तितिक्षा
By Admin | Updated: January 16, 2015 00:35 IST2015-01-16T00:35:00+5:302015-01-16T00:35:00+5:30
येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते.

तितिक्षा
ज्ञानसाधू वा.गो. चोरघडे -
परमार्थ साधकांसाठी, अध्यात्म ज्ञानाच्या जिज्ञासूंसाठी साधना चतुष्ट्य सांगितले गेले आहे. विवेक, वैराग्य आणि मुक्तीच्या जिज्ञासेसोबत असलेल्या आवश्यक असलेल्या गुणवैशिष्ट्यात तितिक्षा हा महत्त्वाचा गुणविशेष आहे. तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहनशक्ती, क्षमा करण्याची वृत्ती, धीर धरणे इत्यादी. ज्ञानवंताच्या क्षमाशील वृत्तीत, ज्ञानदेवांनी तितिक्षेची सर्व लक्षणे सांगितली आहेत.
जो मानापमानाते साहे।
तो सुखदु:ख जेथ समाये।
निंदास्तुती नोहे। दुखंडु जो।।
उन्हाळेनि जो न तापे।
हिमवंती न कापे।
कायसेनिही न वासिपे। पातलेया।।
नाना चराचरी भूती।
दाटणी नव्हे क्षिती।
तैसा नाना द्वंद्वी। घामेजेना।।
(ज्ञाने. १६. ३४४.७५)
जीवनात आपल्याला अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. मान, अपमान,
गरिबी-श्रीमंती, निंदा-स्तुती, ऊन-
पाऊस या स्थितीत चित्ताचे समत्व
राखणे, आलेली स्थिती सहन करणे हे इथे अपेक्षित आहे. आयुष्यात येणारी
द्वंद्वात्मक अवस्था बिनतक्रार सहन
करणे म्हणजे तितिक्षा. केवळ सहन करणेच नव्हे तर ती सहन करीत असल्याचे
भानही नसणे.
तैसा जयाचिया ठायी।
न साहणे काहीच नाही।
आणि साहतु हेमेही। स्मरण नुरे।।
कायिक, वाचिक, मानसिक दु:खे अप्रतिकारपूर्वक सहन करणे म्हणजे तितिक्षा, अशी शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केली आहे.
सहनं सर्व दु:खानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते!
येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते. प्रतिकूल अनुभवांना दूर सारणे किंवा सुखी क्षणांना ठेवून घेणे आपल्या हातातही नसते. त्याच्या चिंता वाहत बसणे, त्यात मिळालेले आयुष्य खर्ची घातल्याने जीवनाची यथार्थता शोधण्याचा, सत्य शोधण्याचा प्रयत्न कसा घडणार? मिळालेले जीवन कृतार्थ व्हावे, त्याचा हेतू लक्षात यावा. प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्संग, सद्विचारांचे श्रवण, त्याचे चिंतन करीत मी कोण आहे; माझे स्वरूप काय आहे, याचा बोध करून घेणे यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
उन्हाळा आला की उन्हाचा त्रास होणार, हिवाळ्यात थंडीचा. प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या हवामानाचा बरा-वाईट परिणाम होणारच आहे. ज्येष्ठांनी विशेषत: हे लक्षात ठेवावे.