विचारशक्ती

By Admin | Updated: November 15, 2016 07:53 IST2016-11-15T01:36:59+5:302016-11-15T07:53:41+5:30

मानवी जीवनाचे संचलन विचार, वाणी आणि कर्म याद्वारे होते. विचारांचे रुपांतर वाणी व कर्म यात होत असते. आपण म्हणू शकतो की ‘विचार’ हे बीज आहे.

Thinking power | विचारशक्ती

विचारशक्ती

मानवी जीवनाचे संचलन विचार, वाणी आणि कर्म याद्वारे होते. विचारांचे रुपांतर वाणी व कर्म यात होत असते. आपण म्हणू शकतो की ‘विचार’ हे बीज आहे. त्यापासून तयार झालेले फूल हे ‘वाणी’प्रमाणे तर ‘कर्म’ हे फळा प्रमाणे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विचारास सर्वाधिक महत्वपूर्ण स्थान असून योगशास्त्र तर पूर्णपणे विचारांवरच आधारित आहे. योगाची व्याख्या करताना भगवान पतंजली म्हणतात, योग हा आपल्या मनाच्या वृत्तीला लगाम घालणारा आहे. मनोवृत्ती म्हणजे मनात निर्माण होणाऱ्या विचारांचा कल्लोळ. त्याद्वारेच आपल्या मनात अनंत चिंता निर्माण होतात. त्या पूर्णपणे आपल्या वाणी, कर्म व शरीर यांना वाईट प्रकारे प्रभावित करतात. वैद्याकशास्त्रात म्हटले आहे की, मानवाला होणारे आजार हे ६० टक्क्यांहून अधिक मनातूनच निर्माण होतात.
मानवी मनास आपण विचारप्रवाह सुध्दा म्हणू शकतो. हा प्रवाह सतत वाढत राहतो. झोपेमध्ये ज्या प्रकारे आपण स्वप्न पाहातो तसेच आपण झोपेमध्ये तणावग्रस्त देखील असतो. शेवटी अशा विचारांवर नियंत्रण आणून त्यांना सकारात्मक आणि सर्जनशील बनविणे हे मानवी जीवनासाठी आवश्यक असते. विचारांवर नियंत्रण करण्यासाठी ऋषीमुनींनी अनेक उपाय सांगितले आहेत. विचार नियंत्रित होण्यास सुरुवात होते, तेव्हां त्यास उर्जा प्राप्त होऊन ते सकारात्मक होऊन जातात.
आपल्याला चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून सकारात्मक विचार निर्माण होण्यास बरीच मदत होते. धर्मग्रंथ आणि महापुरुषांचे जीवनपट यांचे वाचन केल्यास आपले विचार निश्चितच सृजनशील बनतात. वाचनाद्वारे मेंदूमध्ये जी कंपने तयार होतात, ती आपल्या विचारांना प्रभावित करीत असतात. चांगल्या ग्रंथाच्या वाचनातून जी कंपने निर्माण होतात ती चांगल्या विचारांना जन्म देतात. अशाच प्रकारे चांगले विचार ऐकल्यावर ते आपल्या विचारांना सृजनशील बनवतात. प्रवचन आणि चांगल्या वक्त्यांची भाषणे मानवी मनास खूप प्रभावित करतात.
मानव जसा विचार करतो, तसाच तो बनत जातो. त्यामुळेच गुन्हेगारी व्यक्तीचे मन पूर्णपणे नकारात्मक आणि विध्वंसक विचारांनी भरलेले असते. शेवटी जगामध्ये असलेली हिंसा व घृणा समाप्त करावयाची असेल तर आपल्याला व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मक विचार भरणे आवश्यक आहे. व्यक्तीचे विचार बदलले तरच व्यक्ती बदलेल. मनामध्ये असलेल्या विचारामुळेच व्यक्ती ही सत्कर्मी अथवा दुष्कर्मी बनते. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये चांगले संकल्प करण्याची परंपरा आहे 'तन्मे मन: शिवसंकल्पमस्तुु'

-डॉ. भूषणकुमार उपाध्याय

Web Title: Thinking power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.