विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता, उत्तम नट, लेखक, जाणकार माणूस...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:49 AM2019-12-19T05:49:00+5:302019-12-19T05:49:51+5:30
डॉ. श्रीराम लागू यांनी सामाजिक कृतज्ञता निधीसारखे मोठे अभियान चालविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला, तरी आपण अक्षरश: नतमस्तक होतो. आजच्या वर्तमानात आजूबाजूला समाजात गोंधळ दिसत असताना, त्यांच्यासारख्या विचारी, कृतिशील, निर्भीड व्यक्तिमत्त्वाची उणीव ठळकपणे जाणवते.
माझ्या कारकिर्दीच्या खूप नंतरच्या टप्प्यावर मी डॉ. श्रीराम लागू यांना भेटले. त्यांचे काम आणि नाव तोवर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले होते, अशा काळात त्यांची आणि माझी भेट झाली. माझे मोठे बंधू गो. पु. देशपांडे यांचे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे एक अतिशय महत्त्वाचे नाटक डॉ. लागूंनी करायला घेतले. त्या वेळी नट आणि माणूस म्हणून त्यांचे वेगळेपण माझ्यापर्यंत रसिक म्हणून पोहोचत होते. परंतु, ‘चर्चा नाटक’ हा जो प्रकार आहे, ज्याला कोणी एरवी हात लावला नसता, डॉ. लागू यांनी ते लीलया पेलले. त्यांच्या ठायी अनेक गुणांचा समुच्चय असल्याचे समजून आले. डॉ. लागूंच्या रूपाने विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता, उत्तम नट, लेखक, जाणकार माणूस अशा अनेक अंगांनी संपन्न व्यक्तिमत्त्व आज आपण हरवून बसलो आहोत, याचे खूप वाईट वाटते. गेली काही वर्षे ते कार्यरत नसले तरी आपल्या आसपास आहेत, हाच एक मोठा दिलासा होता. त्यामुळे आज आपण फार पोरके झालो आहोत, अशी भावना मनात निर्माण झाली आहे.
डॉ. लागूंना नाट्यप्रशिक्षण घेऊन आलेल्यांबद्दल अतिशय कौतुक वाटायचे. ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मधून शिक्षण घेऊन आलेल्या मी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी अशा सर्वांबरोबर त्यांनी काम केले. महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मोठ्या लेखकाच्या ‘आत्मकथा’ या नाटकात मी सर्वांत प्रथम डॉक्टरांबरोबर काम केले. रूपवेध या संस्थेतर्फे आम्ही ‘आत्मकथा’मध्ये भूमिका साकारल्या. ती माझी आणि डॉ. लागू यांची एकत्र काम करण्याची पहिली वेळ! आमच्यामध्ये वयाचे, अनुभवाचे खूप अंतर होते. तरीही, सर्वांशी मित्रत्वाच्या, समानतेच्या नात्याने नेहमी त्यांची वागणूक असायची. तालमीमध्ये ते आमचे काम अतिशय बारकाईने पाहत असत. त्यांनी कधीही ‘तू असं नाही, तसं करून बघ’ किंवा ‘तसं नाही, असं करून बघ’ सुचवलं नाही. ते तटस्थ भूमिकेतून दुसऱ्या माणसाच्या कामाकडे प्रेमाने, आदराने पाहत असत. त्यांच्या ठायी उदार मन आणि सौजन्य होते. ते अत्यंत शिस्तीचे आणि वेळ पाळणारे होते. नाटक किंवा कोणतेही काम करण्याचा गंभीर दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. सरावाला कोणी वेळेत पोहोचले नाही, तर ते अस्वस्थ व्हायचे. प्रत्येकाची कामातील एकाग्रता ते बारकाईने न्याहाळायचे. कारण, ते स्वत: एकाग्रतेचे, शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यामुळे त्यांच्यापुढे ढिसाळपणा करण्याची कोणाचीही हिंमत नसायची. एनएसडीचे संचालक आणि माझे गुरू अल्काझी यांच्यासारखे महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. लागू.
डॉ. श्रीराम लागू यांनी सामाजिक कृतज्ञता निधीसारखे मोठे अभियान चालविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला, तरी आपण अक्षरश: नतमस्तक होतो. आजच्या वर्तमानात आजूबाजूला समाजात गोंधळ दिसत असताना, त्यांच्यासारख्या विचारी, कृतिशील, निर्भीड व्यक्तिमत्त्वाची उणीव ठळकपणे जाणवते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची आणि रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे.
त्यांनी चित्रपटांमध्येही अजरामर भूमिका केल्या. साहित्य क्षेत्रातील अनेक गोष्टींचा त्यांचा अभ्यास होता. रंगभूमीशी त्यांची जवळीक होती. रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्याची निकड त्यांनी जाणली होती. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ केले. त्यामध्ये त्यांचे प्रदीर्घ स्वगत होते. ‘नटसम्राट’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके पाहून कोणीही अचंबित होत असे. नटसम्राटसारखे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केले. मात्र ‘सूर्य पाहिलेला माणूस’सारखा प्रयोग जो त्यांनी केला तो कितीतरी अधिक खडतर होता. हा प्रयोग त्यांनी इतक्या आवेगाने पेलला की त्यांचा आवेग, रंगभूमीवरचे प्रेम, उत्कटता कुठून येते, असा प्रश्न पडतो. हे सारे तुमच्यात जन्मजात असावे लागते. असे गुण लाभलेला फार मोठा माणूस आपण गमावला.
मला त्यांच्यासोबत ‘नटसम्राट’मध्ये काम नाही करता आले. मात्र ‘आम्ही नटसम्राट पुनरुज्जीवित करणार आहोत, तू काम करणार का?’ असे त्यांनी मला एकदा विचारले होते. त्या भूमिकेला कोण नाही म्हणणार? अर्थात मी होकार दिला, परंतु काही कारणाने ते घडू शकले नाही. मात्र, हा प्रसंग डॉक्टरांनी लक्षात ठेवला होता. त्या नाटकाची डीव्हीडी तयार करण्याच्या वेळी कावेरीची भूमिका करण्याची संधी त्यांनी मला दिली. आजही लोक भेटून त्याविषयी बोलतात. हा अनुभव कधीही न विसरण्यासारखा नव्हता. त्यांनी एक वेगळी अभिनयशैली महाराष्ट्राला दिली, ती रंगभूमी आणि रसिक कधीही विसरणार नाहीत. माणूस, मित्र म्हणून ते कायम पाठीशी उभे राहायचे. ते आसपास असले की शांत आणि आश्वस्त वाटायचं. ती आश्वस्तता आज हरवली आहे.
- ज्योती सुभाष। ज्येष्ठ अभिनेत्री