आजचा अग्रलेख : ‘रेड कॉरिडॉर’ला तडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:00 AM2024-04-18T06:00:37+5:302024-04-18T06:01:52+5:30

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले.

Today's editorial Crack the Red Corridor | आजचा अग्रलेख : ‘रेड कॉरिडॉर’ला तडा 

आजचा अग्रलेख : ‘रेड कॉरिडॉर’ला तडा 

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी दुपारी सशस्त्र चकमकीत तब्बल २९ नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यात शंकर राव व ललिता यांसारख्या डोक्यावर लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने नक्षल्यांचा खात्मा हा त्या हिंसक चळवळीला नक्कीच मोठा धक्का आहे. विशेषत: ‘रेड कॉरिडॉर’च्या रूपाने देशात समांतर सरकार चालविण्याचा माओवाद्यांचा मनसुबा अशा कारवायांमुळे जवळपास उद्ध्वस्त झाला, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले. पश्चिम बंगालमधील जंगलमहलपासून ते झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा ते दक्षिणेकडे केरळपर्यंत हिंसक कारवाया होत राहिल्या. देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना एक मोठा टापू त्यापासून वंचित राहिला. तथापि, परस्पर समन्वयातून सुरक्षा दलांच्या केलेल्या धाडसी कारवायांनी गेल्या दशकभरात दक्षिण, तसेच पूर्वेकडील बराच भाग या हिंसाचारातून मुक्त केला आहे. आता नक्षल्यांचे थोडेबहुत अस्तित्व मध्य भारतातील दक्षिण छत्तीसगड व आग्नेय महाराष्ट्राच्या छोट्याशा टापूतच शिल्लक आहे. त्यातही  अबूजमाड या दुर्गम व डोंगराळ भागात अजूनही नक्षल्यांचा गड कायम आहे. 

त्याच भागात कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा ते कारोनार गावांदरम्यान मंगळवारी पोलिस व निमलष्करी दलांनी नोंदविलेली कामगिरी कौतुकास्पद आणि नक्षल्यांचा सुपडासाफ करण्याच्या दिशेने मोठे व महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल. कारण, मतदान व लोकशाही प्रक्रियेला प्रचंड विरोध असलेल्या नक्षल्यांना सुरक्षा दलांनी ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्का दिला आहे. कांकेरच्या दक्षिणेकडील बस्तर व पश्चिमेकडील गडचिरोलीत पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या, १९ एप्रिलला होत आहे, तर कांकेर मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी होईल. साहजिकच या तिन्ही मतदारसंघांमध्ये घातपात घडविण्याचा प्रयत्न हिंसक माओवाद्यांकडून अपेक्षित होता. 

गडचिरोलीत प्रचार सुरू झाल्यापासून तेलंगणा सीमेकडून नक्षल्यांची घुसखोरी होत असल्याचे लक्षात आले होते. पोलिसांनी १९ मार्च रोजी कोलामार्का भागात अशी घुसखोरी करणारे चार नक्षलवादी मारले. त्यात विभागीय समितीच्या सदस्यांचा समावेश होता. नंतर दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना पिपली बुर्गीजवळच्या जंगलात अटक करण्यात आली. आता महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या कांकेर येथे मारले गेलेले नक्षलवादी कदाचित महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसी कारवायांमुळेच तिकडच्या डोंगरांमध्ये लपून बसण्यास बाध्य झाले असावेत.  नक्षली हिंसाचारापुढे आपली सुरक्षादले हतबल असल्याचे जुने चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. विशेषत: अवघ्या पाच वर्षांमध्ये नक्षल्यांचा सामना करताना पाच वर्षांच्या कालावधीत पोलिसांची हिंमत कशी व किती वाढली, हे दोन घटनांमधून स्पष्ट होते. 

१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र स्थापना दिन, तसेच कामगार दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात जांभूळखेडा येथे नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या पंधरा जवानांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलिसांच्या काही चुका झाल्याचे अनुमान निघाले. विशेषत: बारा तास आधी जिथे नक्षल्यांनी वाहने जाळली तिकडे कोणतीही खबरदारी न घेता जवानांना खासगी वाहनाने पाठविण्याची चूक गंभीर होती. त्या घटनेतून महाराष्ट्र व छत्तीसगड, या दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी, तसेच निमलष्करी दलांनी बोध घेतला.

प्रत्येक छोट्या-मोठ्या कारवाईआधी योग्य ती दक्षता, सर्व प्रकारच्या धोक्यांचा आढावा घेतला जाऊ लागला. परिणामी, अडीच वर्षांनंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये कोटगुल- ग्यारापत्ती भागात सी-६० कमांडोंनी नक्षली तळ उद्ध्वस्त केला, तीन राज्यांचा प्रमुख असलेल्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा खात्मा झाला, तेव्हा एकही जवान जखमी झाला नाही.  अडीच वर्षांनंतरच्या कांकेर जिल्ह्यातील कारवाईत २९ नक्षलींना कंठस्नान घातले गेले, तेव्हाही सीमा सुरक्षा दल व स्थानिक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या पथकातील केवळ तीन जवान जखमी झाले आणि तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. जवानांच्या धाडसाने माओवाद्यांचे कंबरडे माेडत चालले आहे. त्यासाठी पोलिस व निमलष्करी दलांचे अभिनंदन!

Web Title: Today's editorial Crack the Red Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.