगावे पडद्यावर दिसू लागली आणि ज्यांना मुख्यप्रवाही माध्यमे नोकऱ्या देत नव्हती, अशी तरुण मुलेही पडद्यावर झळकू लागली. रामोजी राव महाराष्ट्राला ठाऊक झाले ते तेव्हा. अनवट कल्पना प्रत्यक्षात साकारणारा हा मुलुखावेगळा माणूस शेवटपर्यंत नवनवी स्वप्ने पेरत राहिला. अद्भुत ज्ञानलालसेने शिकत राहिला. नवे जग उभारत राहिला. चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने  ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, चित्रपटक्षेत्र, हॉटेल उद्योग, एनबीएफसी, राजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापारुपुडीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोटी रामोजी यांचा १६ नोव्हेंबर १९३६ रोजी जन्म झाला. उद्योगाचे महत्त्व त्यांना लहान वयातच समजले. प्रारंभी चिट फंडाचा व्यवसाय, त्यानंतर जाहिरात क्षेत्रात पाऊल, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मासिकाची निर्मिती असे अनेक व्यवसाय सुरुवातीच्या काळात त्यांनी केले. ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले, ते ईनाडू’ हे तेलुगू वृत्तपत्र सुरू केल्यानंतर. माध्यम क्षेत्रात अनेक नवे प्रयोग त्यांनी केले. आज विविध माध्यमांमध्ये जी व्यवस्था दिसते, त्याचे सुरुवातीचे प्रयोग रामोजी यांच्या मार्गदर्शनाखाली घडले.  ‘ईनाडू’ घराघरांत पोहोचले. माध्यमात राहून उघड राजकीय भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. तेलुगू देसम पार्टीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. सध्या ‘किंगमेकर’ म्हणून देशभर आंध्र प्रदेश आणि तेलुगू देसम पार्टीचा बोलबाला आहे. या पक्षाला बळ देत ‘तेलुगू अभिमान’ चर्चेत आणला तो रामोजींनी. आंध्र प्रदेशातील राजकीय समीकरणे तेव्हापासून बदलली. काँग्रेसला राज्य स्तरावरील राजकीय आघाडीवर फेरबदल करावे लागले. राजकीय पाठिंबा देऊन माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकता त्यांनी जपली. नवे तंत्रज्ञान स्वीकारून नवे प्रयोग केले. वृत्तवाहिन्यांचा ‘कर्कश’पणा नसतानाच्या काळात त्यांनी प्रथम ‘ई टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू केली. पत्रकारांसाठी ती एक प्रशिक्षण शाळाच होती. अनेक भाषांतील बातमीपत्रे तेथून निघायची. नवे तंत्रज्ञान वापरायचा आग्रह, तशी व्यवस्थाही असायची.

माध्यम क्षेत्राबरोबरच रामोजी यांचे नाव जगप्रसिद्ध झाले, ते ‘रामोजी फिल्म सिटी’ या जगातील सर्वांत मोठ्या फिल्म सिटीमुळे.  पर्यटकांचे ते आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. हैदराबादमध्ये उभारलेल्या फिल्म सिटीमध्येही रामोजी यांची कल्पकता आणि नवे तंत्रज्ञान वापरण्यासाठी केलेली सोय त्यांची काळाच्या पुढे पाहणारी दृष्टी दाखवते. ‘बाहुबली’सह अनेक चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे. अनेकांच्या कल्पनांना, स्वप्नांना या सिटीने उभारी दिली. परिपूर्णता दिली. ‘उषाकिरण मूव्हिज’ ही प्रॉडक्शन कंपनी त्यांनी सुरू केले. अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. माध्यम क्षेत्राप्रमाणेच चित्रपटनिर्मितीमध्येही अतिशय सूक्ष्म विचार करण्याची त्यांची पद्धत होती. ते कथेला प्राधान्य द्यायचे. माध्यमातील एखाद्या बातमीवरून चित्रपटही बनविता येतो, हे त्यांनी ‘नाचे मयुरी’ चित्रपटातून दाखवून दिले. सुधा चंद्रन यांच्यावर हा सिनेमा चित्रित करण्यात आला होता. उद्योग क्षेत्रात यशस्वी होऊनही समाजाशी, शेतीशी नाळ त्यांनी तोडली नाही. ज्या गावात जन्माला आले, त्या गावात त्यांनी अनेक विकासकामे केली. ते ज्या शाळेत शिकले, त्याची पुनर्बांधणी त्यांनी केली. नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नळजोडीसारखी कामेही त्यांच्या माध्यमातून झाली. पेडापारुपुडी गावाला त्यांनी कधीही आपल्यापासून दूर लोटले नाही. त्यांच्या निधनाने आज सारा गाव शोकाकुल झाला आहे. रामोजी रावांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. प्रसारमाध्यम, राजकारण, चित्रपट, जाहिरात, हॉटेल उद्योग अशा साऱ्या ठिकाणी काम करताना एक सामायिक गुण त्यांच्याकडे होता, तो म्हणजे सतत नावीन्याचा ध्यास. तरुणांना लाजवेल असा उत्साह, नवतंत्रज्ञानाची समज आणि नवी उद्दिष्टे गाठण्याची त्यांची चिकाटी. प्रतिभेचे पंख लावून रोज नवी स्वप्ने पाहणाऱ्या आणि चिवटपणे त्या स्वप्नांचा पाठपुरावा करत साम्राज्य उभ्या करणाऱ्या रामोजी रावांची गाथा एखाद्या भव्य सिनेमालाही कवेत घेता येणार नाही. भव्य उद्योग उभारतानाच, सांस्कृतिक भुयारातून लोककल्याणकारी राजकारणाला आकार देणाऱ्या या महर्षी सम्राटाला ‘लोकमत’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनMediaमाध्यमेcinemaसिनेमा