शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: ..आता ‘ट्रम्प’ विरुद्ध ‘मस्क’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:08 IST

Trump Vs Musk: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वाह्यात मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, तर आपण का होणार नाही, असे इलॉन मस्क यांना अगदीच वाटू शकते! शिवाय, आपण ट्रम्पना अध्यक्ष करू शकतो, तर स्वतः का होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटणे हेही स्वाभाविकच. थापा मारणे, विखार पसरवणे, हिटलरी शैलीत नाझी सलाम ठोकणे, असे सगळे आपणही तर करू शकतो. अध्यक्षपदासाठी यापेक्षा आणखी पात्रता कोणती, असा विचार मस्क नक्कीच करू शकतात!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वाह्यात मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, तर आपण का होणार नाही, असे इलॉन मस्क यांना अगदीच वाटू शकते! शिवाय, आपण ट्रम्पना अध्यक्ष करू शकतो, तर स्वतः का होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटणे हेही स्वाभाविकच. थापा मारणे, विखार पसरवणे, हिटलरी शैलीत नाझी सलाम ठोकणे, असे सगळे आपणही तर करू शकतो. अध्यक्षपदासाठी यापेक्षा आणखी पात्रता कोणती, असा विचार मस्क नक्कीच करू शकतात! ते अमेरिकेत नाहीत, तर आफ्रिकेत जन्मले आहेत, ही घटनात्मक अडचण आहे. त्यांचे आई-वडील अमेरिकन नाहीत, हा अडसर आहेच. मात्र, त्यावरही कदाचित मार्ग निघू शकतो. किमान आपल्याला हवे, त्याला आपण अध्यक्ष करू शकतो, असा विचार मस्क करत असावेत. ‘मी नसतो, तर ट्रम्प विजयी झालेच नसते!’, असे इलॉन मस्क म्हणाले आहेत. त्यावर, ‘त्या मस्कचं डोकं फिरलंय’, असे ट्रम्प उत्तरले! आपलं राजकारण बरंच म्हणायचं, असं जगातल्या कोणत्याही देशाला वाटावं, असले प्रकार सध्या अमेरिकेत सुरू आहेत.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा तिथला ‘कमांडर-इन-चिफ’ही असतो. तो जगातला सर्वाधिक शक्तिशाली माणूस मानला जातो. दुसरीकडे, इलॉन मस्क हे जगातले सर्वांत श्रीमंत गृहस्थ. या दोन बलदंड माणसांच्या बेमुर्वतखोर भांडणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. एक काळ होता. ट्रम्प आणि मस्क यांच्या प्रेमाची चर्चा सर्वदूर सुरू होती. ट्रम्प यांच्या प्रचारात मस्क तन-मन-धनाने उतरले.  ‘चोर-चोर मौसेरे भाई’ असतात, तसे दोघे अगदी सोबत होते. स्थलांतरितांना विरोध, श्वेतवर्णीय राजकारणाला बळ, पुरुषसत्ताक मानसिकता या मुद्द्यांवर दोघे एकत्र होते. मस्क हे खरे म्हणजे स्वतः स्थलांतरित. ते मोठे झालेच मुळी अमेरिकेच्या समंजस व्यापकतेमुळे. मात्र, पैसे आले आणि मस्क यांची बुद्धी भ्रष्ट झाली. सहिष्णुतेमुळेच मस्क बलशाली झाले आणि नंतर मात्र विखारी रस्त्यावरून निघाले. रिपब्लिकन पक्षाविषयी त्यांना आधीच प्रेम. त्यात ट्रम्प भेटले. मग या जोडगोळीने उच्छाद मांडला. ट्रम्प यावेळी निवडून आल्यावर तर या जोडीला स्वर्ग दोन बोटे उरला. नेते आणि उद्योजक यांचे ‘साटेलोटे’ जगाला नवीन नाही. अमेरिकेत मात्र आणखी वेगळे घडले. ट्रम्प यांनी मस्क यांच्या हातात सरकारचीच धुरा सोपवली. खरी गडबड इथे झाली. मस्क हे काही फक्त उद्योजक नव्हेत. मीडियालाही ते ताब्यात ठेवू इच्छितात. शिवाय, त्यांच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. आता तर नव्या राजकीय पक्षाची घोषणाच काय ती बाकी आहे! ‘द अमेरिका पार्टी’ असा नवा पक्ष मस्क स्थापन करू शकतात. तशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

ट्रम्प विरुद्ध मस्क या संघर्षाला तो पदर आहेच. या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’ आहे, तर इलॉन मस्क यांच्याकडे ‘एक्स’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्यातील मतभेदांचं आता शाब्दिक युद्धात रूपांतर झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया साइटवरून इलॉन मस्क यांच्याविरोधात लिहिलं, ‘इलॉन मस्क यांचे सरकारी अनुदान आणि करार रद्द करणे, हा अर्थसंकल्पातील अब्जावधी डॉलर्स वाचवण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे.’ इलॉन मस्क त्यावर म्हणाले, ‘ट्रम्प यांनी आमच्या कंपन्यांच्या निधीत कपात करूनच बघावी. मग आम्हीही ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’चे काम त्वरेने बंद करू.’ ट्रम्प आणि मस्क यांच्यातील भांडणाने आता टोक गाठलं आहे. या भांडणाचा स्तर बघूनच दोघांची पात्रता लक्षात येते! तरीही, एका मर्यादेपलीकडे हा वाद जाणार नाही. दोघेही काचेच्या घरात मुक्कामाला असल्याने, एकमेकांवर फार दगडफेक करू शकणार नाहीत. दोन टोकाचे शत्रू अत्यंत जवळचे मित्र होऊ शकतात. मात्र, फार जवळचे मित्र खूप टोकाचे शत्रू होणं कठीण असतं. दोघांकडेही एकमेकांची पुष्कळ गुपितं आहेत. त्यामुळेच आता हा ताण थांबवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने मध्यस्थी सुरू केली आहे, तरीही या संघर्षाने दोघांचंही नुकसान होणार, यात शंका नाही. यात अमेरिकेचा आणि अवघ्या जगाचा फायदा एवढाच की, काट्याने काटा निघतो आहे!

टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्क