काळ बदलला, काळाचं व्यक्तित्वदेखील बदललं

By Admin | Updated: May 22, 2015 23:22 IST2015-05-22T23:22:38+5:302015-05-22T23:22:38+5:30

नरेंद्रभाई मोदी प्रथमच लोकसभेत पोहचले आणि प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लोकसभेच्या प्रवेशद्वारावर आपले डोके टेकवून नमन केले तो २१ मे चा दिवस!

The time has changed, the personality of the times has changed | काळ बदलला, काळाचं व्यक्तित्वदेखील बदललं

काळ बदलला, काळाचं व्यक्तित्वदेखील बदललं

नरेंद्रभाई मोदी प्रथमच लोकसभेत पोहचले आणि प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लोकसभेच्या प्रवेशद्वारावर आपले डोके टेकवून नमन केले तो २१ मे चा दिवस! त्याच क्षणी देशाचा काळ बदलला आणि काळाचं व्यक्तित्त्वदेखील बदललं. जी व्यक्ती भाजपाची संघटना आणि गुजरातचे सरकार या दोन्ही ठिकाणी अत्युच्य शिखरावर राहून गेली, त्या व्यक्तीने प्रथमच संसदेत प्रवेश करावा आणि तोही पंतप्रधान या नात्याने, ही जगाच्या पाठीवरील एक अत्यंत अपवादात्मक अशी बाब होती. तो क्षण केवळ नरेंद्र मोदी यांच्याच नव्हे, तर भारतीय लोकशाही आणि भारताचं भवितव्य यांच्या दृष्टीने देखील अत्यंत भाग्याचाह होता.
पाहा, कसा विचित्र योगायोग आहे! सारे जग कालपर्यंत ज्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट आणि महिलांच्या दृष्टीने असुरक्षित मानत होते तोच हा देश. जिथली वर्तमानपत्रे रोज नवनवीन घोटाळे, कांड वा मंत्र्यांची जेल यात्रा यांच्या बातम्या छापीत होते आणि जी व्यक्ती पंतप्रधानपदी आरुढ होती पण खरी पंतप्रधान नव्हती आणि जी व्यक्ती खरी पंतप्रधान होती ती आसनात बसत नव्हती, तोच हा देश. प्रश्न केवळ नेतृत्त्वाचा नव्हता. देशाची विश्वासार्हताच धोक्यात आली होती व देशाला अंतर्गत आणि बाह्य धोक्यांचा उपसर्ग जाणवत होता.
पूर्ण अंधारात बुडालेल्या देशात अचानक सूर्योदय व्हावा आणि लोकांचे डोळे दिपून जावेत अशीच स्थिती देशाच्या क्षितीजावर मोदींचा उदय झाल्यानंतर निर्माण झाली. प्रथमच देशात सुसंवाद निर्माण झाला. भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळे, मंत्र्यांचा कारावास हे शब्द वर्तमानपत्रांच्या बातम्यांमधून गायब झाले. महात्मा गांधीचा उपदेश वास्तवात आणण्यासाठी प्रथमच कुणा पंतप्रधानाने स्वच्छतेचा आणि शौचालय निर्मितीचा संदेश दिला. केवळ एका वर्षात शाळा, सार्वजनिक जागा आणि मुलींसाठी देशभरात ३१ लाख शौचालये तयार झाली. या चमत्काराने सारे जगच आश्चर्यचकित झाले.
संसदेतील कामकाजाची कशी खिल्ली उडवली जात होती ते आठवते? लोक गमतीने म्हणत, मुलांना संसद पाहण्यासाठी पाठवू नका, ते बिधडतील. खासदार करतात काय, तर ते फक्त अनुदानीत खाद्यपदार्थांवर ताव मारतात, काम करतात कुठे? गेल्या पंधरा वर्षांचा इतिहास पाहिला तर लोकसभेचे कामकाज ५६ तर राज्यसभेचे कामकाज केवळ ५८ टक्के इतकेच होऊ शकले. त्याच संसदेमध्ये मोदी सरकारच्या प्रतिष्ठापनेनंतर लोकसभेचे कामकाज १०३ वरून १२३ टक्क््यांपर्यंत गेले, तर राज्यसभेत अडथळे आणण्याचे अनंत प्रयत्न कॉग्रेस पक्षाकडून होऊनही तेथील कामकाज १०१ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचले. संसदेने १६ कायदे संमत केले, तर २० नवी विधेयके मांडली. पहिल्यांदाच असे घडले की लोकहितार्थ लोकसभेचे कामकाज तीन दिवसांनी वाढविण्यात आले.
देशाच्या सुरक्षेविषयी वारंवार लिहून येत होते की, सैनिकांजवळ पुरेशी हत्त्यारे नाहीत आणि संरक्षणदृष्ट्या आपण सज्जही नाही. पण मोदी सरकार सत्तेत येताच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक लक्ष कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेचे संरक्षण विषयक व्यवहार पूर्र्ण केले. चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नाविक दलासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. ज्या चीनला एवढी वर्षे आपण प्रतिस्पर्धी किंवा शत्रू मानीत आलो, त्याच चीनने आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचे केले नसेल इतके जंगी स्वागत नरेंद्र मोदी यांचे केले. शिवाय २७ अब्ज डॉलर्सचे व्यापारी करार केले गेले, ते तर वेगळेच.
जनधन योजनेने तर कमालच केली. लडाखपासून अंदमान निकोबारपर्यंत लाखो महिला आणि युवकांनी बॅँकांमध्ये आपली खाती उघडली. अशा सात कोटी नवीन बॅँक खात्यांमध्ये अवघ्या दोन महिन्यात पाच हजार कोटी रुपये जमा झाले. कोट्यवधी लोकाना एक लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे संरक्षण मिळाले. पहिल्यांदाच देशातील शेतकरी आणि कामगारांसाठी वर्षाला केवळ ३३ रुपयांचा हप्ता भरुन पेन्शनची सोय झाली. पण तरीदेखील देशातील ८० टक्के जनता आजही विम्याच्या संरक्षणापासून वंचित आहे व केवळ ११ टक्के कामगारांना पेन्शनचा लाभ मिळतो आहे. अवघ्या ३३० रुपयांच्या वार्षिक हप्त्याच्या आधारे दोन लाख रुपयांच्या भरपाईची जीवन ज्योती विमा योजना आणि वर्षाला केवळ १२ रुपये भरून दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा प्रारंभही मोदी सरकारनेच केला आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी याच सरकारने अटल पेन्शन योजना लागू केली आहे.
पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाला एक भक्कम नेतृत्त्व मिळाले आहे. संपूर्ण जग भारताची विशेष नोंद घेऊ लागले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि जपान हे देश भारताला महत्त्वाची संरक्षण विषयक उपकरणे, हत्त्यारे, लढाऊ विमाने आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत, तर फ्रान्स आणि कॅनडाने युरेनियमचा पुरवठ्यासंबंधी करार केला आहे. मोदींच्या प्रत्येक परदेश दौऱ्याने भारताचे हितच साध्य केले आहे. विरोधी पक्षांना त्याचे राजकारण करू द्या. भारत प्रगतीच्या वाटेवर आगेकूच करीत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदात त्यांचाही वाटा असणारच आहे!

तरुण विजय
(पत्रकार व राज्यसभा सदस्य, भाजपा)

Web Title: The time has changed, the personality of the times has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.