थोर ग्रंथीय वैभव डॉ. रंगनाथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:08 IST2016-08-11T00:08:58+5:302016-08-11T00:08:58+5:30
समृद्ध ग्रंथालये ही कोणत्याही समाजातील वैचारिक वैभवाची नेमकी साक्ष देत असतात. या पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक

थोर ग्रंथीय वैभव डॉ. रंगनाथन
समृद्ध ग्रंथालये ही कोणत्याही समाजातील वैचारिक वैभवाची नेमकी साक्ष देत असतात. या पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. शियाळी रामामृत ऊर्फ एस. आर. रंगनाथन यांचे योगदान अत्यंत बहुमोल आहे. भारतात गं्रथालय शास्त्र ही संकल्पना उत्तम व शास्त्रशुद्ध रितीने रुजवून तिला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अवघे आयुष्य वेचून ग्रंथ समृद्धतेसाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. त्याचे स्मरण होण्याचे औचित्य म्हणजे त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होत आहे.
डॉ. रंगनाथन म्हणत, ‘केवळ ग्रंथांचा संग्रह म्हणजे गं्रथालय नव्हे. तर ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या त्रिमूर्तींचे एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय!’ भारतात पूर्वीपासूनच ग्रंथालये होती; पण बहुतांश ग्रंथालये राजे, संस्थानिक व धर्ममार्तंडाच्या अधिपत्याखाली होती. त्यामुळे ग्रंथालय हेही एक व्यवस्थापनशास्त्र आहे व त्याकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे हा दृष्टिकोनच नव्हता. तो सर्वप्रथम रुजू केला डॉ. रंगनाथन यांनी. त्यानंतर त्यांनी आपले अवघे आयुष्य ग्रंथालय शास्त्रातील नवनवीन प्रयोगांत व्यतीत केले. त्यातूनच भारतात सक्षम ग्रंथालय चळवळ उभी राहिली.
डॉ. रंगनाथन खरे गणिताचे अध्यापक! पण त्यांची तळमळ आणि अभ्यासू वृत्ती हेरुन वरिष्ठांनी त्यांची मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल (१९२४) म्हणून नियुक्ती केली. त्या काळी भारतात ग्रंथपालन प्रशिक्षणाची सोय नसल्याने ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी ‘स्कूल आॅफ लायब्रेरिअन्शिप’ मधील अभ्यासक्रम पूर्ण केला. क्रॉयडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात काम करून इतर अनेक प्रसिद्ध ग्रंथालयांच्या कार्यपद्धतीही तुलनात्मक रीतीने अभ्यासल्या. निरनिराळ्या ग्रंथ वर्गीकरण पद्धतींचा सखोल अभ्यास केल्यामुळे भारतात परतताना बोटीवरच आपल्या नियोजित द्विबिंंदू-वर्गीकरण पद्धतीचा आराखडा प्रसिद्ध केला. एका भारतीयाने निर्माण केलेल्या ग्रंथालय शास्त्रातील पहिल्या वर्गीकरण पद्धतीचा हा उदय होता. यात डॉ. रंगनाथन यांची कामातील समर्पित वृत्ती तसेच अभ्यासू स्वभाव कारणीभूत होता. भारतात परतल्यावर त्यांनी सर्वप्रथम मद्रास विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे द्विबिंंदू वर्गीकरण पद्धतीने वर्गीकरण केले. अनेक नव्या सुधारणाही केल्या. भारतातील बहुतांश ग्रंथालयामध्ये आज डॉ. रंगनाथन यांचीच वर्गीकरण पद्धती वापरली जाते. मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना, विद्यापीठात ग्रंथालय शास्त्राचा शिक्षणक्रम सुरू करणे, ग्रंथालय शास्त्रावर व्याख्याने देणे अशी ग्रंथालय प्रसाराची कामे त्यांनी विलक्षण आत्मीयतेने केली. १९३१ मध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथालय शास्त्राच्या मूलतत्त्वांचा विचार करणारा ‘द फाइव्ह लॉज आॅफ लायब्ररी सायन्स’ हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या कामाचा अत्युच्च बिंदू होता. युनो, युनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ लायब्ररी असोसिएशन यासारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांना गौरविण्यात आले. ग्रंथालय शास्त्राविषयीच्या डॉ. रंगनाथन यांच्या विचारांना जगभरात मान्यता मिळाली. १९५७ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. पेनसिल्वानिया येथील पीट्सबर्ग विद्यापीठाने डी.लिट्. पदवी देऊन केलेला सन्मान तर वर्गीकरण व तालिकीकरण यातील संशोधनाबद्दल ‘अमेरिकन लायब्ररी असोसिएशन’कडून मिळालेले मार्गारेटमॅन हे पारितोषिक असे अनेक मानसन्मान त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ देण्यात आले. डॉ. रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालय चळवळ सक्रिय केली. ‘ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या त्रिमूर्तींचे एकत्रीकरण म्हणजेच खरे ग्रंथालय!’ या त्यांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगामध्ये ग्रंथालये व ग्रंथपालांनी वाचकांना पुन्हा ग्रंथांकडे वळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे, हेच डॉ. रंगनाथन यांचे खरे स्मरण ठरणार आहे.
- विजय बाविस्कर