आजचा अग्रलेख: कुटनीतीच्या पर्वाची अखेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:36 AM2023-12-01T10:36:08+5:302023-12-01T10:36:46+5:30

Henry Kissinger: अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले आणि केवळ अमेरिकेच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील कुटनीतीच्या एका पर्वाची अखेर झाली.

Today's Editorial: Henry Kissinger: The end of the era of diplomacy! | आजचा अग्रलेख: कुटनीतीच्या पर्वाची अखेर!

आजचा अग्रलेख: कुटनीतीच्या पर्वाची अखेर!

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले आणि केवळ अमेरिकेच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील कुटनीतीच्या एका पर्वाची अखेर झाली. जन्माने जर्मन आणि धर्माने यहुदी असलेले किसिंजर शीतयुद्ध काळातील अमेरिकेच्या धोरणांचे शिल्पकार होते. रिचर्ड निक्सन आणि जेराल्ड फोर्ड या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनात परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळलेल्या किसिंजर यांच्या कार्यकाळात अमेरिका-चीन संबंध प्रस्थापित झाले, ऐतिहासिक अमेरिका-रशिया शस्त्रास्त्र नियंत्रण वाटाघाटी झाल्या, योम किप्पूर युद्धाची अखेर होऊन, इस्रायल व काही अरब देशांदरम्यान संबंध प्रस्थापित झाले आणि उत्तर व्हिएतनामसोबत पॅरिस शांतता करार होऊन, नाचक्कीस कारणीभूत युद्धातून अमेरिकेस बाहेर पडता आले. या सर्व घडामोडींमध्ये किसिंजर यांचा सिंहाचा वाटा होता.

एक मुत्सद्दी म्हणून किसिंजर यांची महानताच त्या घडामोडी अधोरेखित करतात. शीतयुद्धाच्या काळात जग अक्षरशः अण्वस्त्रांच्या ढिगाऱ्यावर होते. कधीही ठिणगी पडून तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल आणि जगाची राखरांगोळी होऊन मनुष्यजात पुन्हा अश्मयुगात पोहचेल, अशी परिस्थिती असताना, १९६९ ते १९७७ पर्यंत किसिंजर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्या काळात त्यांनी अनेकदा जगाला अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावरून परत आणले असेल. त्या कामगिरीसाठी तेव्हाच्या, आताच्या आणि यापुढील पिढ्यांनी किसिंजर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच! अशा या महान मुत्सद्याच्या मनात भारताविषयी मात्र एक प्रकारची अढी होती. जुलै २००५ मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने निक्सन आणि किसिंजर यांच्यात १९७१ मधील बांगलादेश युद्धापूर्वी झालेल्या दूरभाष संभाषणाच्या ध्वनिफिती सार्वजनिक केल्या होत्या. त्या संभाषणादरम्यान उभय नेत्यांनी तत्कालीन भारतीय पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि एकूणच भारतीयांसंदर्भात अत्यंत अशोभनीय भाषा वापरली होती. पुढे किसिंजर यांनी त्यासाठी क्षमायाचना केली होती आणि इंदिराजींबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना होती, असे वक्तव्य केले होते. त्या संभाषणामागील शीतयुद्धकालीन संदर्भ विचारात घ्यायला हवे, अशी मल्लीनाथीही त्यांनी केली होती. संदर्भ काहीही असले तरी निक्सन आणि किसिंजर यांनी वापरलेली भाषा कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. जगाला नीतीमत्तेचे पाठ पढविणाऱ्या अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यांच्या तोंडी तर अजिबातच नाही!

तत्कालीन सोव्हिएत रशियाशी असलेल्या भारताच्या घनिष्ट संबंधांमुळे अमेरिकेला चीन व पाकिस्तानसोबत जवळीक साधावी लागली होती, असे लंगडे समर्थनही किसिंजर यांनी केले होते. ऊठसूट लोकशाही मूल्यांची पाठराखण करणाऱ्या अमेरिकेला भारतासारख्या लोकशाही देशाला शह देण्यासाठी साम्यवादी चीनची साथही चालत होती, हाच किसिंजर यांच्या त्या वक्तव्याचा अन्वयार्थ होता. बांगलादेश युद्धाच्या वेळी निक्सन-किसिंजर जोडगोळीने भारताच्या पराभवासाठी मुत्सैद्दिक पातळीवर तर जंग जंग पछाडले होतेच; पण अमेरिकेचे सातवे आरमारही बंगालच्या उपसागरात पाठविले होते. त्या युद्धानंतर ‘पोलादी स्त्री’ अशी ओळख निर्माण झालेल्या इंदिराजींनी अमेरिकेला भीक घातली नाही आणि बांगलादेश नावाचा नवा देश जगाच्या नकाशावर निर्माण केला, हा भाग अलहिदा!

आजही अमेरिकेच्या त्या धोरण आणि वर्तनात कोणताही फरक पडलेला नाही. भारताच्या दृष्टीने किसिंजर यांची तेव्हाची भाषा आणि कृती कितीही निषेधार्थ असली तरी, अमेरिकेच्या दृष्टीने भाषा जरी नव्हे, तरी कृती योग्यच होती, हे ध्यानात घेतले पाहिजे. अमेरिका त्या काळात सोव्हिएत रशियाचा जगातील प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होती आणि भारत नेतृत्व करीत असलेल्या अलिप्त राष्ट्र संघटनेमुळे त्या प्रयत्नांना खीळ बसते, अशी किसिंजर यांची धारणा होती. त्यांनी उचललेल्या पावलांमुळे भारताच्या हितांना अनेकदा धक्का पोहचला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भारत व अमेरिकेचे संबंध नेहमीच तणावपूर्ण होते; परंतु भारत ही एक प्रादेशिक महासत्ता आहे, असे ते मानत आणि त्या अनुषंगाने भारतासोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. भारतीय धोरण निर्माते आणि विद्वानांसोबत त्यांनी सातत्याने संपर्क राखला. अलीकडील काळात त्यांनी चीनला वेसण घालण्यासाठी घनिष्ट अमेरिका-भारत संबंधांवर नेहमीच जोर दिला. अमेरिकेचे हित हीच त्यांची सर्वोच्च प्राथमिकता होती, हेच त्यामधून ध्वनित होते. अशा या महान मुत्सद्याची जग नेहमीच आठवण काढेल, हे निश्चित!

Web Title: Today's Editorial: Henry Kissinger: The end of the era of diplomacy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.